प.पू. दास महाराज यांना साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती !

प.पू. दास महाराज

१. प.पू. दास महाराज आश्रमात रहाण्यासाठी आल्यावर त्यांना ‘सेवा करायला हवी’, असा ध्यास लागणे आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी प.पू. दास महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक उपाख्य माई यांना साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास सांगणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्ही उभयता बांद्याहून सनातनच्या रामनाथी आश्रमात रहाण्यासाठी ५.८.२०१८, या दिवशी आलो. मी पायाने अधू आणि माझी धर्मपत्नी (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक उपाख्य माई) वयोवृद्ध असल्यामुळे आम्हाला आश्रमात कोणतीच सेवा करणे शक्य नव्हते. माझ्या मनात विचार आला, ‘आपण कोणतीच सेवा करत नाही, तर आश्रमातील महाप्रसाद कसा ग्रहण करायचा ?’ मी माझ्या मनातील विचार परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बोलून दाखवला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही असा विचार का करता ? आपण सर्वजण एकाच कुटुंबातील आहोत. तुम्ही जप केल्यामुळे साधकांना लाभ  होणार. पू. माईंनाही साधकांसाठी नामजप करायला सांगा. तुम्ही खोलीत असला, तरी सर्व साधकांना तुम्ही केलेल्या नामजपामुळे चैतन्य मिळणार.’’ आम्ही उभयता परात्पर गुरु डॉक्टरांना भेटून आलो, तरी आम्हाला चैन पडेना. १४.८.२०१८ या दिवशी रात्री ९ वाजता मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा दूरध्वनी आला. त्या म्हणाल्या, ‘बाबा, तुम्ही उद्यापासून साधकांसाठी नामजपादी उपाय करायचे आहेत. तुम्हाला जसे झेपेल, तसे तुम्ही आणि पू. माई साधकांसाठी नामजप करू शकता.’’ आम्ही उभयतांनी श्रीगुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली,‘फार मोठी सेवा दिलीत. आता तुम्हीच ही सेवा आमच्याकडून करवून घ्या.’

२. प.पू. दास महाराजांनी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून साधकांसाठी नामजपाला बसल्यावर त्यांना अनेक व्याधी असूनही सलग १ घंटा नामजपाला बसता येणे

त्याप्रमाणे पू. माई सकाळी ९.३० ते १०.३० आणि मी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत साधकांसाठी नामजप करू लागलो. मी नामजपाला आरंभ करण्यापूर्वी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना केली, ‘माझ्या पायाचा अपघात झाल्यामुळे पायाला दुखापत झाली आहे. मला मानेच्या मणक्याचे दुखणे (स्पाँडिलाईटिस्)चा त्रास आहे. हृदयविकार आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांच्या व्याधी आहेत. मला दर १५ मिनिटांनी लघुशंकेला जावे लागते. गुरुदेवा, आपल्या गादीवर (उपायांच्या आसंदीवर) बसण्याची माझी पात्रता नाही. आपली आज्ञा आहे म्हणून मी आपल्या गादीवर (नामजपाच्या आसंदीवर) बसत आहे. तुम्ही तुमच्या चैतन्यशक्तीने हे नामजपादी उपाय माझ्याकडून करवून घ्या.’’ मी १००८ मण्यांची रुद्राक्षांची माळ घेऊन आणि परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून नामजपाच्या खोलीमध्ये गेलो. ‘तेथे ठेवलेल्या आसंदीत प.पू. गुरुदेव बसलेले आहेत’, असा भाव ठेवून मी आसंदीला (खुर्चीला) नमस्कार केला; कारण ते गुरूंचे स्थान आहे. मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून आसंदीत बसून जपमाळ ओढत ध्यानमग्न झालो आणि ‘१ घंटा कसा गेला ?’, ते मला कळलेच नाही. माझ्या सेवेत असणारा साधक श्री. किसन काळोखेने मला हाक मारल्यावर मी ध्यानातून बाहेर आलो.

३. प.पू. दास महाराज साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपरंपरेचे दर्शन होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पिवळ्या रंगाचे चैतन्याचे किरण त्यांच्या दिशेने येऊन त्यांच्या छातीत जाणे आणि नंतर ते त्यांच्या डोळ्यांतून साधकांकडे प्रक्षेपित होत आहेत’, अशी अनुभूती येणे

मी नामजपासाठी आसंदीत बसल्यावर पहिल्या दिवशी (१५.८.२०१८) मला प्रथम पिवळसर रंगाचा तेजस्वी प्रकाश दिसला. त्यानंतर त्या प्रकाशाचे रूपांतर भगव्या रंगाच्या प्रकाशात झाले आणि त्यातून प.पू. चंद्रशेखरानंद (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरूंच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) गुरूंचे गुरु) यांचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले. दुसर्‍या दिवशी नामजपाला बसल्यावर मला पुन्हा पिवळसर रंगाचा तेजस्वी प्रकाश दिसला. त्यानंतर त्या प्रकाशाचे रूपांतर भगव्या रंगाच्या प्रकाशात झाले आणि त्यातून प.पू. अनंतानंद साईश (प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु) यांचे रूप डोळ्यांसमोर आले. त्याप्रमाणे तिसर्‍या दिवशी नामजपाला बसल्यावर प.पू. भक्तराज महाराज आणि चौथ्या दिवशी प.पू. रामानंद महाराज (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी) यांचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले. मला सलग ५ दिवस गुरुपरंपरेचे दर्शन झाले. सहाव्या दिवशी मी नामजपाला बसल्यावर मला प्रथम पिवळसर रंगाचा तेजस्वी प्रकाश दिसला. त्यानंतर त्या प्रकाशाचे रूपांतर भगव्या रंगाच्या प्रकाशात झाले आणि त्यातून प.पू. आदिनारायण रामचंद्रस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर यांचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले अन् ते रूप माझ्यापुढे स्थिर झाले. त्यांचे रूप अगदी सजीव होते आणि त्यांच्याकडून माझ्याकडे चैतन्याचे किरण येतांना दिसले. मी त्यांच्याकडे पहात जागेवरच स्थिर बसलो होतो. त्यांच्याकडून माझ्या छातीकडे चैतन्याचे पिवळे किरण आले आणि तेच किरण माझ्या डोळ्यांतून माझ्यासमोर बसलेल्या साधकांच्या दिशेने प्रक्षेपित होऊ लागले. परात्पर गुरुमाऊलीने दिलेल्या चैतन्यशक्तीमुळे मी नामजपाला बसू शकलोे आणि साधकांना चैतन्य मिळाले.

अशा प्रकारे मी नामजपादी उपायांसाठी खोलीमध्ये गेल्यावर सर्वप्रथम तेथे ठेवलेल्या प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्राला नमस्कार करून त्यांचे दर्शन घेतो. त्यानंतर मी नामजपाच्या खोलीत बसलेल्या साधकांना नमस्कार करतो; कारण मला प्रत्येक साधकामध्ये परमेश्‍वरस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होते. जेव्हा मी नामजपासाठी  आसंदीत बसतो, तेव्हा माझ्या सर्व व्याधींचे नियंत्रण परात्पर गुरु डॉक्टररूपी परमात्माच करतो. त्यामुळे मला सलग १ घंटा बसून नामजप करता येतो.’

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०१८)

धारिकेचे संकलन करतांना साधिकेला आलेली अनुभूती !

‘या धारिकेचे संकलन करतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सुंदर रूप सारखे दिसत होते आणि ‘ते परब्रह्माचे सगुण रूप आहे’, असे जाणवले. त्यामुळे माझे दोन्ही हात आपोआप जोडले जाऊन माझ्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.११.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF