सज्जनांनी साधना करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावे ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा षष्ठम् प्रांतीय हिंदू अधिवेशनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

डावीकडून सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, श्री. सुनील घनवट, श्री. रवींद्र प्रभुदेसाई आणि दीपप्रज्वलन करतांना डॉ. सच्चिदानंद शेवडे

मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – महान हिंदु धर्माने दिलेली तत्त्वे आचरणात आणल्यास व्यावहारिक आणि पारमार्थिक उन्नती होते. हिंदु धर्म कधीही आतंकवाद निर्माण करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुलदेवतेचा नामजप केल्याने, तसेच गुरूंच्या आशीर्वादामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. सध्याच्या काळात दुष्प्रवृत्तींचा विरोध वाढत आहे. सज्जनांनीही साधना करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावे, असे आवाहन पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. २३ नोव्हेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे षष्ठम् प्रांतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले. त्यात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. सावरकरप्रेमी आणि ज्येष्ठ लेखक श्री. दुर्गेश परूळेकर यांची उपस्थितीही अधिवेशनाला लाभली. अधिवेशनाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, संप्रदाय, स्थानिक मंडळे यांचे ७७ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. यामध्ये अधिवक्ता, आधुनिक वैद्य, पत्रकार, उद्योजक यांचा सहभाग होता.

मान्यवरांनी मांडलेले उद्बोधक विचार

भूतकाळातील उदाहरणे देऊन हिंदूंचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या पुरोगाम्यांचे डाव हाणून पाडा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार आणि लेखक

युरी बेंजोमिनो म्हणतो, ‘कोणत्याही देशाला नष्ट करायचे असल्यास देशातील लोकांचे खच्चीकरण करा. देशात अस्थिरता निर्माण करा आणि दंगली घडवून आणा.’ भारतातही सध्या अशीच स्थिती निर्माण झालेली आहे. येथील कथित पुरोगामी आणि नास्तिकतावादी मंडळी यांच्याकडून बहुसंख्य हिंदूंमध्ये भारतीय संस्कृती, हिंदूंच्या प्रथा परंपरा यांविषयी घृणा निर्माण करण्याचे काम सामाजिक संकेतस्थळे, तसेच अन्य माध्यमांद्वारे पद्धतशीरपणे केले जात आहे. हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘पुुरोगामी’ शब्दाचा अर्थ पुढचे पहाणे, पुढचा विचार करणे, असा आहे. सद्यस्थितीला मात्र पुरोगाम्यांनी स्वतःची स्थिती अशी केली आहे, की आज ‘पुरोगामी’ ही शिवी ठरू लागली आहे. जे भूतकाळाची उदाहरणे देऊन हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांना विरोध करतात, ते पुरोगामी कसे असू शकतात ? हिंदु संस्कृतीवर आघात करणारे आणि बुद्धीभेद निर्माण करणारे संदेश आपल्याला कुणी पाठवल्यास ते खरे मानून पुढे पाठवू नका किंवा त्याची उत्तरे देण्यात वेळ वाया घालवू नका. असे संदेश पाठवणार्‍यांनाच प्रतिप्रश्‍न करणारे संदेश पाठवा, म्हणजे पुरोगाम्यांचे असे डाव हाणून पाडले जातील.

आम्हाला राजकीय नव्हे; तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हवे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

विश्‍वातील प्रत्येक राष्ट्रात तेथील बहुसंख्याकांचा विचार प्राधान्याने केला जातो; मात्र भारताच्या लोकशाहीत अल्पसंख्यांकांना प्राधान्य दिले जाते, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. दिवसेंदिवस हिंदूवरील अत्याचारांत वाढच होत आहे. भरदिवसा हिंदूच्या हत्या होत आहेत. देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये आज ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. हे भारतीय लोकशाहीचे मोठे अपयश आहे. हिंदु धर्माला भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही. हे हिंदु राष्ट्र राजकीय नाही, तर धर्माधिष्ठित असेल.

