मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल सादर करण्यावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ आणि सभात्याग ! 

• मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदार आक्रमक !

• विधानसभेचे कामकाज २ वेळा स्थगित !

जनतेचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी पोरखेळ करणारे लोकप्रतिनिधी !

मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – मराठा आरक्षणाच्या संदर्भातील अहवाल सभागृहात सादर करण्यावरून २७ नोव्हेंबरला विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. विरोधकांच्या मागणीला विरोध करण्यासाठी सत्ताधार्‍यांनीही गोंधळ घातला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहात प्रचंड गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. विरोधकांनी सभात्याग केला. सताधार्‍यांनी विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राजदंड उचलला. गदारोळ झाल्यामुळे २ वेळा विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. इतर दिवसांपेक्षा २७ नोव्हेंबरला विधानसभेत गोंधळाची तीव्रता सर्वांत अधिक होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आक्रमक होऊन ‘विरोधक कसे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी राजकारण करत आहेत’, याविषयी सांगितले.

विरोधकांना मराठा आरक्षणावरून जातीय तेढ निर्माण करायचा आहे ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणावर सरकार कायद्यानुसार काम करत आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ठाम आहोत; मात्र मागासवर्ग आयोगाच्या अहवालाऐवजी आरक्षणाचा ‘ए.टी.आर्.’ अर्थात कृती अहवाल मांडणार आहोत. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देऊ; मात्र विरोधकांच्या मनात काळंबेरं आहे.

ते केवळ राजकारण करत आहेत. विरोधकांना जातीय तेढ निर्माण करायची आहे. याशिवाय मुसलमानांना आरक्षण देण्यावरून विरोधक मुसलमान समाजाच्या भावना भडकावण्याचे काम करत असून विरोधकांना समाजात भांडणे लावायची आहेत.’’

 विरोधक मुसलमानांना फसवत आहेत !

मुसलमानांना धर्माच्या आधारे नाही, तर मुसलमान समाजातील मागास जातींच्या आधारे आरक्षण देता येते. मुसलमान समाजातील ४० ते ४५ मागास जातींना आधीपासूनच आरक्षण दिलेले आहे, तेव्हा विरोधकांनी मुसलमान आरक्षणाच्या प्रश्‍नाविषयी अपप्रचार करू नये. मुसलमान समाजातील कोणत्या जातींना आरक्षण द्यायचे असेल, तर त्याची मागणी करा. आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे ती पाठवू; मात्र विरोधकांना मुसलमानांना फसवायचे आहे. ‘खरेच त्यांचे भले हवे होते, तर (तुमच्या सत्ताकाळात त्यांना) उच्चशिक्षणात शिष्यवृत्ती का दिली नाही ?,’ असा प्रश्‍नही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी उपस्थित केला.

धनगर आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस करणार !

धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी सादर केलेल्या अहवालातील शिफारसी आम्ही केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत, तसेच धनगर समाजालाही निश्‍चित आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांचे म्हणणे विरोधकांना न पटल्याने विरोधकांनी सभात्याग केला. गोंधळातच पुरवण्या मागण्या संमत करण्यात आल्या. यावर बोलू दिले नाही; म्हणून आमदार छगन भुजबळ यांनी सभात्याग केला, तसेच दुष्काळाच्या प्रश्‍नावर चर्चा चालू करण्यात आली. या वेळी ‘विरोधकांना चर्चेसाठी बोलवावे’, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सुचवले, तर ‘विरोधकांची चर्चेची मानसिकता दिसत नाही’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांचा आक्रमक पवित्रा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘‘सभागृहात अहवाल मांडण्याविषयी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अहवाल सभागृहात मांडला जावा; कारण अहवालात काय आहे, हे जाणून घ्यायचा अधिकार प्रत्येकाला आहे. सरकारने अहवाल स्वीकारला तो सादर करण्यासाठी; मग सरकार का घाबरत आहे ? किती टक्के आरक्षण मिळेल ? धनगर समाजाचाही अहवाल अजून मांडला नाही. उच्च न्यायालयाने सांगूनही मुसलमान समाजाला आरक्षण दिले नाही.

२७ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विधेयक आणण्यावर एकमत झाले आहे; मात्र अहवाल न मांडताच थेट विधेयक मांडणार, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. ही बैठक केवळ १५ मिनिटांत संपवण्यात आली. अहवाल अथवा ‘ए.टी.आर्.’(कृती अहवाल) मांडा, अशी भूमिका मांडून मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल सभागृहात ठेवून मुसलमान समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी पुन्हा विरोधकांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाविषयी आम्ही टोकाची भूमिका घेत नाही. आम्ही चुकलो असू; मात्र आता तुम्ही दिलेला अहवाल तर सादर केला पाहिजे. विधेयक मांडण्यापूर्वी अहवाल काय आहे, हे समजले पाहिजे. विधेयक सादर करतांना कोणीही खोडा घालणार नाही; मात्र सरकार विधेयकाविषयी लपवा-लपवी करत आहे.’’

‘मराठा आरक्षणावरील चर्चा ही लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी आहे. न्यायालयाच्या बाहेरच आरक्षणावर तोडगा निघावा’, असे मत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF