‘वाचाळ’वीर !

संपादकीय

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगदलपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक सभेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून क्षमा मागितली’, अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात धादांत खोटे आणि त्यांची अपकीर्ती करणारे वक्तव्य केले. यातून त्यांनी स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीच उघड केली आहे. त्यामुळे त्यांच्या बालीश बुद्धीची कीवच करावीशी वाटते; कारण कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही सावरकरांसह सर्वच क्रांतीकारकांची रणनीती होती. त्यामुळे सावरकर यांच्याप्रमाणे सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली आणि पुढे देशकार्य चालू ठेवले. हे वास्तव सावरकरद्वेष्ट्या काँग्रेसला म्हणजेच राहुल गांधी यांना ठाऊक आहे का ? अर्थात् काँग्रेसी आणि सावरकरद्वेष तसा नवीन नाही. याआधीही संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्र लावण्यास काँग्रेसने विरोध केला होता. वर्ष १९२३ मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ ही संकल्पना मांडली होती. त्यामुळे ‘सावरकर हेच द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेचे जनक आहेत’, असे द्वेषमूलक विधान काँग्रेसचे निलंबित नेते आणि माजी केंद्रीयमंत्री मणिशंकर अय्यर यांनीही मध्यंतरी केले होते. ‘अय्यर हे ऐतिहासिक तथ्यांना चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कधीच मांडला नव्हता. हिंदुत्वाची संकल्पना त्यांनी पूर्ण विचाराअंती मांडली आहे’, असे मत इंडिया टुडेचे उपसंपादक उदय माहूरकर यांनीही सांगितले. अंदमानच्या कारागृहात सावरकर यांनी भिंतीवर लिहिलेले काव्यही मिटवण्याचा अय्यर महाशयांनी प्रयत्न केला होता. केवळ द्वेषाच्या चष्म्यातूनच पहाणार्‍या काँग्रेसींना स्वातंत्र्य हेच ध्येय नसानसांत भिनलेले, तसेच स्वदेशी, हिंदुत्व आणि अजिंक्य एकसंध हिंदु राष्ट्र यांसाठी अविरत झटणारे सावरकर कधीतरी कळतील का ?

महत्त्वाकांक्षी सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या कोठडीत ठेवून ११ वर्षे एकप्रकारे त्यांचा तेजोभंगच केला, असे म्हणता येईल. त्यांना बेड्या ठोकल्या. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टाचे कामही दिले. अशा प्रकारे सावरकर यांनी मरणप्राय यातनाच सहन केल्या; मात्र तरीही त्यांची मुत्सद्दी वृत्ती, क्रांतीकार्य करण्यासाठी लागणारी महत्त्वाकांक्षा तसूभरही अल्प झाली नाही. देशप्रेमाची ओढ, तसेच सर्वांनाच स्वतंत्र हिंदुस्थानातील शुद्ध हवेत मोकळेपणाने श्‍वास घेता यावा, या उदात्त हेतूने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. ‘मी जिंकणारच’, या आत्मविश्‍वासाने युद्धसंग्रामात उडी घेणार्‍या, ब्रिटिशांच्या पिळवणुकीतून जनतेला मुक्त करण्यासाठी वारंवार रणनीती आखणार्‍या सावरकर यांच्यावर काँग्रेसींकडून होणारी टीका म्हणजे एकप्रकारे सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार असे म्हणता येईल ! केवळ दुसर्‍याला नावे ठेवली की, आपले कर्तृत्व मिरवता येते, असे नाही. नुसती वाचाळ बडबड करणार्‍यांनी आणि सावरकर यांना लाखोल्या वाहणार्‍यांनी स्वत:ची योग्यता पडताळून पहाणेही तितकेच आवश्यक ठरते; कारण सत्तेची मनीषा बाळगणारे नव्हे, तर सावरकर यांच्याप्रमाणे खर्‍या अर्थाने संपूर्ण समाजाला समवेत घेऊन देशकार्याची धुरा सांभाळणारेच जनतेला वंदनीय असतात आणि अशा स्वातंत्र्यवीरांची चरित्रे अजरामर होतात !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तीमत्त्वाला देशभक्ती आणि देशप्रेम यांचे वलय लाभले आहे. समाजात त्यांचा अजूनही गौरव केला जातो. सावरकरप्रेमींचा वर्ग आज पुष्कळ मोठा आहेे. त्यांचे हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांविषयीचे विचार आजही अनुकरणीय मानले जातात. देशभक्ती, आत्मसमर्पण यांनी सावरकर यांचे पारडे भरलेले (ज्वलंत हिंदुत्वाने तर भारलेले) आहे; मात्र नुसतेच वाचाळवीर ठरणार्‍या राहुल गांधी यांच्या पारड्यात यापैकी काय आहे ? हा प्रश्‍न नक्कीच विचार करायला लावणारा आहे.

काँग्रेसचे शिडाचे जहाजच फडफडत आहे !

राजकारणात सर्वथा अपयशी ठरल्याने आज चहूबाजूंनी सर्वत्र राहुल गांधी यांच्यावर टीकाटीपण्णी केली जाते. त्यांची खिल्लीही उडवली जाते. न्या. लोया यांच्या संशयास्पद निधनावरून केलेले राजकीय कारस्थान असो, झाबुआ (मध्यप्रदेश) येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलावर पनामा पेपर्समध्ये नाव आल्याचा केलेला आरोप असो किंवा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि त्यांची पत्नी यांच्या आर्थिक घोटाळ्यांविषयी ‘शिर्डीचा चमत्कार’ असे ट्वीट करून साईभक्तांचा अपमान केल्याचे प्रकरण असो अशा विविध सूत्रांवरून अनेकांनी आतापर्यंत राहुल गांधी यांच्याकडे क्षमा मागण्याची मागणी केली होती; मात्र क्षमा मागणे तर सोडाच, केवळ इतरांवर टीका-आरोप करत रहाणे हेच काँग्रेसची (कु) संस्कृती दर्शवते. द्वेषाचे गलिच्छ राजकारण करणार्‍यांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?

सावरकर हे हिंदू होते. सावरकरांवर टीका करणार्‍या राहुल गांधींच्या मंदिरांना भेटी देऊन एकगठ्ठा मते मिळवण्याच्या सुप्त इच्छेला हिंदू कदापि भुलणार नाहीत. सत्तेसाठी सर्वकाही अशी मानसिकता बाळगून जणू ‘मीच अतीशहाणा’ या भूमिकेत वावरणार्‍या राहुल गांधी यांनी हवाच भरली जात नसल्याने काँग्रेसच्या शिडाच्या फडफडणार्‍या जहाजाकडे लक्ष द्यावे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now