भाग्यनगरमधील हिंदु जनजागृती समिती आयोजित चतुर्थ प्रांतीय हिंदू अधिवेशनामध्ये आलेल्या अनुभूती

वाराणसी येथे नुकत्याच पार पडलेल्या उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने…

हिंदु जनजागृती समिती गेली ७ वर्षे अखिल भारतीय हिंदू अधिवेशने, तसेच प्रांतीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनांच्या माध्यमांतून भारतभरातील हिंदु संघटनांना संघटित करत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने प्रेरित या अधिवेशनांमुळे आज हिंदु समाज संघटित होत आहे. हिंदु राष्ट्र अर्थात् धर्माचे म्हणजेच ईश्‍वराचे राज्य ! सर्वत्र सात्त्विकता निर्माण करण्याच्या या धर्मप्रसाराच्या कार्यात ‘ईश्‍वर कार्यकर्त्यांना कसे साहाय्य करतो’, याची धर्म कार्य करणार्‍यांना पदोपदी अनुभूती येते. याच पार्श्‍वभूमीवर भाग्यनगरमधील समितीच्या कार्यकर्त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती प्रस्तुत लेखातून जाणून घेऊया.

श्री. चेतन गाडी

१. एका धर्माभिमान्याने त्यांच्या ओळखीने केवळ १० सहस्र रुपयांमध्ये सभागृह आणि निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणे

‘१५.४.२०१८ या दिवशी भाग्यनगरमध्ये चौथे प्रांतीय हिंदू अधिवेशन होते. अधिवेशनाच्या सेवेसाठी अपेक्षित साधकसंख्या उपलब्ध नव्हती. प्रत्येक वर्षी अधिवेशनासाठी मिळणारे सभागृह या वेळी इतरांनी नोंदणी केल्यामुळे मिळू शकले नाही. त्यामुळे आम्हाला अधिवेशनासाठी दुसरे सभागृह शोधावे लागणार होते. ईश्‍वराच्या कृपेने एका धर्माभिमान्याने त्यांच्या ओळखीने केवळ १० सहस्र रुपयांमध्ये सभागृह आणि निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्या सभागृहामध्ये आसंद्या, पटल (टेबल), साउंड, प्रोजेक्टर इत्यादी सर्व व्यवस्था होती.

२. सभागृह क्षत्रिय समाजाचे असल्याने त्या समाजाच्या अध्यक्षांना संपर्क केल्यावर त्यांनी सभागृहासाठी ५ सहस्र रुपयांचे अर्पण देणे आणि साधकांचा वेळ, धन अन् ऊर्जा यांची बचत होऊन अल्प साधकसंख्या असूनही सर्व काही व्यवस्थित होणे

ते सभागृह क्षत्रिय समाजाचे होते. पूर्वी येथील क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष आपल्या सत्संगाला येत होते. आम्ही त्यांना संपर्क केला. तेव्हा ते सभागृहासाठी ५ सहस्र रुपयांचे अर्पण देण्यास सिद्ध झाले. यामुळे सभागृह आणि निवास व्यवस्था यांसाठी केवळ ५ सहस्र रुपये इतकाच व्यय (खर्च) करावा लागल, तसेच सभागृहात सर्व साहित्य उपलब्ध असल्याने दुसरीकडून साहित्य आणावे लागले नाही. त्यामुळे साधकांचा वेळ, धन आणि ऊर्जा यांची बचत होण्यास पुष्कळ साहाय्य झाले. अल्प साधकसंख्या असूनही सर्व काही व्यवस्थित झाल्याने ‘गुरुदेव आपली किती काळजी घेतात !’, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.

३. या आधी दुसरे सभागृह शोधतांना ते त्या दिवशी उपलब्ध नसल्याचे कळणे आणि त्या सभागृहाच्या मालकाने ‘यानंतर केव्हाही आवश्यकता भासल्यास विनामूल्य सभागृह देणार’, असे सांगणे

या आधी आम्ही दुसर्‍या ठिकाणी सभागृह शोधत असतांना त्या दिवशी त्या सभागृहाची आधीच नोंदणी झाल्याचे कळले. त्या सभागृहाच्या मालकाने सांगितले, ‘‘यापुढे जेव्हा कधी तुम्हाला सभागृहाची आवश्यकता भासेल, तेव्हा आम्ही ते तुम्हाला विनामूल्य देऊ.’’ तेव्हा ‘सर्व काही ईश्‍वरी नियोजनानुसार होत असते’, हे लक्षात आले.

४. सूत्रसंचालन करणारे साधक प्रथमच ही सेवा करत असल्याने सहसाधिकेने व्यस्त असूनही जागरण करून त्यांच्या सेवेची पूर्वसिद्धता करून घेणे आणि गुरुदेवांनीच त्यांना शक्ती देऊन कृपा केल्याची जाणीव होणे

प्रत्येक वर्षी अधिवेशनाच्या सूत्रसंचालनाची सेवा सौ. तेजस्वीताई करायच्या. या वेळी त्यांना वैयक्तिक अडचण आल्याने ही सेवा करणे शक्य नव्हते. त्यामुळे सूत्रसंचालन करण्याची सेवा श्री. जगन मोहन यांना देण्यात आली. दादा प्रथमच ही सेवा करत होते. सूत्रसंचालनाची धारिका तेलगु भाषेमध्ये भाषांतरित करणे, दादांना या सेवेच्या संदर्भात सर्व माहिती आणि बारकावे समजावून सांगणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण सेवा करायच्या होत्या. जगनदादा चाकरी करत असल्याने त्यांना दिवसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आयोजनाचे दायित्व असलेली साधिका सौ. विनुताताई आणि जगनदादा यांनी रात्रभर जागून सेवेची सिद्धता पूर्ण केली. गुरुदेवांनीच त्यांना त्यासाठी शक्ती दिली. गुरुदेवांनी जगन दादांना योग्य वेळी पाठवून कृपाच केली होती. सौ. विनुताताईला आयोजनाच्या दायित्वासमवेत अधिवेशनामध्ये एका विषयावर बोलायचे होते. त्या व्यस्त असूनही त्यांनी या सर्व सेवा चांगल्या प्रकारे केल्या. तेव्हा ‘गुरुदेवांना सर्व अडचणी ठाऊकच असतात आणि तेच आपल्याला साहाय्य करतात’, हे अनुभवायला मिळाले.

५. धर्मप्रेमींचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया !

५ अ. ‘अधिवेशनामध्ये चांगले वाटले. समितीच्या कार्यक्रमांना अवश्य येईन.’ – धर्मप्रेमी भरतकुमार शर्मा !

भाग्यनगरमध्ये हे चौथेे प्रांतीय अधिवेशन होतेे. या वर्षी प्रथमच एक धर्मप्रेमी भरतकुमार शर्मा अधिवेशनाला आले होते. ते अधिवेशनानंतर इतर धर्मप्रेमींसमवेत अनौपचारिक बोलत होते. त्यांनी त्यांच्या वाहिनीवर संपूर्ण अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण दाखवले. त्यांनी सांगितले, ‘‘मी कितीही व्यस्त असलो, तरी समितीच्या कार्यक्रमांना अवश्य येतो.’’

५ आ. ‘जे शोधत होतो, ते ईश्‍वराने अधिवेशनाच्या ठिकाणी दिले.’ – श्री. किरण आणि सौ. आरती !

श्री. किरण आणि सौ. आरती हे दांपत्य प्रथमच अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले, ‘आज आम्हाला पुष्कळ आनंद होत आहे आणि मनाला शांत वाटत आहे. येथील वातावरण, साधकांचा सेवाभाव आणि तळमळ पाहून आम्ही जे शोधत होतो, तेच आम्हाला ईश्‍वराने येथेे दिले.’’

त्या वेळी ‘एका जिज्ञासू जिवासाठीसुद्धा गुरुदेव अधिवेशनाचे आयोजन करतात’, याची प्रचीती आली.’

– श्री. चेतन गाडी, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, आंध्र आणि तेलंगणा.


Multi Language |Offline reading | PDF