जयगड ते दाभोळ मार्गावरील ‘गॅस पाईपलाईन’ला ग्रामस्थांचा विरोध

शेतकर्‍यांचा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण

प्रत्येक वेळी जनतेचा होणारा विरोध सरकारच्या लक्षात येत नाही का ? सरकारचा हा विकास म्हणायचा कि जनतेला दिलेला त्रास !

रत्नागिरी – जयगड ते दाभोळ मार्गावरील एच्. एनर्जी आस्थापनाच्या ‘गॅस पाईपलाईन’साठी नांदीवडेत चालू असलेल्या पंचनाम्यांना ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. ‘शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची आधी उत्तरे द्या, नंतर पंचनामे करा’, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांनी लावून धरली; मात्र शेतकर्‍यांचा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

जयगड ते दाभोळ गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. शेतकर्‍यांची भूमी भाडेकराराने घेऊन ही पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सुरक्षेच्या सूत्रावरून प्रारंभीपासूनच येथील शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी या गॅस पाईपलाईनला विरोध केला आहे. नांदीवडे गावात भूमीवरील मालमत्तांचे पंचनामे हाती घेण्यात आले; मात्र या प्रक्रियेला शेतकर्‍यांनी विरोध करत पंचनाम्याची प्रक्रिया थांबवली.

त्यानंतर पुन्हा पोलीस बंदोबस्तात पंचनाम्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना येथील स्थानिक ग्रामस्थांनी घेराव घातला. ‘आधी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे दिल्यानंतरच पंचनाम्याची प्रक्रिया हाती घ्या’, अशी मागणी करत शेतकर्‍यांनी ३ घंट्यांपेक्षा अधिक काळ पंचनाम्याची प्रक्रिया रोखून धरली. गॅस पाईपलाईन कुठून जाणार याविषयी अधिकृत कोणतीच माहिती न देता मोजणी प्रक्रिया कशी हाती घेतली, असा प्रश्‍न शेतकर्‍यांनी केला.

या वेळी पंचनाम्याला विरोध असल्याचे निवेदन घटनास्थळी स्वीकारा, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थांनी घेतली. प्रारंभी अधिकार्‍यांनी मागणीला नकारघंटा दाखवली; मात्र  प्रांताधिकार्‍यांच्या सूचनेनुसार उपस्थित अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी कोणत्याही अनुमतीविना जागेत घुसल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी जयगड पोलीस ठाण्यात गेले.


Multi Language |Offline reading | PDF