संसदेने बहुसंख्य हिंदु समाजाला त्याचे न्यायिक अधिकार देण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे !

हिंदु जनजागृती समिती आयोजित वाराणसी येथील ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’ची सांगता

  • ६७  हिंदुत्वनिष्ठ संघटनांची हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून एकमुखी मागणी

  • भारतातील शहरांना परकीय आक्रमकांनी दिलेली नावे पालटून त्यांना पुरातन नावे देण्यासाठी ‘केंद्रीय नगर नामांतर आयोगा’ची स्थापना करण्याच्या ठरावालाही अनुमोदन

डावीकडून पू. प्रदीप खेमका, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, पू. नीलेश सिंगबाळ आणि श्री विश्वनाथ कुलकर्णी

वाराणसी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हितरक्षणासाठी, तसेच हिंदु समाजाला त्याचे न्यायिक अधिकार देण्यासाठी संसदेने भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, असा एकमुखी ठराव उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनाला उपस्थित ६७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला. विश्‍वाच्या कल्याणकरता भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होण्यासाठी सर्व हिंदू संघटनाही वैध मार्गाने प्रयत्न करतील, असा निर्धारही हिंदुत्वनिष्ठांनी केला. यासह परकीय आक्रमकांनी देशातील शहरांची नावे पालटली असून ती गुलामीची प्रतीके आहेत. त्यामुळे अशा शहरांचा प्राचीन इतिहास लक्षात घेऊन त्यांची नावे पुन्हा पालटण्यासाठी ‘केंद्रीय नगर नामांतर आयोगा’ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशनाद्वारे केली.

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनाची २४ नोव्हेंबर या दिवशी सांगता झाली. ‘बहुसंख्य हिंदूंच्या तीव्र भावनांचा विचार करून संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी, धर्मांतरबंदी आणि अयोध्येत राममंदिर स्थापनेसाठी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत’, ‘पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि भारत सरकार यांनी चौकशी करून तेथील अल्पसंख्य हिंदूंना संरक्षण देण्यात यावे’, ‘विस्थापित काश्मिरी हिंदूंचे जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन होण्यासाठी काश्मीर खोर्‍यात स्वतंत्र ‘पनून काश्मीर’ या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात यावी’, ‘नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये चौकशीद्वारे सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांचा छळ होऊ नये, यासाठी केंद्रशासनाने त्वरित पावले उचलावीत’ या ठरावांना ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणांनी अनुमोदन देण्यात आले. तसेच नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून पूर्ण पाठिंबा देण्यात आला.

२१ नोव्हेंबर या दिवशी चालू झालेल्या उत्तर आणि पूर्वोत्तर भारत अधिवेशनात आतापर्यंत ‘सेक्युलर (निधर्मी) भारत कि हिंदु राष्ट्र’, ‘प्रयागराज महापर्वात संतसंघटन आणि धर्मजागृती यांसाठी आवश्यक प्रयत्न’, ‘पाश्‍चिमात्य कॉन्व्हेंटचे शिक्षण कि प्राचीन गुरुकुलाचे शिक्षण यांपैकी काय श्रेष्ठ आहे ?’ या विषयांवर चर्चासत्रे यांसह अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अधिवेशनात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, नवी देहली, ओडिशा, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांतून हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात धर्मप्रेमींनी सामाजिक प्रसारमाध्यमांचा उपयोग करावा ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारात सामाजिक प्रसारमाध्यमांची महत्त्वाची भूमिका होती. तशाच प्रकारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात हिंदूसंघटनासाठी धर्मप्रेमींनी सामाजिक प्रसारमाध्यमांचा उपयोग करायला हवा.

सामाजिक माध्यमांद्वारे मोठे परिवर्तन होऊ शकते ! – विवेकमणी मिश्रा, प्रयागराज

हिंदुत्वाचा दुष्प्रचार करण्याच्या माध्यमातून सामाजिक प्रसारमाध्यमांवरही एक प्रकारे ‘जिहाद’ चालवला जात आहे. यापासून हिंदूंनी सावध रहावे, तसेच या जिहादचा बीमोड करण्यासाठी हिंदूंनी प्रखरपणे धर्मप्रसारासाठी या माध्यमांचा वापर करावा. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे हिंदुत्वाचे प्रभावी कार्य केले जाऊ शकते. भारतात ‘जावेद हबीब सलून’ या केशकर्तनालयाच्या अनेक शाखा चालवल्या जातात. त्यांच्या एका विज्ञापनाद्वारे देवी-देवतांचा अवमान करण्यात आला होता. या विरोधात सामाजिक माध्यमांत ‘ट्रेण्ड’ चालवल्यावर विज्ञापनापेक्षा मोठा माफीनामा त्यांना वृत्तपत्राद्वारे प्रसिद्ध करावा लागला. अशा प्रकारे सामाजिक माध्यमांद्वारे मोठे परिवर्तन होऊ शकते.

सामाजिक माध्यमांच्या वापराच्या संदर्भात अनुभव मांडतांना देवरिया (बिहार) येथील श्री. नीतेश मिश्रा म्हणाले, ‘‘बिहार येथे प्राथमिक शाळांना इस्लामी विद्यालय बनवण्याचे षड्यंत्र चालू होते. याचा विरोध करण्यासाठी एक ध्वनीचित्रफीत बनवून ती सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केली. फेसबूकद्वारे जवळपास ५० सहस्र लोकांनी ती पाहिली आणि आमच्या कार्याशी ते जोडले गेले.’’

हिंदु जनजागृती समितीचे कार्य प्रशंसनीय – नीतेश मिश्रा, देवरिया, बिहार

हिंदु जनजागृती समितीमुळे आम्हाला देशातील अनेक हिंदू संघटनांची भेट घेण्याची संधी मिळाली. समिती प्रशंसनीय कार्य करत आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ बनण्यासाठी मी काहीही करण्यासाठी सिद्ध ! – श्रीमती राणू बोरा, आसाम

आसाममधील हिंदूंची स्थिती विदारक आहे. तेथे ३ वर्षांच्या मुलीपासून ८० वर्षांच्या महिलेवरही बलात्कार होतो; मात्र हे रोखण्यासाठी सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. भारत ही संतांची भूमी आहे. येथील प्रत्येक मुलगी सीता आणि मुलगा राम आहे. भारत ‘हिंदु राष्ट्र’ बनावे, यासाठी मला काहीही करावे लागले, तरी मी ते करण्यास मी सिद्ध आहे.

हिंदुत्वनिष्ठांसाठी साधना शिबीर

कोणत्याही कार्यात यश मिळण्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठानाची आवश्यकता असते. यासाठी काळानुसार योग्य साधना करणे आवश्यक आहे. या उद्देशाने ‘हिंदुत्वनिष्ठ साधना शिबिरा’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि झारखंड राज्य धर्मप्रसारक पू. प्रदीप खेमका यांनी ‘जीवनात साधनेचे महत्त्व आणि प्रत्यक्ष साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले.

त्यानंतर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘नामजप केल्याने येणार्‍या अनुभूती, वाईट शक्तींचे त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय’ यांविषयी मार्गदर्शन केले. शिबिराच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या साधनाविषयीच्या शंकाचे निरसन केले.

अधिवेशनाच्या काळात धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. ‘हिंदू जागरण मंच’चे संयोजक श्री. रवि श्रीवास्तव मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘अधिवेशनात आलेल्या सर्वांशी एक प्रकारचे नाते जोडले गेले आहे. संत आणि धर्मप्रेमी यांच्या ज्वलंत विचारांनी आमच्यामध्ये हिंदुत्वाची मशाल पेटली असून त्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.’’

२. ओडीशा येथून आलेले धर्मप्रेमी श्री. राजकुमार शुक्ला म्हणाले, ‘‘मी येथे पहिल्यांदाच येत आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि तिच्या नि:स्वार्थ कार्यकर्त्यांना पाहून ‘हिंदु राष्ट्र साकार होण्याचा दिवस दूर नाही’, असे वाटते. समितीने आयोजित केलेले हे अधिवेशन हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या लहान-मोठ्या संघटनांना एका व्यासपिठावर आणून अंधारात तेवणार्‍या एका दिव्याप्रमाणे कार्य करत आहे. हिंदु जनजागृती समितीचे मी मनापासून अभिनंदन करतो.’’

३. धर्मप्रेमी श्री. प्रकाश चौधरी म्हणाले, ‘‘अधिवेशनाच्या स्थळी आल्यावर येथील व्यवस्था, शालीनता आणि संस्कार यांनी सुसज्ज असा मंच पाहिल्यावर ‘हिंदु जनजागृती समितीच निश्‍चितपणे हिंदु राष्ट्राच्या दिशेने आम्हाला घेऊन जाऊ शकते’, असा विश्‍वास वाटला. मी अनेक हिंदू संघटनांच्या कार्यक्रमांना जातो. तेथे गेल्यावर हिंदुत्वासाठी रक्त सळसळते; मात्र येथे आल्यावर ‘हिंदुत्वाच्या कार्यासाठी संस्कार (साधना) हेच महत्त्वाचे आहे’, हे लक्षात आले.’’

४. ओडीशा येथील धर्मप्रेमी श्री. विभूती भूषण पिल्लई म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचा प्रत्येक साधक फुलाप्रमाणे आहे. साधनेमुळे त्यांच्या तोंडवळ्यावर कायम चैतन्य दिसत असते. सेवा करतांना, बोलतांना, भोजन करतांना प्रत्येक वेळी त्यांची साधना चालू असते.’’


Multi Language |Offline reading | PDF