रत्नागिरी जिल्ह्यात ३ परप्रांतीय नौकांवर कारवाई

रत्नागिरीतील समुद्रातून ८ नौका पळून गेल्या

रत्नागिरीतील समुद्रात अनेक परप्रांतीय नौका अनधिकृतपणे मासेमारी करत असतांना केवळ ३ नौकांवर कारवाई होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद होय !

रत्नागिरी – येथील समुद्रात मासेमारी करणार्‍या ३ परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी जवळच्या समुद्रात १ नौकेवर मत्स्यविभागाने, तर जयगड येथे पोलिसांनी २ नौकांवर कारवाई केली आहे.

येथील समुद्रात परराज्यातील नौका येऊन अनधिकृतपणे मासेमारी करतात. रत्नागिरी समुद्राच्या किनार्‍यालगत काही परप्रांतीय नौका मासेमारी करत असल्याची माहिती मत्स्यविभागाला मिळाल्यानंतर मत्स्यविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांनी या परप्रांतीय नौकांचा समुद्रात पाठलाग केला.

त्यामधील जवळपास ७ ते ८ नौका पळून गेल्या. १५ मिनिटांच्या पाठलागानंतर मात्र १ नौका मत्स्यविभागाला पकडता आली आहे. कर्नाटकची ही नौका असून ‘जल वैष्णवी’ असे तिचे नाव आहे. या नौकेवर जवळपास १ ते दीड टन मासळी असून २ लाख रुपये अदमासे या मासळीची किंमत आहे. या माशांचा लिलाव करून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया मत्स्यविभागाकडून चालू आहे. दुसरीकडे जयगड समुद्रात गस्त घालत असतांना पोलिसांनी २ परप्रांतीय नौका पकडून मत्स्यविभागाच्या कह्यात दिल्या. या नौकांवरही पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया मत्स्यविभागाकडून चालू आहे.

मत्स्यविभागाच्या या कारवाईमुळे गेल्या मासभरात ७ परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये केरळ, दिव-दिमणमधल्या नौकांचा समावेश आहे. या नौकांकडून  अदमासे ५ पट दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती साहाय्यक मत्स्यआयुक्त आनंद पालव यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF