‘उनाडमस्ती’ या मराठी चित्रपट निर्मात्यांचा जाहीर ‘माफीनामा’ !

  • श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीच्या प्रयत्नांना यश !

  • पंढरपूर येथील मंदिरांच्या शिखरावर प्रेमीयुगुलांचे चित्रीकरण केल्याचे प्रकरण

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीला ‘माफीनामा’ देतांना १. दिग्दर्शक सिद्धू कोळी, २. चित्रपट निर्माते बी.एम्. निळेे आणि ३. निर्माते रमेश पाटील

पंढरपूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – येत्या २८ नोव्हेंबर या दिवशी ‘उनाडमस्ती’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये येथील श्री विष्णुपद मंदिर आणि महर्षि नारद मंदिर यांच्या शिखरावर अभिनेते अन् अभिनेत्री यांचे काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर समस्त भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने सदर प्रसंगांविषयी ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ने तत्परतेने आक्षेप नोंदवल्यावर त्याचे तीव्र पडसाद सामाजिक प्रसारमाध्यमांवर उमटले होते. यानंतर चित्रपट निर्माते बी.एम्. निळे आणि दिग्दर्शक सिद्धू कोळी यांनी कृती समितीशी संपर्क साधून झालेल्या चुकीविषयी खंत व्यक्त केली, तसेच सर्व भक्तांची लेखी क्षमा मागत चित्रपटातून सर्व आक्षेपार्ह प्रसंग वगळत असल्याचे सांगितले आहे, याचसमवेत त्यांनी जाहीर ‘माफीनामा’ लिहून दिला. (हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघातांच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे अभिनंदन ! – संपादक)

‘माफीनामा’ देतांना चित्रपट निर्माते बी.एम्. निळे, दिग्दर्शक सिद्धू कोळी, निर्माते रमेश पाटील, तर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे रामकृष्ण वीर महाराज, प्रतापसिंह साळुंखे, गणेश लंके, सौरभ थिटे, ओंकार कुलकर्णी, अभयसिंह इचगांवकर, गणेश महाराज कराडकर, गणेश बेणारे, भागवत बडवे, प्रसाद हरिदास, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर आदी उपस्थित होते.

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

माफीनाम्यात म्हटले आहे की,

आम्ही या ‘माफीनाम्या’द्वारे सर्व हिंदु भाविक भक्त आणि वारकरी संप्रदाय यांची क्षमायाचना करतो. आम्ही ‘पृथ्वीराज फिल्म्स’ या बॅनरखाली ‘उनाडमस्ती’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अनावधानाने आमच्याकडून पंढरपूर येथील परम पावन श्री विष्णुपद आणि नदीपात्रातील नारद मुनींचे मंदिर या मंदिरांवर अभिनेते अन् अभिनेत्री यांचे काही प्रसंग चित्रीत केले; मात्र या चित्रपटातून ही दृष्ये, तसेच अन्यही धार्मिक भावना दुखावणारी दृष्ये काढून टाकली आहेत. भविष्यात अशा प्रकारे धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही चित्रपट किंवा चित्रीकरण आम्ही करणार नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now