काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा

आतंकवादग्रस्त भारत !

श्रीनगर – काश्मीरमधील कुलगाम येथील रेडवानी गावात सीमा सुरक्षा दलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात २७ नोव्हेंबरला सकाळी झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये एका सैनिकाला वीरमरण आले.

प्राप्त माहितीनुसार रेडवानी गावातील एका घरात आतंकवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार २६ नोव्हेंबरला रात्रीच सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी त्या परिसराला घेरले. या कारवाईच्या वेळी गावात संचारबंदी करण्यात आली होती. मध्यरात्री आतंकवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर बेछूट गोळीबार चालू केला. आतंकवाद्यांच्या या आक्रमणास सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक रात्रभर चालू होती. शेवटी पहाटेच्या सुमारास घरात लपून बसलेल्या २ आतंकवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश आले. या परिसरात अद्यापही शोधमोहीम चालू आहे.

पूलवामा येथील चकमकीत झाकीर मूसा टोळीचा आतंकवादी ठार

पुलवामा येथील हाफू भागात सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १ आतंकवादी ठार झाला. तो झाकीर मूसा टोळीचा आतंकवादी असल्याचे सांगितले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF