(म्हणे) ‘भारताने एक पाऊल पुढे टाकले, तर आम्ही दोन पावले टाकू !’ – इम्रान खान

आतंकवादाविषयी मात्र मौनच !

भाजप सरकारने पाकमध्ये पाठवलेल्या प्रतिनिधींनी पाकपुरस्कृत आतंकवादावर न बोलणे, हा सरकारचा बोटचेपेपणा ! शत्रूच्या कुरापतींची वाच्यताही करू न शकणारे सरकार शत्रूला कधी संपवू शकेल का ?

इस्लामाबाद – भारत आणि पाक यांच्यात असे कोणतेच सूत्र नाही की, जे सोडवले जाऊ शकत नाही. भारताने एक पाऊल पुढे टाकले, तर आम्ही दोन पावले पुढे टाकू, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी करतारपूर मार्गिकेच्या पायाभरणी कार्यक्रमात सांगितले. या वेळी खान यांनी आतंकवादाच्या विषयावर मात्र मौन बाळगले. (आतापर्यंत भारताने अनेक वेळा पाकच्या दिशेने शांतीची कबुतरे सोडली. त्याचा काय परिणाम झाला ? अशी विधाने करून इम्रान खान यांचा एक प्रकारे भारताला दोष देण्याचा डाव आहे ! पाकला भारताशी मैत्रीच हवी असेल, तर त्याने प्रथम मुंबई, उरी आणि पठाणकोट येथे आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना फाशी द्यावी आणि मगच अशी विधाने करावीत ! – संपादक)

खान पुढे म्हणाले, ‘‘गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा करतारपूर साहिब, या दोन ठिकाणांना जोडणारी मार्गिका सिद्ध करण्यात येणार आहे. करतारपूर मार्गिकेमुळे शिखांना मदीनेला जाण्यासारखा आनंद झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ काश्मीर हे एकच सूत्र आहे. जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का एकत्र येऊ शकत नाहीत ? भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना युद्ध करायचे नाही. मग मैत्रीशिवाय दुसरा कुठला मार्ग उरतो ?’’


Multi Language |Offline reading | PDF