हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्र-जागृती उपक्रम राबवण्यासाठी कृती आराखडा निश्‍चित

वाराणसी येथील ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’चे यशस्वी आयोजन !

हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती

डावीकडून श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, बोलतांना पू. नीलेश सिंगबाळ आणि श्री. चेतन राजहंस

वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित ४ दिवसीय उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशन ‘जयतु जयतु हिन्दूराष्ट्रम् ।’च्या घोषात उत्साही वातावरणात पार पडले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, बंगाल, नवी देहली, ओडिशा, आसाम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतून १६४ हून अधिक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ता आणि पत्रकार अधिवेशनाला उपस्थित होते. २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उत्तर आणि पूर्वोत्तर भारतात हिंदु राष्ट्र-जागृती उपक्रम राबवण्यासाठी कृती आराखडा निश्‍चित केला, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली. पराडकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि ‘इंडिया विथ विझडम्’चे  राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी उपस्थित होते.

या अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी धर्मशिक्षणवर्ग, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, हिंदूसंघटन बैठक, हिंदू अधिवेशन आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलन आदी उपक्रम रावबण्याचे निश्‍चित केले. अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी ते करत असलेल्या हिंदुत्वरक्षणाच्या प्रयत्नांविषयी सांगितले. ‘सेक्युलर तंत्र आणि हिंदु राष्ट्र’ आणि ‘आधुनिक आणि प्राचीन शिक्षण पद्धत’ या विषयांवर घेण्यात आलेल्या चर्चासत्रांत अधिवक्ता, विचारवंत आणि पत्रकार यांनी उत्साहाने सहभाग घेतला. देशात हिंदूंना समान अधिकार मिळण्यासाठी त्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी ‘हिंदू चार्टर’ हा विषय घेण्यात आला. अधिवेशनाच्या प्रथम दिवशी ‘अधिवक्ता अधिवेशन’, तर शेवटच्या दिवशी ‘साधना शिबीर’ पार पडले. हिंदुत्वाच्या कार्यासाठी दैवी बळ मिळावे, यासाठी साधना करण्याचे महत्त्व विशद करण्यात आले.

लक्ष्मणपुरी (लखनौ) येथेही पत्रकार परिषद

डावीकडून बोलतांना श्री. शंभु गवारे, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि श्री. अंबुज निगम

लक्ष्मणपुरी (लखनौ) – उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र जागृती उपक्रम राबवणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘यूपी प्रेस क्लब’मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. शंभू गवारे आणि ‘विश्‍व हिंदु दल’चे श्री. अंबुज निगम उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF