इस्रोची कामगिरी !

संपादकीय

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने १४ नोव्हेंबरला संध्याकाळी जीएस्एटी-२९ (GSAT-29) या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. आतापर्यंतच्या सर्वांत वजनदार भारतीय उपग्रहाचे हे यशस्वी प्रक्षेपण होते. पुढील ४ वर्षांत होऊ घातलेल्या चांद्रयान-२ आणि मानवी अंतराळ मोहीम यांच्या पूर्वीचे या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे महत्त्वाचे मानले जात आहे.

प्रत्येक भारतियाला अभिमान वाटावा अशा इस्रो या संस्थेतील शास्त्रज्ञ स्वबळावर विविध उपग्रह अवकाशात सोडून भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मानाचा तुरा खोवत आहेत. उपग्रहांद्वारे भूकंप, हवामान, पाऊस, वादळ यांचा अंदाज देण्यात येतो, उदा. आज तमिळनाडूमध्ये येणार्‍या तीव्र चक्रीवादळाची माहिती उपग्रहामुळे ७२ घंट्यांपूर्वी म्हणजे ३ दिवस आधी मिळाल्याने पूर्वसिद्धता करून ठेवणे शक्य झाले आहे. या मोठ्या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भारतीय नौदल आणि ३० सहस्र सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. शहरांमध्ये अतीवृष्टीमुळे येणार्‍या पुराची पूर्वसूचना देण्यासाठी महापालिकांशी संबंध जोडून उपग्रहांकडून मिळणारी अतिरिक्त छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत; जेणेकरून मुंबई, चेन्नई येथील पूरसंकटाचा सामना अधिक परिणामकारकपणे करता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपग्रहाद्वारे मिळणार्‍या माहितीने रेल्वेफाटक बंद करणे आणि उघडणे यांसारख्या गोष्टी करणेही शक्य होणार आहे. माहिती तंत्रज्ञानातील विविध क्षेत्रांमध्ये आणि इंटरनेट या क्षेत्रांत उपग्रहांमुळे प्रगती करणे शक्य झाले आहे. त्याच्या सुविधांचा लाभ प्रसिद्धीमाध्यमांसह सर्व जनता मोठ्या प्रमाणात घेत आहे. सीमांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीही ‘पीएस्एल्वी सी १२’ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले गेले आहे. आरंभी हा इस्रायली तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात आला होता; परंतु त्याहीपेक्षा कितीतरी अधिक सक्षम असलेला उपग्रह भारत आता निर्माण करत आहे. विशेष म्हणजे इस्रोचे आतापर्यंतचे प्रमुख संचालक हे श्रद्धाळू आणि ईश्‍वरावर विश्‍वास ठेवणारे होते आणि आहेत. इस्रोमध्ये निर्माण होणार्‍या उपग्रहाची प्रतिकृती प्रथम बालाजीला अर्पण केली जाते. देवावरची ही श्रद्धाच कदाचित् इस्रोच्या संशोधकांना प्रत्येक टप्प्याला यश देत आहे.

देशाच्या सुरक्षेतील उपग्रहाचे स्थान

इस्रोचा हा अत्याधुनिक आणि प्रभावी परिणाम देणारा दळणवळण उपग्रह प्रामुख्याने जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दळणवळण क्षेत्राचा विकास करण्यासाठी पुढील १० वर्षांसाठी कार्यरत रहाणार आहे. आज ईशान्य भारतातील ७ राज्ये आणि जम्मू-काश्मीर राज्य यांच्या संदर्भात सीमा अन् अंतर्गत सुरक्षा यांची जी जटील आणि अतीगंभीर समस्या आ वासून उभी आहे, त्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेस सरकारने गेल्या ७ दशकांत या प्रदेशांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष हे आहे. यामुळे हा प्रदेश जणू भारतापासून तुटल्यासारखा झाला आहे, हे वास्तव आहे. जीएस्एटी-२९ या उपग्रहामुळे ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरचे दुर्गम भाग इंटरनेट सुविधेने जोडता येतील. ईशान्येमध्ये जितक्या सैनिकांना प्राण गमवावे लागले, तितके बळी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढतांनाही गेलेले नाहीत. आसाममध्ये उल्फा आणि बोडो या गटांचा संघर्ष आहे. पूर्वांचलातील राज्यांचे ख्रिस्तीकरण झाले आहेच, त्याचसमवेत बांगलादेशी घुसखोरांनीही तिथे आता थैमान घातले आहे. ईशान्य भारतातील बंडखोरीची परिस्थिती सुधारण्यासाठी, तेथील हिंसाचारी कारवाया थांबवण्यासाठी गृहमंत्रालय आणि सैन्य यांच्या संयुक्त कारवायांची आवश्यकता आहे. या सार्‍यासाठी इंटरनेट सुविधा उपयोगी पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्रोच्या या उपग्रहाकडून आगामी काळात केली जाणारी कामगिरी ही या प्रदेशाला आणि या प्रदेशातील नागरिकांना भारताशी जोडण्यास साहाय्य करू शकेल, अशी आशा आहे.

इस्रोच्या कामगिरीकडे दुर्लक्ष !

अमेरिकेची जगप्रसिद्ध ‘नासा’ संस्था अन्य देशांच्या अंतराळ संशोधनातील प्रगतीविषयी माहिती देत नाही, असे लक्षात येत आहे. नासाच्या ट्विटर खात्यावर भारताच्या या यशस्वी उड्डाणाविषयी उल्लेख करणे टाळण्यात आले आहे. ही गोष्ट राष्ट्रप्रेमी भारतियांच्या दृष्टीतून सुटलेली नाही. प्रत्यक्षात नासात बहुसंख्येने भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत, हे जगजाहीर आहे; इतकेच नव्हे, तर नासातील शास्त्रज्ञ वेदांतील श्‍लोकांचा मूलाधार ग्राह्य धरून अनेक क्षेत्रांतील पुढचे संशोधन करत आहेत, हे त्यांनी आपल्याकडील शास्त्रज्ञांना सांगितल्याचेही प्रसिद्ध झाले आहे. असे असूनही भारतीय अंतराळ संशोधनाशी संबंधित वृत्त न देणे, हे अमेरिकी भारतद्वेषाचे प्रतीक असू शकते. अमेरिका हा परकीय देश असल्याने ही गोष्ट आपण समजू शकतो; परंतु भारतातही वरील वृत्ताचे मूल्य अधिक असूनही अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी मात्र भारतातील अभिनेत्यांनी परदेशात जाऊन केलेल्या विवाहाच्या वृत्ताला अधिक महत्त्व दिल्याचे लक्षात आले. यावरून प्रसारमाध्यमे आणि या देशातील सर्वसामान्य जनता यांची मानसिकताही प्रकर्षाने लक्षात आली. अशा प्रकारे राष्ट्रप्रेमाचा अभाव असलेली प्रसारमाध्यमे अन् जनता एकीकडे आणि देशाच्या विकासाचे स्वप्न पहाणारे पंतप्रधान एकीकडे हा विरोधाभास प्रकर्षाने लक्षात येण्यासारखा आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now