सनातनला अडकवण्यासाठी आखलेल्या चक्रव्यूहाला श्रीकृष्णकृपेनेच भेदता आले ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांकडून मारेकर्‍यांना पकडण्यासाठी नव्हे, तर सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी तपास यंत्रणांवर दबाव आणला जात आहे. स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली सनातनच्या आश्रमात बळजोरीने घुसून विनाअनुमती चित्रीकरण केले जात आहे. सनातनला अडकवण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जे चक्रव्यूह आखले, ते भेदण्यामध्ये श्रीकृष्णाच्या कृपेने सनातन संस्था पूर्णत: यशस्वी झाली आहे.

खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या समर्थनार्थ संघटित व्हा ! – दीप्तेश पाटील, हिंदू गोवंश रक्षा समिती

गोरक्षक वैभव राऊत यांच्या घरामध्ये स्फोटक सापडल्याचे कथित कारण पुढे करून आतंकवादविरोधी पथकाने त्यांना कोणताही पंचनामा न करता अवैधरित्या अटक केली. नालासोपार्‍यासह राज्यभरात अनेक ठिकाणी वैभव राऊत यांनी गोरक्षा, तसेच हिंदु धर्मरक्षणाचे कार्य केले असल्याने स्थानिक समाजबांधवांसह सहस्रो हिंदू त्यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यात सहभागी झाले. या वेळी स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा उपयोग केला. मोर्च्यासाठी पुढाकार घेणार्‍यांना अटकेचे भय दाखवले. मोर्च्याच्या आदल्या दिवशी दीड सहस्र पोलिसांनी फौजफाट्यासह परिसरात संचलन करून नागरिकांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही केवळ ४ दिवसांच्या प्रचाराने मोच्यार्र्मध्ये १० ते १२ सहस्र हिंदूंनी सहभाग घेऊन संघटनशक्ती दाखवली. आजमितीला अनेक हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांखाली बंदी बनवण्यात आले आहे. या सर्वांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये सहस्रो हिंदूंचा मोर्चा काढून भविष्यात हिंदूंचे संघटन दाखवून देऊया !

हिंदूबहुल भागातील प्रस्तावित मशिदीच्या विरोधात सानपाडा येथे २७ नोव्हेंबरला आंदोलन ! – बाबाजी इंदुरे, अखिल सानपाडा रहिवाशी महासंघ

सानपाडा येथे बहुसंख्य हिंदू आणि केवळ १ टक्का मुसलमान आहेत. बहुसंख्य हिंदूंच्या जनभावनेला डावलून या ठिकाणी मशीद आणि मदरसा यांच्यासाठी प्रशासनाकडून भूखंड संमत करण्यात आला आहे. याविरोधात स्थानिक हिंदू गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत; मात्र शासन आणि प्रशासन यांनी त्याची नोंद घेतलेली नाही. या विरोधात २७ नोव्हेंबरला मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभागी व्हावे.

धर्मांतराच्या छुप्या पद्धतींच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढा द्या ! – अधिवक्ता राहुल चतुर्वेदी, तथागत सेवा संस्था

दुसर्‍या महायुद्धानंतर आजतागायत प्रत्यक्ष युद्ध लढले गेलेले नाही. सध्याचे युग हे अंतर्गत लढ्याचे असून ते लढण्यासाठी हिंदूंनी लढण्याचे नियम, पद्धती आणि कौशल्य जाणून घेण्याची आवश्यकता आहे. उल्हासनगर येथे धर्मांतरित झालेल्या सिंधी समाजातील लोकांमध्ये उच्चशिक्षित श्रीमंतवर्गाचे प्रमाण अत्याधिक आहे. मुलांना लहानपणापासून ‘कॉन्व्हेन्ट’ शाळेमध्ये घातल्याने त्यांना हिंदु धर्म, देवता यांविषयी ज्ञान नाही. परिणामी ख्रिस्ती पंथाविषयी त्यांच्यामध्ये अधिक रूची निर्माण होऊ लागली आहे. लोकांच्या घरांमध्ये, शिकवणीवर्गामध्ये प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतराचे नियोजनबद्ध काम चालते. धर्मांतराच्या या छुप्या पद्धती जाणून घेऊन हिंदूंनी त्याविरोधात कायदेशीर पद्धतीने लढा दिला पाहिजे.

हिंदूंनो, तुम्ही धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्मशील आहात ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी धर्मापासून दूर जावे, यासाठी हिंदूूंवर ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द बिंबवला गेला. ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून पंथनिरपेक्ष असा आहे. हिंदू मुळातच पंथनिरपेक्ष असल्याने भारतात शरण आलेल्या प्रत्येकाला हिंदूंनी सामावून घेतले आहे. आज हिंदूंमधील धर्मतेज जागृत करण्याची नितांत आवश्यकता असून ‘हिंदूंनो, तुम्ही धर्मनिरपेक्ष नसून धर्मशील आहात’, हे सांगण्याची वेळ आली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी या वेळी समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतांना आलेल्या अनुभवांविषयी सांगितले. हिंदू जागृत होत असून हिंदूंवरील सर्व संकटांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे, असे ते म्हणाले.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी साधना करून आत्मबळ वाढवायला हवे ! – अधिवक्ता विवेक भावे

कोणतेही काम करण्यापूर्वी देवाची प्रार्थना केली आणि ते काम प्रामाणिकपणे केले, तर यश नक्की मिळते. आपल्याला वाटते की, ‘मी’ करतो; मात्र वास्तवात दैवी शक्ती हे करत असते. धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष अटळ आहे. त्यासाठी साधना करून आत्मबळ वाढवायला हवे.

शबरीमलाप्रमाणे सर्वत्र हिंदूंचे संघटन दिसायला हवे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

शबरीमला मंदिराविषयी हिंदूंनी दाखवलेल्या संघटनशक्तीतून सर्वत्रच्या हिंदूंनी बोध घ्यायला हवा. धार्मिक परंपरांना मोडीत काढण्याचा विडा उचललेल्या तृप्ती देसाई यांना तेथील धर्मप्रेमी हिंदूंनी विमानतळाच्या बाहेरही पडू दिले नाही.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी साधनेविषयी सांगितलेले आणि सर्वांनाच प्रोत्साहित करणारे अनुभव !

गतजन्माच्या पुण्याईने मी सनातनशी जोडलो गेलो आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु लाभले !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

आपणाला जोपर्यंत समस्या येत नाहीत, तोपर्यंत आपणाला ईश्‍वराची आठवण येत नाही. यासाठीच कुंतीमातेने श्रीकृष्णाकडे दु:ख मागितले. मलाही व्यवसायामध्ये अनेक अडचणी येत होत्या; मात्र त्यांवर उत्तर मिळाले नाही. त्याच वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ठाणे येथे प्रवचन झाले. त्यामध्ये मला या अडचणींवर उत्तर मिळाले आणि मी सनातन संस्थेशी जोडलो गेलो.

पूर्वी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे राष्ट्रकार्यात सहभागी होत होतो; मात्र संघामध्ये साधना शिकवली जात नव्हती. निवृत्त झाल्यावर साधना करायची, असा माझा विचार होता; मात्र सनातनशी जोडल्यानंतर या क्षणापासून साधना करणे आवश्यक असल्याचे माझ्या लक्षात आले. मागील जन्माची पुण्याई म्हणून मी सनातन संस्थेशी जोडलो गेलो.

आपणाला अन्यांचे दोष दिसतात; मात्र स्वत:मधील दोष दिसत नाहीत. पूर्वी मला राग यायचा; मात्र साधनेत आल्यानंतर माझ्यामध्ये पालट झाला, असे मला माझ्या मित्रांनी सांगितले. अहंमुळे आपणाला अन्यांचे अस्तित्व दिसत नाही. साधनेमुळे मला आस्थापनातील सहकार्‍यांना सामावून घेऊन काम करता आले. याचा लाभ मला व्यवसायात झाला. पूर्वी मी स्वत:च्या सुखासाठी काम करत होतो; मात्र सनातनमध्ये आल्यावर मी आनंदासाठी काम करू लागलो.

व्यक्तिगत आयुष्यात कुटुंबांचा कार्यभारही भगवंतामुळेच चालू आहे, हे लक्षात येते.

धर्माचे ज्ञान नाही, अशाच मूर्ख लोकांनी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द प्रचलित केला आहे ! – अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

भगवा आणि आतंकवाद हे दोन विरोधी शब्द आहेत. भगव्याचा अर्थ ज्यांनी सर्व वासनांवर नियंत्रण केले, असा म्हणजे ‘वैराग्य’ असा आहे. भगवा असेल, तर आतंकवाद असूच शकत नाही आणि आतंकवाद असेल, तर तो भगवा असू शकत नाहीत. ज्यांना धर्माचे ज्ञान नाही, अशाच मूर्ख लोकांनी ‘भगवा आतंकवाद’ असा शब्द प्रचलित केला आहे. ते कलियुगाने ग्रासले आहेत. सनातन हिंदु धर्माकडे आध्यात्मिक चेतना आहे. हिंदूंना आतंकवादाची आवश्यकता नाही. कुत्र्याला वाचवणार्‍यांना ‘प्राणीमित्र’, म्हटले जाते; मात्र गोहत्या रोखणार्‍यांना ‘आतंकवादी’ समजले जाते. हिंदू आतंकवादी झाला, तर सृष्टी शिल्लक रहाणार नाही. हिंदू आतंकवादी नाही, क्रांतीकारी होऊ शकतात. राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांवर आघात झाला, तरच हिंदू क्रांतीकारी होतात, हा इतिहास आहे. कुणी आमच्या देव, धर्म आणि संत यांचा अवमान करावा आणि आम्ही तो शांतपणे सहन करावा का ? हिंदू जागृत होतो, तेव्हा अनिष्ट शक्ती पळून जातात.

केवळ हिंदु धर्म असा आहे, ज्यामध्ये भगवंताने प्रत्यक्ष त्याच्या भक्ताला मार्गदर्शन केले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जगात सनातन धर्माचा प्रचार करायला सांगितला नाही. गीतेमध्ये स्वार्थरहित विश्‍वकल्याणाचा उपदेश दिला आहे. हिंदूंनी श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या नावाने जगात कधीही अत्याचार केले नाहीत, तर प्रत्येक व्यक्तीचे हृदय जिंकण्याचा संदेश दिला. सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा केवळ हिंदु धर्मच आहे.

गीतेच्या उपदेशानुसार केवळ सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेच नि:स्वार्थपणे कार्य करत आहेत !

मी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला संदेश ध्यानपूर्वक ऐकला. ते माझे गुरु आहेत. त्यांनी हिंदु राष्ट्राची स्थापना भगवान श्रीकृष्ण करणार आहे, असे सांगितले. पूर्ण हिंदुस्थानात गीतेच्या उपदेशानुसार कुणी नि:स्वार्थपणे धर्माचे कार्य करत आहेत, तर ते सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत. ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपदेशानुसार हे कार्य करत आहेत. कार्य करतांना स्वार्थ आणि अहं यांचा जराही अभिलेश नाही. सर्व भगवंतच करत आहे, असा त्यांचा भाव आहे. मी जेव्हा सनातन संस्थेशी जोडलो गेलो, त्याच वेळी माझा मान, अभिमान निघून गेला. हा माझा स्वत:चा अनुभव आज मी तुम्हाला सांगत आहे.

कृतीशील हिंदुत्वनिष्ठांचे मनोगत

एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढा देऊन रस्त्यावरील नमाज बंद पाडणारे शिवसेनेचे श्री. गिरीश गुप्ता !

