सर्वोच्च न्यायालयाचा आदेश उल्लंघून वर्षभर मशिदींवर वाजणार्‍या भोंग्यांवर कारवाई का नाही ? – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘झी २४ तास’ या मराठी वृत्तवाहिनीवरील ‘रोखठोक’ या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

सतीश कोचरेकर

मुंबई – फटाक्यांमुळे होणारा अपव्यय टाळून तो पैसा राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला गेला पाहिजे. फटाक्यांवर कायमचीच बंदी आणली पाहिजे, अशी हिंदु जनजागृती समितीची भूमिका आहे. फटाक्यांवर निर्बंध घालतांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश उल्लंघून मशिदींवरून वर्षभर भोंग्यांद्वारे ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई का करत नाहीत, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्‍न पडतो. गणेशोत्सवात प्रदूषणकारी आणि शास्त्रविसंगत कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा आग्रह केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, हे आम्ही शास्त्रीय दृष्टीकोनातून सिद्ध केलेले आहे, तर कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने आम्ही तक्रार केल्यानंतर हरित लवादाने त्यावर बंदी आणली आहे. केवळ हिंदूंचे सण आल्यावर विरोधी भूमिका घेतली जाते. त्यामुळे सामान्य लोक बंडाच्या भूमिकेत जातात, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

दिवाळीच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाने केवळ रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके वाजवण्यास अनुमती दिली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवर ‘बंद नंतरची फटाकेबाजी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात श्री. सतीश कोचरेकर, श्‍वसनविकारतज्ञ डॉ. सीतेश रॉय, सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर, पर्यावरण कायदातज्ञ अधिवक्त्या साधना महाशब्दे हे मान्यवर सहभागी झाले होते. सूत्रसंचालन ‘झी २४ तास’चे प्रसाद काथे यांनी केले.

फटाके वाजवण्याने पैशांचा होणारा अपव्यय टाळून ते पैसे राष्ट्र-धर्म कार्यासाठी वापरले जावेत. केवळ काही वेळापुरती नव्हे, तर राष्ट्रविघातक फटाक्यांवर कायमची बंदी आणली पाहिजे, अशी भूमिका श्री. सतीश कोचरेकर यांनी या वेळी मांडली. या निमित्ताने श्री. कोचरेकर यांनी गणेशोत्सवासारख्या केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी प्रदूषणाची आवई उठवली जात असल्याकडेही लक्ष वेधले.

या चर्चासत्राचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत.

श्री. सतीश कोचरेकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. जेव्हा ताबूत विसर्जित केले जातात, तेव्हा प्रदूषण होत नाही का ? त्या वेळी पर्यावरणप्रेमी पुढे का येत नाहीत ? शनिशिंगणापूर असो किंवा शबरीमला मंदिर, न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मशिदींमध्ये महिलांना प्रवेश देण्याची मागणी का होत नाही ?

२. कुर्ला पोलीस ठाण्यात ‘आतापर्यंत प्रदूषण करणार्‍या किती मशिदींवर कारवाई केली ?’, असा प्रश्‍न माहितीच्या अधिकाराखाली विचारला असता, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन कारवाई करू शकत नसल्याचे सांगितले. मग कारवाई केवळ हिंदूंवरच का ? ‘माती मऊ लागली म्हणून कोपराने खणायचे’, ही हिंदूंच्या संदर्भातील पोलिसांची भूमिका आता चालणार नाही.

३. न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही आदर करतो. हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्यच आहे; मात्र अन्य धर्मियांच्या संदर्भात निर्णय घेतांना हिंदूंना दुजाभावाची वागणूक दिली जाते, अशी भावना सर्वसामान्य हिंदूंच्या मनात निर्माण झाली आहे.

प्रदूषणकारी फटाक्यांचे समर्थन करणार्‍या आणि ख्रिस्त्यांचा कळवळा असणार्‍या अधिवक्त्या साधना महाशब्दे यांना श्री. सतीश कोचरेकर यांनी दिलेले प्रत्युत्तर !

अधिवक्त्या साधना महाशब्दे म्हणाल्या, ‘‘न्यायालयाने हिंदूंना फटाके फोडण्यासाठी २ घंटे वेळ दिला; मात्र ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या रात्री १२ ते १२.३५ पर्यंतच, म्हणजे केवळ ३५ मिनिटे फटाके फोडावेत, असा निर्णय दिला आहे. (यावरून महाशब्दे यांना ख्रिसमसला प्रदूषणकारी आणि राष्ट्रविघातक फटाके फोडल्यास चालतील, असे म्हणायचे आहे का ? – संपादक) त्या तुलनेत दिवाळीत हिंदूंना २ घंटे दिले, हे पुष्कळ आहेत. (तर्कहीन उदाहरणे देऊन अल्पसंख्यांकांची बाजू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या अधिवक्त्या महाशब्दे ! कोणावर अन्याय होतो, याचा तुलनात्मक अभ्यास मांडतांना हिंदूंवरील अन्यायांची आणि अल्पसंख्यांकांवरील सुविधांची सूची पुष्कळ मोठी आहे. यावर चर्चा करण्याची महाशब्दे यांची सिद्धता आहे का ? – संपादक) या वेळी श्री. कोचरेकर म्हणाले, ‘‘३१ डिसेंबरच्या रात्री अमली पदार्थ आणि मद्य यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, यावर कधी कारवाई होणार ? ७ दिवस नवीन वर्ष साजरे होत असतांना फटाके फोडले जातात, त्यावर बंदी कधी येणार ?’’

हिंदु धर्माला मोठा भाऊ संबोधून फुकाचे सल्ले देणार्‍या अधिवक्त्या महाशब्दे !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आहे. वेदांवरील फिलॉसॉफीतून अन्य धर्म निर्माण झाले आहेत. तो एक मोठा भाऊ असल्याप्रमाणे आहे अणि त्याच्यामध्ये समजूतदारपणा आहे. एका मोठ्या भावाने स्वत:त सुधारणा करून आदर्श घालून द्यायला हवा, त्यामुळे ‘केवळ हिंदूंवरच कायदे लादले जातात’, असे म्हणणे चुकीचे आहे, असे अधिवक्त्या महाशब्दे यांनी सांगितले.

यावर श्री. सतीश कोचरेकर म्हणाले, ‘‘राम आणि भरत या भावंडांचे वर्तन सर्वांसाठी आदर्श होते. त्यामुळे लहान भावाचे वर्तनही भरताप्रमाणे आदर्श असायला हवे. आम्हाला कसाब चालणार नाही, कलाम चालतील, असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. मोठ्या भावाकडून चांगले वागण्याची अपेक्षा केली जाते, तेव्हा लहान भाऊही संस्कारी असायला हवा.’’

यावर सूत्रसंचालक म्हणाले, ‘‘मोठ्या भावाचे दायित्व नाही का की त्याने लहान भावाला संस्कारी करावे ?’’

त्यावर श्री. कोचरेकर म्हणाले, ‘‘संस्कारी करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद असे पर्याय वापरावे लागतात. लहान भावाच्या भूमिकेत पारसी, ज्यू यांना हिंदूंनी सामावून घेतले आहे. त्यांची भरभराटही येथे झाली आहे. अब्दुल कलाम यांच्यासारखी व्यक्ती राष्ट्रपतीपद भूषवते, तेव्हा हिंदूंनी विरोध केला नव्हता. कोणी देशविरोधी कारवाया करत असेल आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करत नसेल; तर ते अयोग्य आहे. जशी हिंदूंकडून अपेक्षा केली जाते, तशी अन्य धर्मियांकडून कायद्याचे पालन करून घेणे पोलीस आणि प्रशासन यांचे दायित्व आहे.

या वेळी श्‍वसनविकारतज्ञ डॉ. सीतेश रॉय आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनीही त्यांची भूमिका मांडली.


Multi Language |Offline reading | PDF