संगीत साधना करणार्‍या कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

संगीताच्या माध्यमातून साधना करून आध्यात्मिक उन्नती केल्याचे आणि दोन सख्ख्या बहिणींनी एकाच माध्यमातून साधना करून एकाच वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचेही सनातनच्या इतिहासातील पहिले उदाहरण !

कु. तेजल पात्रीकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना पू. अशोक पात्रीकर
सौ. अनघा जोशी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना पू. अशोक पात्रीकर

रामनाथी (गोवा) – विविध गुण आणि कौशल्य यांच्या आधारे ‘स्व’ला ईश्‍वरचरणी अर्पण करण्याचा मार्ग म्हणजे ‘कला’ ! १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्‍वाला दिलेली अनमोल देणगी आहे. कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती होते; मात्र सद्य:स्थितीत कलाक्षेत्र ‘ईश्‍वरप्राप्ती’ या मूळ उद्देशापासून पुष्कळ दूर गेल्याचे आढळत आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१५ मध्ये संगीत विभागांतर्गत अभ्यास आणि संशोधन यांना आरंभ करण्यात आला. ‘संगीताच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती कशा प्रकारे होते’, हे सनातनच्या साधकांनी आज अनुभवले. पात्रीकर कुटुंबातील दोघी बहिणी कु. तेजल (वय ४० वर्षे) आणि सौ. अनघा जोशी (पूर्वाश्रमीच्या कु. मीनल पात्रीकर) (वय ३८ वर्षे) या ‘संगीत’ या एकाच क्षेत्रातून एकाच वेळी ईश्‍वराजवळ पोहोचल्या असून त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आश्रमात पार पडलेल्या एका सत्संगात घोषित केले. कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी, म्हणजे १४ नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या सत्संगात सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. अशोक पात्रीकर, पू. जयराम जोशीआजोबा आणि पू. पद्माकर होनप यांची वंदनीय उपस्थिती होते. तसेच सौ. शुभांगी पात्रीकर (पू. अशोक पात्रीकर यांच्या पत्नी), श्री. निखील पात्रीकर ( पू. अशोक पात्रीकर यांचे पुत्र) आणि सौ. अनघा जोशी यांचे पती श्री. शशांक जोशी (पू. अशोक पात्रीकर यांचे जावई), संगीताच्या माध्यमातून साधना करणारे साधक अन् अन्य साधक उपस्थित होते. या प्रसंगी कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांचा त्यांचे वडील पू. अशोक पात्रीकर यांनी सत्कार केला.

असे उलगडले गुपित !

एकाच वेळी प्रगती करणार्‍या कु. तेजल आणि सौ. अनघा यांचा सत्कारानंतरचा भावक्षण

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दौर्‍यावर असतांना दक्षिण भारतातील संगीतक्षेत्रातील एका अभ्यासू व्यक्तीला भेटल्या होत्या. आश्रमातील साधकांना त्या अभ्यासू व्यक्तींंचे मार्गदर्शन मिळावे; म्हणून सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे आगमन होण्यास काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत संगीताचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांच्याकडे जाऊन आल्यावर साधकांनी त्यांना आलेल्या अनुभूती सर्वांसमोर मांडल्या. या वेळी साधकांनी ‘संंगीत ही साधना कशी आहे ?’, ‘त्याचा स्वत:सह निसर्गावर होणारा परिणाम’, तसेच ‘संगीताद्वारे अनुभवता येणारी भावावस्था, ध्यानावस्था आणि आनंदावस्था’, यांविषयी सांगितले.

हे अनुभव ऐकत असतांनाच सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आध्यात्मिक प्रगतीचे गुपित अलगद उलगडले. त्या म्हणाल्या, ‘‘संगीत साधनेचे महत्त्व स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ‘समष्टीला भारतीय संगीताचे महत्त्व पटावे’, यासाठी विविध आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रयोग करण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग करणे, समष्टीशी निगडित नियोजनादी कृतींशी समरस होऊन सेवा करण्यासह भावपूर्ण गीत गाणे, गातांना अंतर्मुख राहून निर्विचार अवस्था, त्यापुढे जाऊन ध्यानावस्था अनुभवणे, अशा प्रकारे अंतर्बाह्य ईश्‍वराशी एकरूप होत असलेल्या कु. तेजल पात्रीकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’’

देवाने दिलेल्या या आनंदवार्तेसाठी कृतज्ञता म्हणून सौ. अनघा जोशी यांनी ‘गुरुविण नाही दुजा आधार..’ हे गीत गायले. या गीतामुळे सर्व साधकांची भावजागृती झाली. तेव्हा ‘अंतरी निरागस भाव असलेल्या सौ. अनघा जोशी यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, असेही सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले. या वेळी पात्रीकर कुटुंबीय, श्री. शशांक जोशी आणि संगीतसेवेतील साधक यांनी कु. तेजल अन् सौ. अनघा यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. सर्वांत शेवटी आज कर्नाटक येथून येणार्‍या ‘त्या’ मार्गदर्शकांचे येणे रहित झाल्याचे सद्गुरु ताईंनी सांगितल्यावर ‘हे गोड क्षण गुपित ठेवण्यासाठी केलेली ती योजना होती’, हे सर्वांच्या लक्षात आले.

माझे प्रयत्न काहीच नाहीत ! कृतज्ञता ! – कु. तेजल पात्रीकर

आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर कु. तेजल काही मिनिटे हात जोडून स्तब्ध झाल्या. त्या वेळी त्यांच्या मुखावरचे भाव पाहून ‘त्या परात्पर गुरु डॉक्टरच समोर असून कु. तेजल कृतज्ञता व्यक्त करत आहेत’, असे साधकांना वाटले. मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या. माझे प्रयत्न काहीच नाहीत. केवळ कृतज्ञता !’’

‘श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला, तसा माझाही उद्धार करावा’, असे वाटत होते ! – सौ. अनघा जोशी

मनोगत व्यक्त करतांना सौ. अनघा जोशी म्हणाल्या, ‘‘श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला, तसा परमपूज्य डॉक्टरांनी माझाही उद्धार करावा’, असे मला वाटत होते. ताईची (कु. तेजल पात्रीकर यांची) पातळी घोषित केल्यावर मलाही ‘ताईप्रमाणे तळमळीने प्रयत्न करूया’, असे वाटले.’’

कु. तेजल पात्रीकर यांची कुटुंबियांनी कथन केलेली गुणवैशिष्ट्ये !

आसंदीत बसलेले पू. अशोक पात्रीकर आणि सौ. शुभांगी पात्रीकर, तर उभे असलेेले डावीकडून कु. तेजल पात्रीकर, श्री. निखिल पात्रीकर, श्री. शशांक जोशी, सौ. अनघा जोशी

‘पात्रीकर कुटुंबातील सर्वजण मनातील सर्व गोष्टी सहजपणे बोलतात. त्यांच्याकडून मनमोकळेपणा शिकायला मिळतो.’ – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

सेवा करतांना कु. तेजल पात्रीकर अनुभवत असलेली भावस्थिती !

सत्संगात कु. तेजल यांनी सांगितले, ‘‘गेली २० वर्षे मी साधनेत आहे. नामजप करतांना जेवढी भावावस्था अनुभवते, त्याहून अधिक भक्तीगीत गुणगुणतांना अनुभवायला मिळते. त्याविषयी एकदा प.पू. डॉक्टरांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘आता सूर हेच तुझ्यासाठी नाम आहे.’’

सनातनकडे सूक्ष्मसंबंधीचे विपुल ज्ञान उपलब्ध आहे. ते समष्टीला देण्याची प.पू. डॉक्टरांना तळमळ असते. त्यांच्याप्रमाणे तळमळीने प्रयत्न करून, आपणही फूल ना फुलाची पाकळी होऊन समष्टीला त्यांचे ज्ञान देत रहावे’, ‘संतांनी दिशा दिल्याप्रमाणे शिकावे’, असे वाटते. त्यामुळे संगीताच्या संदर्भातील लेख लिहितांना लेखाशी समरस होते. गातांनाही सुरांशी एकरूप झाल्याप्रमाणे वाटते. सर्व कलांची निर्मिती भगवंतापासून झाली आहे. त्याद्वारेच ‘भगवंताशी असलेल्या अद्वैताची अनुभूती घेणे’, अशी ही संगीताची साधना आहे. ‘सेवा करतांना संकुचित विचार न करता लहान लहान गोष्टींतही इतरांचा विचार कसा करावा’, हे प.पू. डॉक्टरांकडून शिकता आले. संगीत साधना करण्यासाठी ‘प.पू. देवबाबा यांच्यासारख्या संतांचेही मार्गदर्शन मिळत आहे’, त्याविषयीही कृतज्ञता वाटते.’’

१. पू. अशोक पात्रीकर (वडील)

‘अनेक प्रसंगांतून ‘तिची अंतर्मुखता वाढली आहे’, हे लक्षात येत होते. पूर्वी ती सेवेशी संबंधित केवळ चांगली सूत्रेच सांगत असे. चांगले झाले की, अहं वाढत जातो. तिची प्रकृती ठाऊक असल्याने मी तिला तिच्याकडून होणार्‍या चुकांकडे पहाण्याविषयी सांगत असे. काही कालावधीपूर्वी तिच्याकडून १ मास नामजप झाला नव्हता. त्यामुळे तिच्या मनात नकारात्मक विचार येत होते. तिला ते लक्षात आणून दिल्यावर ती हळूहळू प्रयत्न करू लागली.’

२. सौ. शुभांगी पात्रीकर (आई)

‘तिचा इतरांचा विचार करणे, प्रत्येक गोष्ट सांगणे, अंतर्मुख रहाणे हा भाग वाढला आहे. ती सतत आनंदी आणि उत्साही असते. काल रात्री संगीतविषयक एक मुलाखत संपण्यास उशीर झाला होता, तरी सकाळी उठल्यावर ती पुष्कळ उत्साही दिसत होती.’

३. श्री. निखिल पात्रीकर (भाऊ)

‘गेल्या १ मासापासून ताई स्थिर झाल्याचे वाटत आहे. पूर्वी तिच्या मनात नकारात्मक विचार असतील, तर तिचा तोंडवळा पडलेला दिसत असे. आता ती त्यातून लवकर बाहेर पडते. संगीताचे प्रयोग संपून घरी येण्यास तिला विलंब होतो, तरीही घरी आल्यावर ती स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची सारणी लिहिते. जेव्हा पूर्ण लिखाण करणे शक्य नसेल, तेव्हा ती किमान चुकांची नोंद तरी करून ठेवते. ती संगीत साधना करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभवलेला आनंद सर्वांना देते. पूर्वी मला ती भावनिक स्तरावर हाताळत असे. आता तत्त्वनिष्ठतेने माझ्या चुकाही सांगते.’

पात्रीकर कुटुंबातील प्रत्येकालाच मिळाली कु. तेजल पात्रीकर यांच्या प्रगतीची पूर्वसूचना !

१. पू. अशोक पात्रीकर (वडील) : ‘काही दिवसांपूर्वी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले होते, ‘‘मला तेजलची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के व्हावी’, असे वाटणे योग्य कि अयोग्य ?’’ तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘हा सात्त्विक अहं आहे.’’ कु. तेजलने आज ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. यावरून ‘करवून घेणारे तेच आहेत’, हे लक्षात आले.’’

२. सौ. शुभांगी पात्रीकर (आई) : आज सकाळी तेजल उठली, तेव्हा तिचा तोंडवळा पुष्कळ उत्साही आणि आनंदी दिसत होता. तेव्हाच ‘तिची पातळी ६१ टक्के झाली असेल’, असे मला वाटले होते. ते मी बोलूनही दाखवले.

३. सौ. अनघा जोशी (बहीण) : ‘काही दिवसांपूर्वी मला ‘ताईची पातळी ६१ टक्के घोषित झाली आहे’, असे स्वप्न पडले होते.’

४. श्री. शशांक जोशी (मेहुणे) : ‘आज तेजलताई यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होईल’, असे वाटले होते.’

५. श्री. निखिल पात्रीकर (भाऊ) : ‘काही दिवसांपूर्वी आश्रमातील ८ साधकांनी ६१ टक्के पातळी गाठली होती. तेव्हा ‘आता ताईचीही पातळी घोषित होईल’, असे वाटले होते.’

सद्गुरूंनी कु. तेजल पात्रीकर यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘कलेचा मन, बुद्धी, चित्त यांवर परिणाम होत असतो. प्रत्येकाला त्याच्या साधनेसाठी दिलेल्या माध्यमातून त्याची प्रगती होत असते. कु. तेजल भाव, तळमळ, चुकांमधून शिकणे, झालेल्या चुका मोकळेपणाने सांगणे या प्रयत्नांसमवेत प.पू. डॉक्टरांनी पूर्वी संगीताच्या संदर्भात केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करत गेली. संगीताच्या संदर्भात होत असलेले विविध आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रयोग, त्यांचे चित्रीकरण, त्या सेवांतील बारकावे समजून घेणे, संगीताच्या माध्यमातून साधना करणार्‍या साधकांना साधनेची पुढची दिशा देणे, संगीतविषयीचे ज्ञान समष्टीसमोर शीघ्रतेने जाण्यासाठी तत्परतेने लेख लिहिणे, अशी संगीतसेवेची व्याप्ती मोठी आहे. या सेवा तिने पुढाकार घेऊन केल्या. तेजलमधील गुणांमुळे तिला हे दायित्व भगवंताने विश्‍वासाने दिले आहे. त्या सेवा शिकत असतांनाच तिने प्रगती केली.’

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘सत्संगाच्या ठिकाणी आल्यावर मी पात्रीकर कुटुंबियांना एकत्रितपणे पाहिले, तेव्हा माझे लक्ष तेजलताईकडे गेले. बघताक्षणी ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, असे मला वाटले. २ दिवसांपूर्वी मी संगीताचे विविध घटकांवर होणारे पीरणाम याविषयी आश्रमात होणारे प्रयोग पहाण्यासाठी गेलो होतो, तेव्हा ‘प्रयोग कशा प्रकारे घेतला जातो’, ‘त्यात करण्यात येणारे परीक्षण’, अशी सर्व माहिती मला तेजलताईने शांतपणे सांगितली. थोड्या वेळाने अन्य एक साधक कुटुंब प्रयोग पहाण्यासाठी आल्यावर ताईने तेवढ्याच शांतपणे त्यांनाही प्रयोगाविषयी माहिती सांगितली. तेव्हा त्यांच्यातील शांत बोलणे आणि संयम हे गुण लक्षात आले.

काही दिवसांपूर्वी मला एक वेगळी ध्वनीफीत (ऑडिओ) मिळाली होती. त्याविषयी मी तेजलताईंना सांगितल्यावर त्यांनी ‘आपल्याला अभ्यास करता येईल, त्यामुळे तुम्ही मला पाठवा’, असे लगेच सांगितले. यातून त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती दिसली.

तेजलताईंनी ‘धन्य धन्य हम हो गए गुरुदेव..’ हे गीत इतके भावपूर्ण गायले आहे की, एखाद्या दगडाचीही भावजागृती होईल. ते गीत पुन:पुन्हा ऐकावे वाटते. त्यातून भाव जागृत होतो.’

चालवती हे जीव संगीतज्ञानाचा वारसा !

श्री गुरूंनी दिला संगीत-ज्ञानाचा वसा ।

चालवती हे जीव हा पुढे वारसा ॥

करिती साधना संगीताची ।

आराधना जणू नटराजाची ॥ कन्यारत्ने ही संतांची ।

अनुभूती घेती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तीची ॥

घोषणा करूनी कु. तेजल पात्रीकर

आणि सौ. अनघा जोशी यांच्या प्रगतीची ॥

गुरुदेवांनी उधळण केली आनंदपुष्पांची ।

कृतज्ञता श्री गुरुचरणी सनातन परिवाराची ॥

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०१८)

तेजल पात्रीकर यांना संगीत साधनेच्या आरंभीच्या काळात आलेली अनुभूती आणि त्यावर प.पू. डॉक्टरांनी केलेले भाष्य

‘काही वर्षांपूर्वी एका सायंकाळी मी रामनाथी आश्रमातील रहात्या खोलीची स्वच्छता करत होते. स्वच्छता करून झाल्यावर सायं. ७.३० वाजण्याच्या सुमारास अकस्मात् मी नृत्यामध्ये शिकवलेले शिव आणि कृष्ण यांचे गाणे गुणगुणायला लागले. त्यावर स्थुलातून नृत्यही करायला लागले. (लहानपणी मी कथ्थक आणि भरतनाट्यम् या नृत्यप्रकारांच्या २ – २ परीक्षा दिल्या आहेत.) त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रूंच्या धारा वहात होत्या. मी गाणे आणि नृत्य यांच्याशी पूर्णपणे एकरूप झाले होते. मला माझे स्वतःचे अस्तित्वच जाणवत नव्हते. नृत्य करतांना ‘प्रभुद्वार चली, प्रभु की दासी । एक आस लिए, एक प्यास लिए ।’, हे गीत गात मी खरोखर पार्वती बनून शिवाला आळवत होते, तर ‘वृंदावन का कृष्ण कन्हैया, सबकी आंखों का तारा..’ या गीतावर राधा बनून कृष्णासाठी नृत्याविष्कार करत होते. बर्‍याच वेळाने नृत्यातील गिरक्या घेऊन मी पलंगावर पडले आणि हमसाहमशी रडायला लागले. त्या भावावस्थेत काही वेळ गेल्यावर अश्रू थांबून मला पुष्कळ शांत वाटू लागले. त्या वेळी गाणे आणि नृत्य यांतील एक वेगळीच अवस्था मी अनुभवली.

ही अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वाचल्यावर ‘तेजलने संगीत साधनेतील भावावस्था आणि आनंदावस्था अनुभवली’, असे कळवले.

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘कु. तेजल पात्रीकर हिची (साधनेत) उच्चतम प्रगती होऊन ती लवकरच ‘साक्षात्कारा’ला पोहोचेल !’ – प.पू. देवबाबा

(प.पू. देवबाबा यांनी १.४.२०१७ या दिवशी श्री. सोमनाथ मल्या, उडुपी यांच्याजवळ व्यक्त केलेले आशीर्वादात्मक बोल !)

सौ. अनघा जोशी यांच्याविषयी कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

श्री. शशांक जोशी आणि सौ. अनघा जोशी

१. पू. अशोक पात्रीकर (वडील)

आता तेजलची आध्यात्मिक पातळी घोषित झाली, तर लगेच अनघाची प्रगती होईल’, असे वाटले नव्हते. ‘तेजलच्या पाठोपाठ संगीत विभागातील इतर जणही पुढे जातील’, असाच विचार मनात आला होता. अनघा निर्मळ आणि निरागस आहे. तिची शारीरिक क्षमता अल्प आहे, तरी ती उत्साहाने सेवा करत रहाते. ‘अनघाला पाहिल्यावर आनंद मिळतो’, असे देवद आश्रमातील अनेक साधक मला सांगतात. ती ज्या ठिकाणी सेवा करते, तेथील साधकांना आपलेसे करून घेण्यात तिची हातोटी आहे. तेजलची संगीतातून साधना आहे, तर अनघाची सर्व सेवांमधून साधना होणार आहे.

