राज्यातील बनावट पटसंख्या दाखवणार्‍या शाळांवर २ मासांत कारवाई करणार ! – शिक्षणमंत्री विनोद तावडे

अशा शाळांमधून आदर्श विद्यार्थी कसे घडणार ? हे इतकी वर्षे प्रशासनाच्या लक्षात का आले नाही ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करा !

मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील बनावट पटसंख्या दाखवणार्‍या शाळांवर  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. येत्या २ मासांत ही प्रक्रिया पूर्ण करून दोषी आढळलेल्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, तसेच बनावट पटसंख्या दाखवणार्‍या शाळांना पाठीशी घालणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ३० नोव्हेंबरला विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिले. भाजपचे आमदार आणि अधिवक्ता आशिष शेलार यांच्यासह इतर आमदारांनी प्रश्‍नोत्तरात याविषयी प्रश्‍न विचारला होता.

आगामी शिक्षकभरती ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून करणार !

यापुढील शिक्षकभरती ही ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून करण्यात येईल. उच्च न्यायालयातही या संदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘पवित्र पोर्टल’च्या प्रक्रियेची प्रशंसा केली आहे.

याद्वारे शिक्षकभरती करतांना गुणवत्तापूर्ण उमेदवाराची निवड करण्यात येईल. त्यामुळे शिक्षकभरतीच्या वेळी होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. (याचा अर्थ ‘आतापर्यंत गुणवत्तापूर्ण उमेदवारांची भरती केली जात नव्हती’, असे समजायचे का ? – संपादक) विधानसभेत शिवसेनेच्या आमदार सौ. तृप्ती सावंत यांनी या संदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता.


Multi Language |Offline reading | PDF