आपत्काळात नागरिकांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकणे, ही काळाची आवश्यकता ! – सद्गुरु सत्यवान कदम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तपोधाम (ता. खेड) येथे प्रथमोपचार शिबीर

सद्गुरु सत्यवान कदम

खेड, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – आगामी काळ हा भीषण आपत्तींचा असणार आहे. पूर, भूकंप, अग्नीप्रलय, ज्वालामुखी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, तसेच दंगली, अणूबॉम्ब स्फोट, जाळपोळ अशा मनुष्यनिर्मित आपत्तीही उद्भवणार आहेत. यामध्ये स्वत:च्या जीवित रक्षणासाठी, तसेच कुटुंबाच्या, समाजाच्या पर्यायाने राष्ट्रातील नागरिकांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकून सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता आहे आणि सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. तालुक्यातील आयनी-मेटे तपोधाम येथे २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘प्रथमोपचार’ शिबिरामध्ये ते बोलत होते. या शिबिराचा लाभ ६० जणांनी घेतला.

शिबिराचा उद्देश श्री. महेंद्र चाळके यांनी सांगितला. ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्य’ या विषयावर डॉ. (सौ.) साधना जरळी यांनी दृकश्राव्य माध्यमातून शिबिरार्थींना माहिती सांगितली, तसेच ‘रक्तस्राव’ याविषयावर सौ. जोत्स्ना नारकर यांनी माहिती सांगितली. यासह ‘रुग्ण पडताळणी कशी करावी ?’, ‘मर्माघात झालेल्या रुग्णावर प्रथमोपचार कसे करावेत?’, रुग्णाला वाहून नेण्याच्या विविध पद्धती याविषयीचे गटांमध्ये प्रात्यक्षिके घेण्यात आली.

प्रथमोपचार वर्गाला येणार्‍यांचे अनुभव

१. एका रात्री ९ वाजता माझा पुतण्या श्‍वास कोंडल्यामुळे अस्वस्थ झाला होता. त्याचा चेहरा काळा-निळा पडला होता. मी त्याला झोपवून छातीवर हाताच्या तळव्याने २-३ वेळा दाब दिला. त्यानंतर त्याचा श्‍वास सुटला. नंतर डॉक्टरांना बोलावले. ते येईपर्यंत पुतण्या शुद्धीत आला होता. डॉक्टर म्हणाले, ‘‘आता सर्व ठीक आहे.’’ या सर्व गोष्टी करतांना भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धावा करत होतो, त्यांनीच सर्व कृती माझ्याकडून  करवून घेतल्या.- सौ. अनिता मालप, गुहागर

२. वाटेत कुठे अपघात झाल्यास मला तिथे थांबण्याची किंवा साहाय्य करण्याच्या दृष्टीने भीती वाटत होती; मात्र प्रथमोपचार शिबिराला गेल्यानंतर रुग्णाला दवाखान्यात नेऊन पोहोचवणे, हा पण प्रथमोपचार असल्याचे कळले. त्यानंतर एकदा प्रवासादरम्यान वाटेत अपघात झाला तिथे गेलो. त्या वेळी तेथील व्यक्तींनी मला रुग्णाला दवाखान्यात नेण्याची विनंती केली. या वेळी देवाच्या कृपेने मला कोणतीही भीती वाटली नाही आणि रुग्णाला दवाखान्यात नेऊन सोडले. – श्री. शैलेश सकपाळ, खेड

३. माझ्यासमोर एक दुचाकी घसरली आणि वाहनचालकांचा पाय त्याखाली अडकला. या प्रसंगात मी तिथे एकटीच होते. मी भगवंताला प्रार्थना करून बळ मागितले आणि जोरजोरात इतरांना साहाय्यासाठी हाका मारू लागले. त्या वेळी ४-५ जण धावत आले आणि त्यांनी त्याचा पाय दुचाकी खालून सोडवला. नंतर त्या दादाने येऊन मला नमस्कार केला. हे केवळ आणि केवळ गुरुदेवांनी बळ दिल्यामुळे आणि प्रथमोपचार शिकल्याने मला करता आले. कृतज्ञता !- सौ. सुप्रिया कदम, खेड


Multi Language |Offline reading | PDF