२.  सौ. शुभांगी पात्रीकर (आई)

सौ. अनघा देहाने लहान असली, तरी तिच्या क्षमतेपेक्षा अधिक करण्याचा ती प्रयत्न करते. कोणतीही सेवा परिपूर्ण करण्याचा तिला ध्यास लागलेला असतो. तिच्यात पुष्कळ प्रेमभावही आहे.

३. श्री. शशांक जोशी (पती)

संगीताची सेवा करायला आरंभ केल्यापासून अनघा पुष्कळ सकारात्मक झाली आहे. तिचे मन निर्मळ आणि निरागस आहे. तिच्या मनात कोणाविषयी पूर्वग्रह नसतो. काही दिवसांपूर्वी मी सद्गुरु राजेंद्रदादांना माझ्या मनाची स्थिती सांगितली होती. त्यानंतर त्यांनी आम्हा उभयतांना प्रयत्न करण्यास सांगितले होते. तेव्हापासून तिने प्रयत्न चालू केले आणि तिच्यामध्ये लगेच पालट दिसू लागला.

४. कु. तेजल पात्रीकर (बहीण)

अनघा संगीत सेवेसाठी रामनाथी आश्रमात येतांना तिला देवद आश्रमातील काही सेवा पूर्ण करून यावे लागते. काही वेळा दोन्हीकडील सेवा करतांना तिची द्विधा मनःस्थिती होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती बोलून घेते आणि आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते.

५. श्री. निखिल पात्रीकर (भाऊ)

ताई निरागस आणि लहान मुलांप्रमाणे आहे. एकदा प.पू. देवबाबा तिला म्हणाले होते, ‘आप बहुत नटखट हो ।’ तिची स्थिती नकारात्मक असेल, तेव्हा ती तेजलताई आणि बाबा यांच्याशी बोलून त्यांचे साहाय्य घेते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला छोटी ध्वनीचित्रफीत सिद्ध करून दिली होती. त्यात शेवटी गुरुचरणांचे चित्र आणि ‘गुरुचरण हेच ध्येय’, असे लिहिले होते. ‘माझ्याकडून असे लिहिले गेले’, ही पूर्वसूचनाच होती.

सद्गुरु आणि संत यांनी सौ. अनघा जोशी यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

अनघाताईचे वैशिष्ट्य म्हणजे तिला कोणतीही सेवा दिली, तर ती मनापासून पूर्ण करते. सेवेशी ती पूर्ण एकरूप होते. तिला एखादी चूक सांगितली किंवा तिच्या सेवेतील त्रुटी सांगितली, तर ती स्वीकारतांना तिचा संघर्ष होत नाही. ते ती आनंदाने स्वीकारते. ती नेहमीच नम्रतेने बोलते. तिचा तोंडवळाही कायम आनंदी आणि उत्साही जाणवतो. तिला पाहिले की, आनंद जाणवतो.

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे

अनघाताई कितीही थकलेल्या असल्या, तरी त्या आनंदीच दिसतात. त्या साधक किंवा संत यांना प्रसाद देतात, तेव्हा त्यात भाव जाणवतो. त्यांचा अहं पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे त्या चुका सहजपणे स्वीकारतात. त्यांच्या मनात चुका सांगणार्‍याविषयी आकस, राग किंवा पूर्वग्रह नसतो. त्या इतरांना समजून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. ते करतांना त्यांना त्रास होत नाही. स्वीकारण्यातून त्यांची साधना चालू असते.

३. पू. पद्माकर होनप

अनघाताईला कोणतीही सेवा सांगितल्यावर स्वत:च्या हातातील सेवा बाजूला ठेवून ती सेवा पूर्ण करते. ती सर्व शारीरिक सेवा आनंदाने करते.

‘कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी दोघी बहिणींना पाहून आनंद जाणवतो. दोघीही पुष्कळ नम्र आहेत.’ – पू. जयराम जोशी


Multi Language |Offline reading | PDF