देश चालवू द्या !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा माध्यमांशी असलेला ३६ चा आकडा सर्वज्ञात आहे. नुकतेच सीएन्एन् या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा ‘पास’ रहित केल्यामुळे आणि नंतर ‘एकोस्टा यांनी पुन्हा असे वर्तन केल्यास त्यांना पत्रकार परिषदेतून बाहेर फेकून देऊ’, असे वक्तव्य केल्यामुळे ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे सीएन्एन्चे प्रतिनिधी जिम एकोस्टा यांना महान बनवत आहेत. ट्रम्प यांच्याही कृतीचे समर्थन नाही; मात्र ‘प्रसारमाध्यमांच्या उद्दाम वृत्तीविषयी ठोस कृती व्हायला हवी’, याविषयी कुणाचे दुमत नसेल.

भारताची हतबलता !

आज भारतासमोरही जितक्या समस्या आहेत, त्यांच्यापेक्षाही एक मोठी आणि छुपी समस्या देशात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. ती म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली आणि ‘देशातील सर्व गोष्टींचा जणू आपणच ठेका घेतला आहे’, अशा आविर्भावात वावरणारी प्रसारमाध्यमे ! भारतात प्रत्येक वृत्तवाहिनीकडे, अगदी गल्ली-बोळांत सीएन्एन्चे प्रतिनिधी जिम एकोस्टा यांच्याप्रमाणे पत्रकार आहेत; मात्र भारताकडे ट्रम्प यांच्याप्रमाणे त्यांना खडसावणारे नेते नाहीत. त्यामुळेच देशाच्या सद्यःस्थितीचे अवलोकन केल्यास भारतात प्रसारमाध्यमेच न्याययंत्रणा आहेत, प्रशासन आहेत, पोलीसही तेच आहेत. प्रसारमाध्यमेच समाजसेवक, विचारवंत, पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावाल्यांचे कैवारी आणि मानवतावाले आहेत. त्यामुळेच थोडे खुट्ट झाले की, दिवसभर तीच तीच बातमी मोठी करून दाखवणे, संबंधितांची मुलाखत घेण्याच्या नावाखाली वेळ-काळ न पहाता प्रश्‍न विचारून भंडावून सोडणे, हे प्रकार चालू होतात. अशा प्रकारे दिवसभर बातम्यांचा भडीमार जेव्हा वाहिन्यांवर चालू होतो, तेव्हा ती वाहिनी पालटून दुसरे काहीतरी पहाण्याशिवाय काही पर्याय रहात नाही.

अशी परिस्थिती असली, तरी भारताचे केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांनी नुकतेच एका कार्यक्रमात ‘प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादणे अशक्य आहे’, असे हतबल वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांच्या विचारांतील तफावत भारतियांना विचारप्रवण होण्यास उद्युक्त करते. ट्रम्प यांनी मर्यादा सोडून आणि अवमानजनक वर्तणूक करणार्‍या पत्रकाराचे ओळखपत्र रहित करून ‘तुम्ही सीएन्एन् चालवा आणि मला देश चालवू द्या’, अशा शब्दांत त्याला समज दिली. सौदी अरेबियानेही अमेरिकेसाठी हेरगिरी करणारे पत्रकार जमाल खाशोगी यांची दूतावासात गोळ्या झाडून हत्या केली. आता प्रत्यक्ष गुन्हेगार कोण आहे, ते समोर येईल; मात्र सौदीने अमेरिकेशी सलगी केलेले खाशोगी यांच्यावर करायची ती कारवाई केलीच ! सर्वच राष्ट्रांत माध्यमांवर निर्बंध घातलेले असतात. वेळप्रसंगी त्यांच्यावर तितकीच कठोर कारवाईही केली जाते. आपल्याकडे रान का मोकळे सोडले जाते ?

आततायी वार्तांकन !

वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या नावाखाली माध्यमांनी आतापर्यंत राष्ट्रीय, राजकीय, धार्मिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत इतका खालचा स्तर गाठला आहे की, माध्यमांना आवरणे, ही आपल्या देशाची प्राथमिकता झाली आहे. जुनी काही उदाहरणे पहायची झाल्यास मुंबईवर २६/११ चे आक्रमण झाल्यानंतर सेनादलांच्या प्रत्येक हालचाली माध्यमांनी आतंकवाद्यांना पुरवल्या, पठाणकोटच्या सेनेच्या हवाईतळावर आक्रमण झाले, तेव्हाही माध्यमांनी केलेल्या तेथील अंतर्गत रचनेच्या वर्णनांमुळे आतंकवाद्यांना साहाय्यच झाले होते. मध्यंतरी प्रचंड मोठी सामाजिक उलथापालथ घडवून आणणारे विवाहबाह्य संबंधांना अधिकृत मान्यता, समलिंगी संबंधांना मान्यता आदी समाजमनावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय न्यायालयाने दिले, तेव्हा याच माध्यमांनी सामान्यांच्या मनातील भावनेला न्याय दिला नाही. विवाहबाह्य संबंधांना मान्यता मिळाल्यामुळे आता मोकळीकच मिळाली आहे, अशा प्रकारे वार्तांकन करून कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा पाया डळमळीत केला. अशा माध्यमांची तळी आता मंत्र्यांकडूनच उचलली जात आहेत, हे अधिक संतापजनक आहे.

भारतात निर्बंध का नाहीत ?

सनातन प्रभात हेही एक प्रसिद्धीमाध्यमच असूनही आम्ही या विषयावर भाष्य करत आहोत; कारण माध्यमांच्या मर्यादा आम्हाला ठाऊक आहेत. माध्यमांनी कधी न्यायाधिशांच्या भूमिकेत जायचे नसते, कुठली अन्वेषण यंत्रणा असल्याच्या आविर्भावात आरोपींचा, हत्यांचा सुगावा घ्यायचा नसतो कि मुरब्बी राजकारणी असल्याप्रमाणे सरकारच्या वा विरोधकांच्या प्रत्येक योजनेवर टीका करायची नसते. माध्यमांनी तटस्थ राहून आणि वास्तवाला धरून वृत्तांकन करावे, ही या क्षेत्राची प्राथमिकता आहे. त्याचा विपरीत परिणाम देशातील कायदा-सुव्यवस्था, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण यांवर होऊ नये, याचीही दक्षता घ्यायची असते. ती घेतली न गेल्यामुळे गेल्या ७० वर्षांत राष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळेच आम्हाला वाटते की, अन्य देशांत माध्यमांवर एवढे कठोर निर्बंध आहेत, अयोग्य वर्तन केल्यास शिक्षाही आहेत, तर भारतीय प्रसारमाध्यमांवर ते निर्बंध का घातले जाऊ शकत नाहीत ? भारतातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी माध्यमांना समज देण्याची वेळ आली आहे की, आम्हाला देश चालवू द्या. जेव्हा असे सांगणारा कुणी नसतो, उलट माध्यमांनाच डोक्यावर घेतले जाते, तेव्हा ‘वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या जोरात चालतात आणि देश रसातळाला जातो’, हे प्रत्येक भारतीय अनुभवत आहे.


Multi Language |Offline reading | PDF