खारघर येथील सार्वजनिक मार्गावर प्रत्येक शुक्रवारी रस्ता अडवून त्यावर नमाजपठण केले जात होते. याचा सर्व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांना शाळेसाठी २ किलोमीटर अधिक चालावे लागत होते. मी त्या मशिदीच्या प्रमुखांना भेटून रस्त्यावर नमाज बंद करण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला पोलीस उत्तरदायी राहतील, असे पोलिसांना सांगितल्यापासून त्या ठिकाणी रस्त्यावर होणारे नमाजपठण बंद झाले.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी धैर्याने लढा देणारे कल्याण येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शुभम् गोवेकर आणि त्यांचे सहकारी !

कल्याणमधील बुद्धराज गवळी या व्यक्तीने देवतांविषयी अत्यंत गलिच्छ भाषेत १४४ कविता केल्या. याविषयी श्री. शुभम गोवेकर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असतांना पोलिसांनी त्यांच्यावर विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीही श्री. शुभम आणि त्याचे सहकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याविषयी ठाम राहून तक्रार प्रविष्ट केली. त्यामुळे गवळी यांना अटक झाली. ४ दिवसानंतर २५ सहस्र रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका झाली.

दुसर्‍या एका प्रसंगात चित्रकला, गायनकला यांच्या नावाखाली एका शिकवणीवर्गात ९ ते १६ वर्षे वयोगटातील हिंदूंच्या मुलांना ख्रिस्ती प्रार्थना म्हणण्यास आणि चित्रकलेच्या नावाखाली मुलांकडून येशूची चित्रे काढण्यास नन्सकडून सांगितले जात असल्याचे समजले. वर्गामध्ये एका ठिकाणी ‘ॐ’चे चित्र काढून त्यावर फुली मारलेली होती आणि शेजारी ‘क्रॉस’चे चिन्ह काढलेले चित्र लावले होते. तेथे जातांना शुभम यांनी पोलिसांनाही कळवले होते. त्यामुळे पोलीस वेळेत तेथे पोहोचले आणि त्यांनी सर्व साहित्य कह्यात घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.

कल्याण येथील साकेत चौकाजवळ श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने १४ डिसेंबरला साजर्‍या होणार्‍या शिवप्रतापदिनाच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

गटचर्चेनंतर हिंदू विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून कृतीशील होण्याचा अधिवक्त्यांचा निश्‍चय !

अधिवक्ता राहुल चतुर्वेदी यांनी हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची सिद्धता दर्शवली. धर्मांतर रोखण्यासाठी कशा प्रकारे कार्य करता येईल, माहिती अधिकाराचा उपयोग करून घेऊन कशा प्रकारे धर्मकार्य करता येईल, याविषयी माहिती दिली. अधिवक्ता सौ. सुधा जोशी यांनी अधिवेशनाच्या माध्यातून अधिवक्त्यांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कायदेशीर लढा देण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगून कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी आठवड्यातून एकदा एकत्र येण्याचे निश्‍चित करण्यात आले.

अधिवेशनात सहभागी झालेल्या अन्य धर्मप्रेमींनी हिंदूंनी अशा प्रकारे धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष

लोकहित प्रतिष्ठान, हिंदू युवा वाहिनी, केरळीय क्षेत्रपालन समिती, महासंघ सानपाडा, लष्कर-ए-हिंद, हिंदू गोवंश रक्षा, जनता सेवाभावी संस्था, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन, राजे प्रतिष्ठान, बजरंगदल, हिंदी भाषा जनता परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू ब्रेन्स, ब्राह्मण सेवा संघ, ह्यूमन राईट्स, वारकरी संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, शिवसेना, भाजप, तसेच स्थानिक मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी

प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे सर्वांत मोठे फलित !

आधीच्या झालेल्या ५ प्रांतीय अधिवेशनांच्या तुलनेत २३ नोव्हेंबरला झालेल्या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना भगवंतच करणार असल्याचा निर्माण झालेला विश्‍वास अन् त्यांना वाटणारे साधनेचे महत्त्व हेच या अधिवेशनाचे सर्वांत मोठे फलित होते.


Multi Language |Offline reading | PDF