शबरीमला येथील अय्यप्पा मंदिराच्या प्रथा-परंपरांचा सन्मान करण्यात यावा !

अमेरिकेतील अय्यप्पा भक्तांची न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासमोर मोर्च्याद्वारे एकमुखी मागणी

‘शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याविषयी जगभरातील हिंदूंचा विरोध आहे’, या गोष्टीची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेऊन त्याच्या निर्णयात पालट करावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

न्यूयॉर्क (अमेरिका) – शबरीमला येथील अय्यप्पा मंदिराच्या प्रथा आणि परांपरा यांचा सन्मान करत तेथे १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी करत अमेरिकेतील अय्यप्पाभक्त हिंदूंनी १० नोव्हेंबर या दिवशी न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासमोर मोर्चा काढून निदर्शने केली.

न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी येथील हिंदू यात सहभागी झाले होते. केरळमधील साम्यवादी सरकारने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचाही निषेध हिंदूंनी केला, तसेच हिंदूंची मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली. मोर्च्यात सहभागी झालेल्या हिंदूंनी न्यायालयाच्या निर्णयाविषयी तीव्र शब्दांत खेद व्यक्त करत भारतातील फुटीरतावादी शक्ती आणि ख्रिस्ती मिशनरी यांचा विरोध केला. मोर्च्यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

‘एकीकडे तीन तलाकच्या विरोधात पीडित महिलांनी याचिका प्रविष्ट करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, तर दुसरीकडे शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविषयी अहिंदूने केलेली याचिका ग्राह्य धरण्यात आली. मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या महिलाही ख्रिस्ती किंवा मुसलमान होत्या. त्यात एकही हिंदु महिला नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची भूमिका गोंधळात टाकणारी आहे’, असे मत मोर्च्यात सहभागी एका हिंदूने व्यक्त केले. हिंदूंनी केरळमधील साम्यवादी सरकार, अन्य राजकारणी, न्यायालय आणि प्रसारमाध्यमे यांचा निषेध केला.


Multi Language |Offline reading | PDF