ते मी नाहीच !’

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा आरोप असलेल्या आणि सी.बी.आय.च्या कोठडीतून वारंवार ‘आत-बाहेर’ करणार्‍या एका व्यथित पिस्तुलाचे मनोगत !

‘नमस्कार सूज्ञ भारतीय नागरिकांनो ! आज मला अपरिहार्यतेने तुमच्यासमोर यावे लागत आहे ! २२.१०.२०१८ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सी.बी.आय.चे) उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यावर गुन्हा नोंद झाला. आलोक वर्मा यांच्यावरही शासन आणि सर्वोच्च न्यायालय यांनी वेगवेगळे ताशेरे ओढले. असे ताशेरे ओढले जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही ‘पिंजर्‍यातील पोपट’ अशी सी.बी.आय.ची संभावना सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. देशातील सर्वोच्च यंत्रणेच्या उपसंचालक दर्जाच्या अधिकार्‍यावर गुन्हा नोंद होणे आणि पोलीस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना झालेली अटक या पार्श्‍वभूमीवर ‘माझ्यावरही झालेला अन्याय लोकांसमोर आला पाहिजे’, असे मला वाटू लागले. त्यामुळे अखेर मी मनोगत लिहिण्याचा निर्णय घेतला. तसे म्हणाल, तर प्रत्येक वर्षी २० ऑगस्टला माझे नाव अग्रक्रमाने चर्चेत येतेच किंवा आणले जाते; ऑगस्ट २०१८ मध्ये नालासोपारा येथे मात्र बरीच शस्त्रे मिळाल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) केला. नंतर त्याच ए.टी.एस्.ने खोटेपणा केला म्हणून पत्रकारांनी बहिष्कार टाकला; परंतु त्या प्रकरणापासून येथे कथितरित्या अवैध शस्त्रसाठा जप्त केल्याचे प्रकरण झाल्यावर माझ्या बांधवांचे (पिस्तुलांचे) नाव प्रतिदिनच चर्चेत येऊ लागले. ‘मी’ मात्र गेल्या काही वर्षांपासून सी.बी.आय.सारख्या सर्वोच्च यंत्रणेच्या कोठडीत असल्याने ‘लकी’ ठरत आहे. माझ्यासह अनेक नवीन पिस्तुलांवर प्रतिदिन आरोप होऊ लागल्याने या प्रकरणात ‘मी’ बरीच प्रसिद्ध आहे. अर्थात् सी.बी.आय.च्या थक्क करणार्‍या दाव्यांमुळे मीही प्रचंड गोंधळून गेलो आहे. ‘आज न्याय मिळेल’, ‘मग न्याय मिळेल’, अशी अपेक्षा करत पाच वर्षे मी सी.बी.आय.च्या कोठडीत काढली, अखेर फसवले गेल्याची माझी भावना बळावत चालल्याने मी मनोगताच्या रूपाने तुमच्यासमोर आहे. या निमित्ताने अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना नेमके कुणी आणि कोणत्या पिस्तुलाने मारले ? हा प्रश्‍न वारंवार माझ्या मनात घोंगावत आहे….तुमच्याही मनात असेलच ना…?

१. नागोरी-खंडेलवाल यांच्याकडून सी.बी.आय.ने कह्यात घेतल्यानंतर मिळालेला ‘अतीप्रतिष्ठित’ दर्जा

प्रारंभ कसा झाला, हे तर तुम्हा सर्वांना आता तोंडपाठच झाले असेल. आेंकारेश्‍वर पुलावर डॉ. दाभोलकर यांची २०.८.२०१३ या दिवशी सकाळी हत्या झाली. लगोलग धावाधाव झाली आणि अपेक्षेप्रमाणे ‘सनातनच्या लोकांनी माझा वापर करून हत्या केली’, अशी ओरड चालू झाली. कुणी म्हणाले एक पिस्तूल, तर कुणी म्हणाले दोन पिस्तुले… हळूहळू अन्वेषण पुढे सरकले. कधी ही यंत्रणा, तर कधी ती यंत्रणा ! एक दिवस अचानक खंडेलवाल आणि नागोरी यांना अटक करण्यात आली. मला पोलिसांनी या दोघांच्या कह्यातून स्वत:कडे घेऊन चिकित्सेसाठी पाठवले. ‘माझाच वापर करून दाभोलकरांचा खून झाला’, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यांच्याकडून मी सी.बी.आय.च्या कोठडीत गेलो. तेव्हापासून मी ‘व्ही.आय.पी.’ (अतीप्रतिष्ठित) झालो आणि गेली अनेक वर्षे मी ‘सी.बी.आय.’च्याच कोठडीत खितपत पडलो आहे.

२. स्कॉटलंड यार्डमध्ये चाचणी हा भ्रमच !

नंतर सी.बी.आय. असेही म्हणाली की, माझा वापर पानसरेंच्या हत्येसाठीही झाला होता. सी.बी.आय.नेच पानसरे प्रकरणी न्यायालयात अर्ज केला. सी.बी.आय. न्यायालयात म्हणाली, ‘‘पानसरेंच्या हत्येत जी दोन पिस्तुले होती, त्यातील एक पिस्तुल म्हणजे मीच होतो.’’

मला तर प्रश्‍नच पडला ‘मी तर सी.बी.आय.च्या कपाटात पडून होतो. मग मी बाहेर गेलो कधी आणि गोळ्या घालून पुन्हा सी.बी.आय.च्या कह्यात आलो कधी ? पुन्हा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे दोघांच्याही हत्यांत माझाच वापर झाल्याचा चमत्कारिक निष्कर्ष काढून गोळ्या स्कॉटलंड यार्डला पाठवणार असल्याचे सांगितले गेले. ‘विशेष फॉरेन्सिक अन्वेषण झाल्यानंतर तरी माझे निर्दोषत्व जगाला कळेल’, या विचाराने मी मनोमन सुखावले की, ‘चला, विदेश पाहून येऊ. एरव्ही गंजून गेलो असतो; परंतु आता पुन्हा काही वापर होईल. निदान आता तरी सत्य बाहेर येईल !’ स्कॉटलंड यार्डला जाण्याची मी वर्षभर प्रतीक्षा केली; पण तेथेही निराशाच ! वर्षभर स्कॉटलंड यार्डचे कारण दाखवत सुनावण्या पुढे ढकलल्यानंतर अचानक सी.बी.आय.ला शोध लागला की, ‘ते’ अतीमहत्त्वाचे पिस्तूल स्कॉटलंड यार्डला पाठवूच शकत नाही; कारण तसा करारच नाही. त्यांनी तसे न्यायालयात सांगितलेही. असाच काळ पुढे सरकत होता. सुनावण्या रेंगाळत होत्या.

३. आणि अचानक कथानकाला नाट्यमय वळण !

वर्ष २०१३ मध्ये हत्या झाल्यापासून ‘सनातनचे साधक विनय पवार आणि सारंग अकोलकर यांनीच दाभोलकर आणि पानसरे यांना मारले’, अशी कोल्हेकुई केली गेली. पण काय… अचानक ऑगस्ट २०१८ मध्ये नालासोपारा येथे अवैध शस्त्रसाठा सापडण्याचे प्रकरण घडवून आणले गेले आणि कथानकाला नाट्यमय वळण मिळाले. नालासोपारा येथील गोरक्षक वैभव राऊत यांना अटक झाल्यावर काही वेगळेच ऐकायला मिळाले. अशातच अचानक शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांचेही नाव पुढे आले. ‘सचिन अंधुरे यांच्याकडून तर सी.बी.आय.ने पिस्तूलही हस्तगत केले’, असे ऐकायला मिळाले. मला वाटले, ‘आतातरी माझ्यावरचा कलंक दूर होईल. आतातरी मी मुक्त होईन.’ पुन्हा एकदा माझे दुर्दैव आड आले; कारण आता सी.बी.आय. म्हणू लागली शरद अंधुरेने २०-२२ पिस्तुल दडवून ठेवल्या होत्या आणि त्यातलेच पिस्तूल दाभोलकरांच्या खुनात वापरले होते. सप्टेंबर महिन्यात सी.बी.आय.नेच सांगितले की, कळसकरने त्याच्याकडील पिस्तुलांचे तुकडे तुकडे करून मुंबईच्या खाडीत टाकले. नेमके किती पिस्तुलांनी डॉ. दाभोलकरांना मारले ?

४. सी.बी.आय.सारख्या मोठ्या यंत्रणेकडून अन्वेषण चाचपडल्यासारखे !

प्रथम सी.बी.आय. म्हणाली की, सारंग आकोलकर आणि विनय पवार यांनी हत्या केली. नंतर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रथाच्या चांदीचा भ्रष्टाचार करणारा संजय साडविलकर याने सांगितले, ‘‘मी प्रत्यक्ष खुन्यांना पाहिले आहे.’’ त्याच्या साक्षीवरून डॉ. वीरेंद्र तावडे या अत्यंत सज्जन आधुनिक वैद्यांना अटक करण्यात आली. आता वेगळीच नावे समोर येत आहेत. नेमके कुणी मारले ? सी.बी.आय.सारखी मोठी अन्वेषण यंत्रणा अशी चाचपडल्यासारखी अन्वेषण करत आहे. सगळा गोंधळच ! जनहो, आता तुम्हीच सरकार आणि सी.बी.आय.ला विचारा, ‘‘डॉ. दाभोलकरांना नेमके कुणी आणि कोणत्या पिस्तुलाने मारले ?’’

५. ‘ते मी नाहीच’ !

माझा वापर या प्रकरणात टांगत्या तलवारीसारखा केला जात आहे. मी असा काय गुन्हा केला आहे ? नागोरी-खंडेलवाल यांच्याकडून कह्यात घेतल्यानंतर ५ वर्षांत एवढी शस्त्रपूजने झाली, तरीही माझे कधी पूजन झाले नाही. मी असाच धूळ खात पडून आहे. खरेच, आधीच सी.बी.आय.च्या कोठडीत असतांना मी पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांसाठी स्वतःहून बाहेर आलो नाही. मला कुणी ओढून नेले नाही. मी कुणाकडे गेलो नाही. खरेच, मी ‘ते’ नाहीच ! मराठी नाट्यसृष्टीत ‘तो मी नव्हेच’ हे गाजलेले नाटक आहे. त्याचप्रमाणे सी.बी.आय.च्या अन्वेषणात समोर आलेल्या एकापेक्षा एक कहाण्यांची गुंफण करून माझ्यावरही ‘ते मी नाहीच’, असे एखादे नाटक लिहिले गेले, तर तेही प्रचंड गाजेल, यात काही शंका नाही.’

– सी.बी.आय.च्या कोठडीतून पुढच्या पुढच्या हत्या करण्यासाठी ‘आत-बाहेर’ होणारे तेच ‘पीडित पिस्तूल’   

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now