आरोग्यासंदर्भात ‘इंटरनेट’वरील माहितीवर नव्हे, तर वैद्यांवर विश्‍वास ठेवा ! – वैद्य सत्यव्रत नानल, मुंबई

वैद्य सत्यव्रत नानल, मुंबई

फोंडा, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – आजकाल रुग्ण वैद्याकडे येतांना त्याच्या रोगासंबंधीची माहिती ‘गूगल’वर शोधून आलेला असतो; परंतु स्वतः गूगलने ‘त्याने दिलेली माहिती ही संकलित माहिती असून ती माहिती तज्ञ व्यक्तीचा पर्याय होऊ शकत नाही’, असे स्पष्टीकरण (डिस्क्लेमर) दिलेले असते ! आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये दिलेले औषधांचे उपयोग हे दिशादर्शनासाठी असतात. आपले ज्ञान आणि अनुभव यांच्या आधारे कुशल वैद्य एखादे औषध त्याच्या फलश्रुतीत न दिलेल्या विकारांमध्येही वापरू शकतो. त्यामुळे इंटरनेटवर त्या औषधाचा तसा उपयोग दिलेला नसल्यास ‘वैद्याला काही कळत नाही’, असे म्हणणारे रुग्णही व्यवहारात आढळतात. ‘इंटरनेटद्वारे सर्वच माहिती मी स्वतः मिळवीन’, असा अट्टाहास न ठेवता अनुभवी वैद्यावर विश्‍वास ठेवून त्याचे ऐकण्यातच रुग्णाचे हित असते’, असे मार्गदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध वैद्य सत्यव्रत रमेश नानल यांनी येथे केले. ते ‘आरोग्य भारती, गोवा’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘धन्वंतरी पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर या दिवशी राजीव गांधी कलामंदिर, फोंडा येथे झाला.

या वेळी व्यासपिठावर वैद्य सत्यव्रत यांच्यासह आरोग्य भारतीचे संस्थापक सदस्य डॉ. टी. मंजुनाथ, पश्‍चिम क्षेत्र संयोजक डॉ. मुकेश कसबेकर, गोवा प्रांत सचिव श्री. प्रितेश देसाई आणि गोवा प्रांत कार्यकारिणी अध्यक्षा सौ. अनघा राजेंद्र आर्लेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘आरोग्य भारती, गोवा’चे सहसचिव वैद्य आदित्य बर्वे यांनी केले.

वैद्य सत्यव्रत नानल यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मांडलेली अन्य सूत्रे . . .

१. पिकलेल्या आंब्याचा रस वाटीत काढून खाल्ला, तर तो आतड्यांना लाभदायक असतो. तोच आंबा दाबून मऊ करून चोखून खाल्ला, तर हृदयाला हितकारक ठरतो. आयुर्वेदात अन्नपदार्थांच्या गुणधर्मांचा एवढ्या बारकाईने विचार केलेला आहे.

२. झाडाची साल जाऊन झाडाला झालेली जखम शेणाचा लेप केल्याने बरी होते.

३. आंब्याच्या बुंध्यावर लागलेली वाळवी घालवण्यास हिंगाचा उपयोग होतो.

४. मिरची जेवण बनवतांना त्यात अख्खी घालणे, उभी चिरून घालणे, लहान तुकडे करून घालणे, वाटून घालणे अशा विविध प्रकारे वापरता येते. प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म वेगळे आहेत.

५. आपण सर्वजण दिवसातून न्यूनतम ३ वेळा, म्हणजे मासातून (महिन्यातून) न्यूनतम ९० वेळा आहार घेत असतो. ‘आयुर्वेदाचे नियम न पाळता चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार’ हे आरोग्य बिघडवण्याचे सर्वांत मोठे कारण आहे.

६. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य परिषदेमध्ये ‘आयुर्वेदात ‘डॉक्युमेंटेशन (विकारांसंबंधी शास्त्रीय नोंदी)’ व्हायला हवेʼ, असे विधान केले. याचा सामान्य अर्थ ‘आयुर्वेदात डॉक्युमेंटेशन नाही’ असा निघतो. त्यामुळे असे विधान करणे चुकीचे आहे. ‘चरकसंहितेसारख्या शास्त्रीय आयुर्वेदीय ग्रंथांमुळेच ५ सहस्र वर्षांहून अधिक काळ आयुर्वेद टिकून आहे’, यावरून आयुर्वेदात तेव्हापासून ‘डॉक्युमेंटेशन’ आहे, हे स्पष्ट होते. आयुर्वेदाची ‘डॉक्युमेंटेशन’ची तेव्हाची पद्धत आधुनिकांप्रमाणे नसली, तरी ती शास्त्रशुद्धच आहे. ती पद्धत समजून घेणे आवश्यक आहे.

७. आयुर्वेद विनामूल्य मिळाल्याने भारतियांना त्याची किंमत नाही.

८. जेवणात सुकी मिरची वापरण्याऐवजी हिरवी मिरची वापरणे योग्य आहे. हिरवी मिरची उपलब्ध नसेल, तेव्हा ‘सोय’ म्हणून सुकी मिरची वापरावी. प्रतिदिन सोयीसाठी सुकी मिरची वापरून सवय लावणे योग्य नाही.

९. शाळेतील ८ वर्षांची धर्मांध मुले त्यांच्यासमवेतच्या हिंदु मुलांना सांगतात की, ‘त्यांच्या (धर्मांधांच्या) सैन्यापुढे भारत काहीच नाही.’ अशा मुलांविरुद्ध शाळेत तक्रार केली, तर शिक्षक ‘तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ती मुले वेडी आहेत’, असे सांगतात. आपल्यामधील वाईटाला विरोध करण्याची प्रवृत्तीच नष्ट होत आहे. आरोग्य बिघडण्याचे हेही एक कारण आहे.

१०. आज आहाराच्या संदर्भात काही चुकीच्या परंपराही पहायला मिळतात. अशा वेळी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहून या चुकीच्या परंपरा सोडून योग्य आहार घ्यायला हवा.

११. जिव्हालौल्य (हावरटपणा) हे क्लेशकारक गोष्टींमध्ये प्रधान आहे, असे चरकसंहितेत (सूत्रस्थान, अध्याय २५, सूत्र ४०) सांगितले आहे. यामुळेच पुष्कळ रोग होत आहेत, असे आज पहायला मिळते.

१२. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट पाहिल्यावर ‘पूर्वीच्या काळात मासिक पाळीच्या दिवसांत भारतीय महिलांची हेटाळणी व्हायची’, असे चित्र उभे रहाते; परंतु प्रत्यक्षात आयुर्वेदामध्ये मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रीची पुष्कळ काळजी घेण्यास सांगितली आहे. मासिक पाळीच्या काळात घराच्या बाहेर वेगळ्या खोलीत तिची सर्व व्यवस्था करण्यास आयुर्वेदात सांगितले आहे. ‘मनामध्ये वासनेचे विचारसुद्धा आल्यास त्याचा परिणाम शरिरावर होऊ शकतो’, हे लक्षात घेऊन ‘या दिवसांत तिने पतीलाही पाहू नये’, असे सांगितले आहे. आरोग्याच्या दृष्टीने या दिवसांत तिची गादी कशी असावी, तिने कसे भोजन करावे आदींचा जिथे बारकाईने विचार केलेला आहे, तिथे ‘पाळीच्या दिवसांत भारतीय स्त्री कुठचा घाणेरडा कपडा वापरायची’, हे मनाला पटण्यासारखे नाही.

कार्यक्रमाच्या वेळी ‘आरोग्य भारती, गोवा’ च्या २०१८ या वर्षीच्या ‘धन्वंतरी पुरस्कारां’नी सन्मानित मान्यवर

१. बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र चिंतामणी देव, फोंडा

२. पतंजलि योग समितीचे गोवा प्रमुख श्री. कमलेश उल्हास बांदेकर, डिचोली

३. वैद्यदांपत्य वैद्य प्रणव प्रभाकर भागवत आणि वैद्या सौ. स्नेहलता प्रणव भागवत, मडगाव

४. परिचारिका सौ. रोझालिना फर्नांडिस

५. वनौषधी तज्ञ श्री. पांडुरंग धाकू नाईक, कुडचडे


Multi Language |Offline reading | PDF