प्राणपणाने लढून निरपराध हिंदूंना न्याय मिळवून देऊ ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

घाटकोपर(मुंबई) येथे शिवभक्त मार्गदर्शन मेळावा

निर्दोष अविनाश पवार याच्या पाठिशी ठामपणे उभे रहाण्याचा घाटकोपर येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

मुंबई, २६ नोव्हेंबर(वार्ता.) – शिवाजी महाराज यांविषयी अवमानकारक मजकूर असलेल्या आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण केलेल्या ‘शिवाजीचे उदात्तीकरण’ नावाच्या पुस्तकाचे एल्गार परिषदेच्या व्यासपिठावर प्रकाशन करण्यात आले, तरीही मुख्यमंत्र्यांनी कोरगाव भीमा दंगलीतील दंगेखोरांवरील गुन्हे मागे घेतले. या दंगलीचे व्यवस्थित अन्वेषण केल्यास दंगलीमागील खरे सूत्रधार पुढे येतील; मात्र सरकारला त्यामध्ये रुची नाही. हेच सरकार निरपराध हिंदुत्त्वनिष्ठांवर दडपशाहीचा उपयोग करते; मात्र आम्हीसुद्धा छत्रपती शिवराय यांचे वंशज आहोत. आम्ही मागे हटणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरू, लोकजागृती करू, प्राणपणाने लढू; मात्र निरपराध धर्मबांधवांना सोडवल्याविना रहाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी शिवभक्त मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करतांना केले. यावेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक उपस्थित होते. येथील शिवसेना शाखा क्र. १२८ च्या मैदानावर स्वराज्य युवा प्रतिष्ठान आणि समस्त शिवभक्त यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. संजीव पुनाळेकर

या वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या दीड किलोमीटर अंतरावर होणार्‍या सनबर्न फेस्टीव्हलसाठी सरकारने पायघड्या घातल्या. गावातील महिलांनी दारुबंदीचा ठराव पारित केला असतांनाही सनबर्नच्या आयोजकांना सरकारने एका रात्रीत सर्व प्रकारच्या अनुमती देऊ केल्या. राज्याला महसूल मिळावा, यासाठी दारू, अंमली पदार्थ विकण्याला परवानगी देण्यात आली; मात्र नंतर हा महसूलही सरकारने माफ केला. सनबर्नचा खटला न्यायालयात चालला, तर सरकारचे नाक कापले जाईल.

मेळाव्याच्या आरंभी श्री. विवेक सावंत यांनी शंखनाद केला. श्रीगणेशाच्या श्‍लोकाने मेळाव्याला आरंभ करण्यात आला. मेळाव्याच्या आरंभी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. श्री. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या वतीने मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ३०० हून अधिक धर्मप्रेमी या मेळाव्याला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

शिवरायांचा आदर्श घेऊन अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. अभय वर्तक, धर्मप्रसारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उल्लेख करणे या देशामध्ये मोठा अपराध ठरू लागला आहे. आतापर्यंत केवळ सनातनच्या साधकांचा छळ केला जाता होता. आता समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही छळ आरंभण्यात आला आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करायची असेल, तर इतिहासाची पुनरावृत्ती करून आपापसांतील भेद विसरून हिंदू म्हणून संघटित होण्याची आवश्यकता आहे. आपली एकजूट असेल, तरच भ्रष्ट यंत्रणेला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो. जुलमी पातशाह्यांना धाडसाने नमवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने धडा शिकवण्याची मनिषा प्रत्येक हिंदूने अंतरंगामध्ये बाळगली पाहिजे.

हा मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी सर्वश्री विनोद वाडेकर, दिनेश सावंत, सुरज कुपनहाट्टे आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने हा मेळावा यशस्वी पार पडला. या मेळाव्याला नालासोपारा कथित स्फोटकाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले धर्मप्रेमी श्री. अविनाश पवार यांच्या आई, नातेवाइक आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

….तर याच व्यासपिठावर निर्दोष सुटका करून अविनाश पवार याचा सत्कार करू ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा विश्‍वास

जे तरूण सनातन तसेच अन्य हिदुत्त्वनिष्ठ संघटना यांच्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्यामध्ये भय निर्माण व्हावे, यासाठी अविनाश पवार यांच्यासारख्या हिंदुत्त्वनिष्ठांना अटक करण्यात आले आहे. अविनाश पवार निर्दोष आहे. अविनाश पवार याचा खटला सरकारने चालवला, तर लवकरात लवकर त्याची सुटका करून याच व्यासपिठावर त्याचा जाहीर सत्कार करू, असे वचन तुम्हाला देतो.


Multi Language |Offline reading | PDF