डॉ. विनोद अनाव्रत लिखित ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या धर्मद्रोही पुस्तकावर शासनाने बंदी घालावी ! – आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराजांची अपकीर्ती रोखण्यासाठी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या शिवसेनेच्या आमदारांचे अभिनंदन !

विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करतांना शिवसेनेचे आमदार

मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) –  लेखक डॉ. विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकातील लिखाण अत्यंत आक्षेपार्ह असून ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन करणारे आणि कोट्यवधी शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. या पुस्तकात मागासवर्गीय आणि बहुजन समाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात मत सिद्ध करून जातीयद्वेष वाढेल, अशी मांडणी करण्यात आली आहे, तसेच हे पुस्तक पुणे येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त (एल्गार म्हणजे निकराचा लढा) वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने पुस्तकाचे मुद्रक, मालक, प्रकाशक आणि लेखक यांच्या विरोधात प्रथम गुन्हा नोंद करावा अन् धर्मद्रोही पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी महाड (रायगड) येथील शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी येथील आंदोलनात केली.

‘धर्मांतरबंदी कायदा करावा, छत्रपती शिवाजी महाराज यांची अपर्कीती करणार्‍या पुस्तकावर बंदी घालावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्यावर कारवाई करावी’, या मागण्यांसाठी आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी ३० नोव्हेंबरला दुपारी १ वाजता विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. या वेळी शिवसेनेचे आमदार सर्वश्री संजय रायमूलकर, मनोहर भोईर, अमित घोडा, गौतम चाबुकस्वार, शांताराम मोरे आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या वेळी बोलतांना आमदार श्री. भरतशेठ गोगावले पुढे म्हणाले की,

१. आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवनाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना मुजरा करून महाराजांचा घोर अवमान केल्याने त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.

२. उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालू असून जवळजवळ १ लाखांहून अधिक सिंधी बांधवांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर आली आहे. याची शासनाने सखोल चौकशी करावी, तसेच राज्यातील शहरी तथा ग्रामीण भागांत गरीब, आदिवासी, पीडित लोकांचे फसवून आणि प्रलोभने दाखवून धर्मांतर केले जात आहे. गेल्या ५ वर्षांत राज्यात सहस्रो महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणाच्या संदर्भात तत्कालीन काँग्रेस शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने वर्ष २०१४ मध्ये मध्यप्रदेश आणि ओडिशा राज्यांच्या धर्तीवर धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाला केली आहे. त्याची कार्यवाही त्वरित करण्यासाठी शासनाने अध्यादेश काढावा.

शिवसेनेच्या आमदारांनी दिलेल्या घोषणांमुळे विधानभवनाचा परिसर दणाणून गेला !

या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍यांचा निषेध असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची अपर्कीती करणार्‍या पुस्तकावर बंदी आणलीच पाहिजे’, ‘धर्मांतरबंदी कायदा लागू झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्यामुळे विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.

क्षणचित्रे

१. शिवसेनेच्या आमदारांनी ‘धर्मांतरबंदी, छत्रपती शिवाजी महाराज यांची अपर्कीती करणार्‍यांवर कारवाई करावी’, अशा आशयाचा फलक हाती घेतला होता.

२. हा फलक हाती घेऊन आमदारांनी विधानभवनात फेरी मारत आणि घोषणा देत आंदोलन केले.


Multi Language |Offline reading | PDF