कल्याण येथे ‘बालसंस्कार’ शिबिराच्या आडून चालत असलेला धर्मांतराचा डाव जागरूक हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

ख्रिस्ती पंथप्रचारकांचे खरे रूप समाजासमोर आणणारी घटना !

बालसंस्कार शिबिरातील हिंदु मुलांकडून काढून घेतलेल्या चित्रापैकी एक चित्र. या चित्रात ॐ वर फुली मारली आहे, तर क्रॉसला ‘बरोबर’ दाखवले आहे. क्रॉसच्या बाजूला ‘Commit to follow Jesus Because Jesus is always Right’ (जिझसला मानण्यासाठी कटीबद्ध व्हा; कारण जिझस नेहमी योग्य आहे !), (वर्तुळात पहाणे) असे वाक्य लिहिले आहे.

कल्याण, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील पूर्वेतील गायत्री प्राथमिक विद्यालयात ६ ते १२ वर्षे वयोगटातील हिंदु मुलांमध्ये दिवाळीच्या सुट्टीतील तथाकथित ‘बालसंस्कारवर्गाच्या’ माध्यमातून ख्रिस्ती पंथाचा प्रचार, प्रसार केला जात असल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लक्षात आले. तेव्हा जागरूक हिंदुत्वनिष्ठ धर्मांतराचा कट उधळण्यात यशस्वी झाले. ९ नोव्हेंबरला या बालसंस्कारवर्गाच्या आयोजकांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धर्माभिमानी श्री. सुभाष मते यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान २९५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

श्री. मते यांनी तेथील स्थानिक हिंदूंना एकत्र करून स्वाक्षरी मोहिमेसह एका निवेदनाद्वारे कार्यक्रमाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. शिबिरात अनुमाने १०० मुले आणि मुली यांनी सहभाग घेतला होता.

१. ९ नोव्हेंबरला दुपारी १ च्या सुमारास गायत्री प्राथमिक विद्यालयाच्या बाहेर ‘जेरुसलेम चर्च’च्या नावाने फलक लावून काहीतरी कार्यक्रम चालू असल्याचे स्थानिकांनी पाहिले.

२. उत्सूकतेपोटी काही हिंदुत्वनिष्ठ शिबीर चालू असलेल्या शाळेतील वर्गात गेले असता, हिंदु मुले आणि ख्रिस्ती प्रचारक महिला तेथे उपस्थित होत्या.

३. हिंदु मुलांसाठी चित्रकला, संगीत, नृत्य, गायन अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून बक्षिसांचे आमिष दाखवून मुलांच्या मनात हिंदु धर्माविषयी द्वेष निर्माण करून ख्रिस्ती पंथ सर्वश्रेष्ठ असल्याचे भासवत असल्याचे काही पुरावे तेथे मिळाले.

४. हिंदूंना पवित्र असलेल्या ‘ॐ’च्या प्रतिकावर ‘फुली’ मारून ख्रिस्ती पंथाचे प्रतीक असलेल्या क्रॉसवर ‘बरोबर’ अशी खूण असलेली चित्रे मुलांकडून काढून घेतल्याचे आढळले. तसेच ‘मोदी सरकार चोर आहे’ या आशयाचे एक चित्रही त्यात होते.

५. हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचा अवमान करणारे फलक मोठ्या संख्येने शिबिराच्या ठिकाणी लावल्याचे दिसले.

६. तसेच नृत्य, गायन, संगीत अशा स्पर्धा आयोजित करून त्यात केवळ ख्रिस्ती पंथ आणि जीझसचे गोडवे गाणारी गाणी तेथे लावण्यात आली. तसेच मुलांकडूनही बोलून घेतल्याचे पालकांनी सांगितले.

७. शिबिरातील मुलांना बायबलच्या प्रतीही दिल्याचे काहींनी सांगितले.

८. ‘जिझसला प्रार्थना केल्याने अभ्यास चांगला होऊन परीक्षेत उत्तम गुण मिळतील’, असे तेथील हिंदु मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले आणि तशी प्रार्थनाही त्यांच्याकडून बोलून घेतल्याचे एका मुलाने सांगितले. (यावर अंनिसचे काय म्हणणे आहे ? – संपादक)

धर्मांतर रोखण्यात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सह्याद्री प्रतिष्ठान आणि भाजप या संघटना आणि पक्षाने सहभाग घेतला. धारकरी श्री. शुभम गोवेकर, भाजपचे कल्याण शहर सरचिटणीस श्री. संजय मोरे, श्री. वैभव कासार, श्री. वैभव गुजर, श्री. संतोष हेंदळेकर, श्री. अनिल तिवारी, श्री. विकी काळे, श्री. दुबे, श्री. सिंह यांनी अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्याने या मोहिमेत पुढाकार घेतला.

पोलिसांची नेहमीप्रमाणे बोटचेपी भूमिका !

हिंदुत्वनिष्ठ तक्रार नोंद करण्यासाठी गेले असता पोलिसांनी प्रथम त्यांना ‘हा विषय आपण शांतता समितीच्या माध्यमातून सोडवू’, असे सांगितले. नंतर हिंदुत्वनिष्ठांचा जमाव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात येण्यास प्रारंभ झाला आणि स्थानिक राजकीय दबावानंतर तक्रार घेण्यात आली. त्यासाठीसुद्धा अनुमाने ७ घंटे व्यय करावे लागल्याने हिंदुत्वनिष्ठ नाखूष होते. अन्वेषण अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक जयराम लाडके यांच्याशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ‘अन्वेषण चालू आहे. ख्रिस्ती प्रचारकांनीसुद्धा ‘त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असे निवेदन दिले आहे; परंतु तशी तक्रार प्रचारकांनी नोंदवली नाही’, असे सांगितले. (हिंदूंच्या धर्मांतराचा प्रश्‍न असल्यामुळे पोलीस एवढी निष्क्रीयता दाखवत आहेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF