महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘भूमी आणि पर्यावरण यांवर मानवाचा सूक्ष्म प्रभाव’ या विषयावर आध्यात्मिक शोधप्रबंध सादर

हेडलबर्ग (जर्मनी) येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषद

शोधप्रबंध सादर करतांना सौ. ड्रगाना किस्लोव्हस्की

हेडलबर्ग (जर्मनी) – ‘आध्यात्मिक आणि सूक्ष्म पैलू लक्षात न घेता भूमीचे परीक्षण केल्यास आपण परीक्षणात लक्षात घ्यावयाच्या ५० टक्के सूत्रांपासून वंचित रहातो. भौतिकवादी वर्तन, आध्यात्मिक साधनेचा अभाव, स्वभावदोष आणि अहं यांमुळे प्रभावित प्रत्येक व्यक्तीचे विचार अन् वृत्ती यांमुळे वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ती स्पंदने भूमी, जल, वनस्पती आणि प्राणी यांद्वारे ग्रहणही केली जातात. त्यामुळे सध्या जगभरातील भूमी आणि जल आध्यात्मिक स्तरावर प्रदूषित आहे. याच्या जोडीला मानवाच्या या त्रुटीचा अपलाभ घेत नकारात्मक स्पंदने वातावरणातील एकूण नकारात्मकता वाढवतात. याचा मानवजातीवर अनिष्ट परिणाम होतो. आपण वैयक्तिक स्तरावर मानवजातीमध्ये समग्र परिवर्तन घडवू शकत नाही; परंतु आपण साधना केल्याने आपल्या भोवती एक संरक्षककवच निर्माण होऊन आपण मानसिक स्थैर्य आणि उच्च गुणवत्तायुक्त जीवन साध्य करू शकतो’, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. ड्रगाना किस्लोव्हस्की यांनी केले. त्या २६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी हेडलबर्ग, जर्मनी येथे संपन्न झालेल्या ‘स्थळे आणि चलन-वलन : नागरी आणि अतिनागरी संशोधना’च्या संदर्भातील ९ व्या आंतरराष्ट्रीय परिषदे’त बोलत होत्या. या परिषदेचे आयोजन ‘द स्पेसेस अ‍ॅण्ड फ्लो रिसर्च नेटवर्क’ आणि ‘कॉमन ग्राऊंड रिसर्च नेटवर्क’ यांनी केले होते. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर सहलेखक श्री. शॉन क्लार्क आणि सौ. ड्रगाना किस्लोव्हस्की आहेत.

आपल्या शोधनिबंधात सौ. किस्लोव्हस्की यांनी मातीमधून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी फेब्रुवारी २०१८ मध्ये चालू करून ९ मास चाललेल्या एका अद्वितीय प्रयोगाविषयी माहिती दिली.

सौ. किस्लोव्हस्की पुढे म्हणाल्या की,

१. या प्रयोगात एकूण २४ देशांतील १६९ मातीच्या नमुन्यांचा माजी अणूशास्त्रज्ञ डॉ. मन्नम् मूर्ती यांनी विकसित केलेल्या ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यु.टी.एस्.) या आधुनिक उपकरणाच्या साहाय्याने अभ्यास करण्यात आला. या उपकरणाने वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा, तसेच त्यांच्या भोवतालची प्रभावळ मोजता येते. या उपकरणाने केलेल्या नोंदींमध्ये जगभरातील मातीच्या बहुतांश नमुन्यांमध्ये सकारात्मक ऊर्जेच्या तुलनेत नकारात्मक ऊर्जा अधिक असल्याचे आढळले. भारतातील एका आध्यात्मिक संशोधन केंद्रातील विविध ठिकाणच्या ८ मातीच्या नमुन्यांमधील अत्युच्च सकारात्मकतेमुळे एकूण प्रयोगाच्या निष्कर्षांवर परिणाम होत असल्याने ते नमुने वगळण्यात आले. उर्वरित १६१ मातीच्या नमुन्यांपैकी ७९ टक्के नमुन्यांमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे आढळले. केवळ २० टक्के, म्हणजे ३२ नमुन्यांमध्ये सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळली.

२. हे ३२ मातीचे नमुने केवळ क्रोएशिया, श्रीलंका आणि भारत या तीन देशांतील होते. क्रोएशियातील मातीच्या नमुन्यांपैकीही केवळ एका आश्रमाभोवतीच्या नमुन्यात सकारात्मकता आढळली. श्रीलंकेतील नमुन्यांपैकी केवळ रामसेतूसारख्या तीर्थक्षेत्राच्या भोवतीच्या मातीच्या नमुन्यांमध्येच सकारात्मकता आढळली. इंडोनेशिया आणि नेपाळ येथील २ नमुन्यांमध्ये काही अंशी सकारात्मकता आढळली; परंतु त्यातही सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नव्हती. अंत्यविधीच्या स्थानांमध्ये सर्वाधिक नकारात्मकता आढळली; परंतु त्यातही दफन भूमींमध्ये दहन भूमींच्या तुलनेत पुष्कळ अधिक नकारात्मकता होती.

३. मुळात जगभरातील मातीच्या नमुन्यांमध्ये एवढी नकारात्मकता का आहे ? सध्या आपल्या भोवतीचे विश्‍व सतत अस्थिरतेच्या स्थितीत आहे. कोणत्याही क्षणी सामाजिक अस्थिरता, नैसर्गिक आपत्ती, आतंकवादी कृत्य किंवा युद्ध यांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. युगानुयुगे कोट्यवधी लोकांना मृत्युमुखी ढकलणारी सामाजिक उलथापालथ आणि आतापर्यंत झालेली युद्धे भले आपल्या विस्मृतीत गेली असतील; परंतु भूमीने या अनिष्ट घटनांच्या स्मृती जतन केल्या आहेत.

४. भारतातील एका आध्यात्मिक संशोधन केंद्रातील ८ मातीच्या नमुन्यांमध्ये नकारात्मकता अजिबात नसून असाधारण सकारात्मकता आहे; कारण या आध्यात्मिक संशोधन केंद्रात किमान १० ते १५ संत निवासाला असतात. तेथे सर्वजण सातत्याने स्वभावदोष निर्मूलन आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती यांसाठी प्रयत्नशील असतात. तेथे आध्यात्मिक संशोधनाचे उपक्रम अखंड चालू असतात. यामुळे आश्रमात दैवी शक्ती आकर्षित होते.

५. या प्रयोगाचे समग्र मानवजातीच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे महत्त्व आहे. एक म्हणजे भूमीचे परीक्षण करतांना तिच्यातील सूक्ष्म स्पंदनांचाही अभ्यास करायला हवा. हा नवीन पैलू या प्रयोगातून लक्षात आला. सद्यस्थितीत मानवजातीचा वातावरणावर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर थेट अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषित झालेली भूमी आणि जल यांचा समाजावर पुन्हा अनिष्ट परिणाम होत आहे. याचा मानवी मनावर नकारात्मक परिणाम होतो, ज्याचा वाईट शक्ती गैरफायदा घेतात. यातून निर्माण झालेल्या दुष्ट चक्रात मनुष्य अडकतो आणि तो आध्यात्मिक साधना थांबवून भौतिकवाद स्वीकारतो. याच्या परिणामस्वरूप समाजामध्ये अनेक गैरप्रकारांची लागण होऊन एकूण जीवनाची गुणवत्ता घसरते. प्रामुख्याने मानवनिर्मित आणि नकारात्मक स्पंदनांच्या हातभाराने वाढलेल्या वातावरणातील नकारात्मकतेमुळे पंचमहाभूतांमध्ये अस्थिरता निर्माण होते. फलस्वरूप विचित्र हवामान आणि प्रचंड नैसर्गिक आपत्ती यांसारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते. जेव्हा वातावरणात सकारात्मकता असते, तेव्हा पंचमहाभूते स्थिर असतात आणि निसर्गही नियंत्रित अन् अपेक्षित असा रहातो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now