विदर्भस्तरीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचा भावपूर्ण वातावरणात समारोप !

शिबिराला उपस्थित युवक-युवती मध्यभागी १. श्री. श्रीकांत पिसोळकर आणि २. सनातनचे पू. पात्रीकरकाका

अमरावती, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात चालू असलेल्या चार दिवसीय विदर्भस्तरीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचा २६ नोव्हेंबर या दिवशी भावपूर्ण वातावरणात समारोप झाला. या वेळी शिबिरार्थींचा आणि उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला. या ४ दिवसीय सत्रांमध्ये ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करावे ?’, याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. तसेच ‘सामाजिक प्रसारमाध्यमांच्या (सोशल मीडियाच्या) माध्यमातून धर्मप्रसार कसा करावा ?, काळानुसार साधना कोणती ?, सनातन प्रभातचे महत्त्व आणि त्या माध्यमातून धर्मप्रसार कसा करता येऊ शकतो ?’, अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.

या वेळी सनातन संस्थेचे विदर्भ आणि छत्तीसगड प्रसारसेवक पू. अशोक पात्रीकर म्हणाले, ‘‘सध्याच्या आपत्काळात टिकून रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. त्यासाठीच काळानुसार अष्टांग साधना केल्याने आपली जलद आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्याचे उत्तम माध्यम असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवल्याने ईश्‍वरकृपेने दोष घालवून जन्मोजन्मीचे संस्कार दूर करता येतात आणि आनंदप्राप्ती हे मनुष्यजीवनाचे ध्येय साध्य करता येते.’’

शिबिरार्थींच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. श्री. दीपक येलगलवार – आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नोकरीवरून सुट्टी घेऊ शकत नव्हतो आणि शिबिरात येण्याची तीव्र इच्छा होती. आदल्या दिवशी मालकाने स्वतःहून ‘तुला कशाचा ताण आला आहे ?’ असे विचारले आणि मी निर्भीडपणे ‘आमचे आश्रमात शिबीर आहे, मला जायला मिळणार नाही, त्याची खंत वाटत आहे’, असे सांगितले. तेव्हा मालकाने लगेच ‘तू जा, मी तुझा पगार कापणार नाही’, असे सांगितले.

२. श्री. हरीष लिमजे, चंद्रपूर – माझी कराटेची महत्त्वाची स्पर्धा २४ नोव्हेंबरला नियोजित असल्याने मला शिबिराला येण्याचे जमणार नव्हते. माझ्याकडून सतत प्रार्थना होत होत्या. अचानक कधीही पालट होऊ न शकणारी मोठी स्पर्धा डिसेंबरमध्ये घेणार, असा मला निरोप मिळाला आणि शिकवणीवर्गाच्या शिक्षकांनी सुद्धा आनंदाने सुट्टी घेण्यास अनुमती दिली.

शिबिरार्थींनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. रोशन मुळे, नांदगाव पेठ, अमरावती – मी एकत्र कुटुंबात रहात असूनही मला नातेवाइकांकडून मिळाले नाही तेवढे प्रेम शिबिराच्या या ४ दिवसांत मिळाले. मी पूर्णकालीन सेवा करण्यास इच्छुक असून मला दिलेल्या या संधीविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.

२. कु. अश्‍विनी सातपैसे, वरूडा, अमरावती – माझे पूर्वी राग या दोषावर नियंत्रण मिळवता येत नव्हते; मात्र शिबिराच्या या चार दिवसांत राग येण्याचे प्रसंग घडल्यावर मला लगेच त्यावर नियंत्रण मिळवता आले. ‘भाव म्हणजे काय ?’ हे शिकायला मिळाले.

३. आकांक्षा कावरे, वरूडा – शिबिरात येण्यापूर्वी काही दिवस आधीपासून पुष्कळ अडथळे आले; परंतु देवाने ते दूर करून मला इथे आणले. स्वतःमधील दोषांची जाणीव झाली. सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी झाल्याने जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे.

४. भाग्येश कराळे, अकोला : शिबिराची रूपरेषा काही कारणांनी सातत्याने पालटत होती. तरीही शिबीर वेळेत आणि शांत पद्धतीने पार पडले. यावरून मला ‘सतत वर्तमानकाळात कसे रहायचे ?’ हेे शिकायला मिळाले.

शिबिरार्थींची भावविभोर स्थिती !

समारोपीय सत्रामध्ये मनोगत व्यक्त करतांना सगळेच जण भावविभोर झाले. शिबिरार्थींच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. २ घंटे शिबिरार्थी युवक-युवती त्याच स्थितीत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भावमय झाले होते. या वेळी उपस्थित शिबिरार्थींनी धर्मकार्यात सक्रीय सहभागी होणार असल्याचे सांगितले.

 


Multi Language |Offline reading | PDF