शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचा सुळसुळाट, अल्प दंडामुळे वाहनचालक मोकाट !

अवैध बसगाड्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळच होय ! याचे गांभीर्य शाळांना आहे का ? अवैध बसगाड्या ठेवणार्‍या शाळांवर सरकार काय कारवाई करणार ?

मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचा सुळसुळाट झाला असून त्यांना आकारण्यात येत असलेली दंडाची रक्कम अत्यल्प असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. त्यामुळे दंड आकारूनही वाहनचालक मोकाटपणे अवैध वाहतूक चालूच ठेवत आहेत. (अल्प दंड आकारण्याचा लाभ काय ? – संपादक) २६ नोव्हेंबर या दिवशी विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी राज्यातील शालेय अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार कोणती उपाययोजना करत आहे, याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये पुढील माहिती दिली.

२५ जून ते ९ जुलै २०१८ या कालावधीत शालेय अवैध वाहतूक करणार्‍या ६ सहस्र ४२९ वाहनांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये १ सहस्र ८६४ वाहने दोषी आढळली. तसेच १ ते १५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत पडताळणी करण्यात आलेल्या ५ सहस्र ८५४ वाहनांमध्ये १ सहस्र २४९ वाहने दोषी आढळली. अशा अवैध वाहतूक करणार्‍या एकूण ३ सहस्र ११३ वाहनचालकांकडून ४७ लक्ष ६ सहस्र इतका दंड घेण्यात आला. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या ६ मासांत पडताळणी करण्यात आलेल्या ८ सहस्र ६२३ शाळेच्या बसगाड्यांपैकी २ सहस्र ६३२ शाळेच्या बस अवैध वाहतूक करतांना आढळल्या, तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या ७ सहस्र ५९२ वाहनांची पडताळणी करण्यात आली असता १ सहस्र ७२१ वाहने अवैध वाहतूक करत असल्याचे आढळून आले.


Multi Language |Offline reading | PDF