एस्.आय.टी.कडून संशयित आरोपी अमोल काळे यांना अटक आणि ७ दिवसांची पोलीस कोठडी

कॉ. पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – अंनिसचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील पुणे येथील संशयित आरोपी श्री. अमोल काळे यांना येथील विशेष अन्वेषण पथकाने (एस्.आय.टी.ने) कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केली. एस्.आय.टी.ने श्री. काळे यांना १५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता येथील जिल्हा न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात उपस्थित केले. या वेळी १५ वे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस्.एस्. राऊळ यांनी श्री. काळे यांना ७ दिवसांची म्हणजे २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तसेच पोलीस कोठडीच्या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्री. काळे यांना त्यांच्या अधिवक्त्यांना भेटण्याची अनुमतीही दिली. न्यायालयात श्री. काळे यांच्या बाजूने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी बाजू मांडली. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या स्मिता शिंदे उपस्थित होत्या. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी एस्.आय.टी.ने १४ नोव्हेंबरला श्री. काळे यांना बेंगळूरू येथून कह्यात घेतले. त्यानंतर १५ नोव्हेंबरला त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

न्यायालयातील दुसर्‍या मजल्यावर न्यायाधीश श्रीमती राऊळ यांचे दालन होते. दालनाच्या बाहेर आणि आत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. युक्तीवाद चालू असतांना पत्रकारांसह सर्वांना आत जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. साध्या आणि गणवेशातील पोलिसांची संख्याही लक्षणीय होती. न्यायालयाच्या आवारातील सर्व अधिवक्ता, कर्मचारी आणि नागरिक हे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहून आश्‍चर्य व्यक्त करत होते.

  • श्री. अमोल काळे यांच्यासाठी न्यायालयात एवढा मोठा पोलिसांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता नव्हती, केवळ ५ ते ६ पोलिसांचा बंदोबस्त पुरेसा होता, असे एका पोलीस निरीक्षकाने पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना सांगितले.
  • श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर न्यायालय परिसराच्या आत आणि बाहेर जसा पोलिसांचा बंदोबस्त होता, तसाच बंदोबस्त श्री. अमोल काळे यांना अटक केल्यानंतर ठेवण्यात आला होता.

न्यायालयात युक्तीवाद करतांना अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन म्हणाले की,

१. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक करून एस्.आय.टी.ने समीर हाच एकमेव आरोपी असून त्यानेच कॉ. पानसरे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता.

२. त्यानंतर कॉ. पानसरे प्रकरणी तथाकथित साक्षीदार संजय साडविलकर याने सांगितले की, सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी सनातनचे साधक श्री. विनय पवार आणि श्री. सारंग अकोलकर यांच्या साहाय्याने कॉ. पानसरे यांच्या हत्येचे कारस्थान रचले होते, त्यानंतर एस्.आय.टी.ने डॉ. तावडे यांना अटक केली.

३. श्री. समीर गायकवाड यांचा या प्रकरणी काही संबंध नसल्याने न्यायालयाने त्यांना जामीन संमत केला. त्यानंतर डॉ. तावडे यांचाही या प्रकरणाशी काही संबंध नसल्याने न्यायालयाने त्यांचाही जामीन संमत केला.

४. आता ‘श्री. अमोल काळे हा कोल्हापूर येथे मुक्कामाला होता. त्याने श्री. विनय पवार आणि श्री. सारंग अकोलकर या पसार आरोपींच्या साहाय्याने येथे ‘रेकी’ करून कॉ. पानसरे यांची हत्या केली’, असे कारण पुढे करून एस्.आय.टी.ने कॉ. पानसरे हत्या प्रकरणी श्री. काळे यांना अटक केली आहे.

५. वास्तविक पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी श्री. अमोल काळे यांना बेंगळूरू येथील पोलिसांनी अटक केली होती. श्री. काळे यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देऊनही कर्नाटक पोलिसांच्या पदरी काहीच पडले नाही, तसेच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी श्री. काळे यांना अटक केल्यानंतरही न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्या वेळीही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून न्यायालयाने श्री. काळे यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली.

६. मात्र एस्.आय.टी.च्या वतीने सरकारी अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी ‘श्री. काळे यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी’, अशी मागणी केली.

७. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून श्री. अमोल काळे यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


Multi Language |Offline reading | PDF