पोलिसांवरील आक्रमणांमध्ये वाढ, हा गृहखात्याचा पराभव ! – उद्धव ठाकरे

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचे दायित्व आहे. वर्ष २०१४ पासून पोलिसांवरील आक्रमणांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे. असेच चित्र राहिल्यास राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील, तर जनता सुरक्षित कशी राहील ?, असे परखड मत शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केले आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,

१. दारूतस्कराने चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्याचे फौजदार छत्रपती चिडे यांच्या अंगावर वाहन चढवून त्यांना चिरडून मारले. चिडे यांची हत्या दारूतस्करीच्या वादातून झाली आणि त्याला सरकार उत्तरदायी आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकप्रियतेसाठी जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली; मात्र संपूर्ण विदर्भात दारूचा महापूर धोधो वाहत आहे.

२. गेल्या ४ वर्षांत पोलिसांना मोठ्या प्रमाणात प्राण गमवावे लागले आणि पोलिसांवरील सर्वाधिक आक्रमणे विदर्भात झाल्याच्या नोंदी आहेत. सीआयडीच्या वर्ष २०१६ च्या गुन्हे अहवालानुसार वर्ष २०१५ मध्ये साधारण ३७० पोलीस कर्मचार्‍यांवर आक्रमणे झाली. वर्ष २०१६ मध्ये ४२८ पोलिसांवर आक्रमणे झाली. त्यात ५६ पोलीस ठार झाले. पोलिसांचे सर्वाधिक बळी (११ जणांचे) चंद्रपुरात गेले आणि त्यासाठी लादलेली दारूबंदी अन् दारूतस्करी हे मुख्य कारण आहे.

३. धैर्य हीच महाराष्ट्र पोलिसांची ओळख आहे. आझाद मैदानात धर्मांध दंगलखोरांनी पोलिसांवर आक्रमण केले, पोलिसांची वाहने जाळली, तेव्हा गदारोळ करणारा विरोधी पक्षच आज सत्ताधारी आहे आणि पोलीस पुनःपुन्हा मार खात आहेत.

४. गुंडांना, चोरांना ‘राजकीय कार्यकर्ता’ म्हणून सत्ताधार्‍यांच्या उपस्थितीत प्रवेश मिळतो आणि पोलिसांनी ज्यांना काल गुंड म्हणून ठोकलेले असते, त्या गुंडांनाच सलाम करावा लागतो.


Multi Language |Offline reading | PDF