देवद आश्रमातील संत भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ नामजपाला बसल्यावर आलेल्या अनुभूती आणि प्रतिदिन प्रार्थना करून केलेल्या नामजपामुळे देव आनंदात ठेवत असल्याचे अनुभवणे

सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने…

१. संत भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून कुलदेवतेचा नामजप करतांना आलेल्या अनुभूती

श्री. हनुमंत शिंदे

१ अ. नामजप करतांना गाडीवर काळा कपडा दिसणे आणि देवाला प्रार्थना केल्यावर भूमीतून एक तुळशीचे लहान रोप वर येतांना दिसणे अन् ते मोठे होऊन डोलू लागल्यावर आनंद होणे : ‘१५.२.२०१८ या दिवशी मी देवद आश्रमात संत भक्तराज महाराज यांच्या चैतन्यमय गाडीजवळ बसून आमच्या कुलदेवतेचा ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हा नामजप डोळे मिटून करत होतो. त्या वेळी मला गाडीवर काळा कपडा दिसला. मला ‘हे दृश्य बघू नये’, असे वाटले; म्हणून मी डोळे उघडून देवाला प्रार्थना केली, ‘हे देवा, मला असे दृश्य दाखवू नको.’ नंतर डोळे मिटून पुन्हा नामजप चालू केला. तेव्हा मला भूमीतून एक तुळशीचे लहान रोप वर येतांना दिसले. नंतर ते मोठे होऊन माझ्यासमोर डोलू लागले. मला त्याचा आनंद झाला आणि माझ्याकडून श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

१ आ. दुसर्‍या वेळी गाडीवर वेगळ्या रंगाचा कपडा दिसणे आणि देवाला प्रार्थना केल्यावर संपूर्ण गाडीवर झेंडूच्या फुलांच्या माळा दिसणे अन् पुढे नंदी दिसल्यावर अर्धा घंटा भावावस्थेत असणे : २१.२.२०१८ या दिवशी संत भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून डोळे मिटून नामजप करतांना प्रथम मला बाबांच्या गाडीसमोर गुलाबी रंगाचा कपडा दिसला आणि त्यानंतर संपूर्ण गाडीवर वेगळ्याच रंगाचा कपडा दिसला. त्या वेळी मी देवाला सांगितले, ‘देवा, मला असे काही दाखवू नको.’ नंतर मला संपूर्ण गाडीवर आणि गाडीच्या चाकांवर झेंडूच्या फुलांच्या माळा दिसल्या, तसेच मला गाडीच्या पुढे नंदी दिसला. त्यालाही फुलांनी सुंदर सजवले होते. तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदावस्थेत माझा २२ माळा जप झाला. मी या भावावस्थेत अर्धा घंटा होतो.

२. नामजप करतांना वाईट शक्ती अडथळे निर्माण करत असल्याने संत, देवदेवता यांना प्रार्थना करणे आणि नामजपामुळे जिवंत असून देवाने आनंदी ठेवल्याची अनुभूती घेणे

मी प्रतिदिन वेळ मिळेल तसा हातात माळ घेऊन सतत नामजप करत असतो. नामजप करतांना वाईट शक्ती प्रचंड त्रास देतात आणि अडथळे निर्माण करतात. त्यामुळे मी एक माळ नामजप पूर्ण झाल्यावर पुढील प्रार्थना करतो – ‘संत भक्तराज महाराज, भगवान कृष्ण, डॉक्टर बाबा (परात्पर गुरु डॉ. आठवले), गजानना, गाणगापूरच्या राजा, वाडीच्या राजा, वैशंपायन बाबा, काळेबाबा, भैरवनाथा, भवानीदेवी, बिटल्याची आई (मूळ गावाकडील ग्रामदैवत), तुमच्या चरणी प्रार्थना करतो, ‘माझा भावपूर्ण नामजप होऊ दे. साधनेतील अडथळे दूर होऊ दे. सातव्या पाताळातीळ त्रासदायक शक्ती नष्ट करून परात्पर गुरुदेवांभोवती संपूर्णपणे संरक्षककवच निर्माण होऊ दे. हिंदु धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडू दे. हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे.’ त्यामुळे मला नामजप करण्यास शक्ती मिळते आणि माझा नामजप चांगला होतो. ‘मी नामजपामुळे जगत आहे आणि देव मला आनंदात ठेवत आहे’, अशी अनुभूती मी घेत आहे.

मला वरील अनुभूती दिल्या; म्हणून मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भवानीदेवीच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. हनुमंत एकनाथ शिंदे, नवीन पनवेल (२१.२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now