नक्षलवादाची समस्या !

संपादकीय

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत ज्या अनेक जटील समस्या आहेत, त्यांपैकी नक्षलवाद ही एक असून छत्तीसगडमध्ये तर प्रत्येक मासाला फटाके फोडल्याप्रमाणे नक्षलवादी स्फोट घडवून आणतात ! दोनच दिवसांपासूर्वी पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या गस्तीपथकावर आक्रमण करून ६ बॉम्बस्फोट केले. यात सुरक्षादलाचा १ सैनिक हुतात्मा झाला. ही घटना ताजी असतांनाच १४ नोव्हेंबर या दिवशी नक्षलवाद्यांनी बीजापूर येथे सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण करून ४ सैनिक आणि अन्य दोघे यांना घायाळ केले. मतदानाच्या दिवशीही सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात गोळीबार चालू होता आणि यातही ५ सैनिक घायाळ झाले. वास्तविक गेल्या १५ वर्षांपासून छत्तीसगड राज्यात भाजपचे सरकार आहे आणि केंद्र स्तरावरही भाजपचेच सरकार असतांना या समस्येवर कोणतीच प्रभावी उपाययोजना न काढल्याने नक्षलवाद्यांच्या आक्रमणात सैनिक हकनाक हुतात्मा होत आहेत.

नक्षलवाद्यांची आर्थिक रसद खंडित करणे अत्यावश्यक !

नक्षलवादी केवळ कायदा आणि सुव्यवस्था यांना आव्हान देण्याचे काम करत नसून त्यांनी भारताच्या विरोधात उघडउघड युद्ध पुकारले आहे. सर्व यंत्रणा हाताशी असतांना सैनिक कुठे आहेत, हे शोधून काढून त्यांवर बॉम्ब आक्रमण करणारे नक्षलवादी किती प्रभावशाली बनत आहेत, हे १४ नोव्हेंबरच्या आक्रमणातून उघड झाले. या घटनेतून नक्षलवादाच्या विरोधात कारवाई करणारे सैन्यदल हे नियंत्रण आणि नेतृत्व यांविषयी दुबळे ठरत आहे, हेच समोर येते. नक्षलवाद्यांच्या या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची आर्थिक रसद खंडित करणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक रसदीमुळेच नक्षलवादी अत्याधुनिक शस्त्रांची खरेदी करू शकतात.

लष्करी कारवाईसारखे कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता !

आतापर्यंत आतंकवादी कारवायांतही मारले गेले नसतील, त्यापेक्षी कितीतरी अधिक शेकडो पोलीस, सैनिक, राज्य राखीव दलाचे सैनिक, नागरिक मारून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे ! पोलीस आणि सैन्य यांच्या तुलनेत नक्षलवादी संख्येने अल्प असूनही ते अधिक सैनिक किंवा पोलीस यांना मारतात, ही गोष्ट आपल्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत केलेले सर्व उपाय अयशस्वी ठरले असून केंद्रात भाजपचे सरकार येऊन आता ५ वर्षे संपत आली, तरीही या समस्येवर कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. पोलीस आणि सैनिक यांना ‘अच्छे दिन’ येण्यासाठी पंतप्रधान श्री. मोदी यांनी नक्षलवाद संपवणे आवश्यक ठरते. यासाठी लष्करी कारवाईसारखे कठोर निर्णयच घेतल्यास ही समस्या कायमस्वरूपी सुटू शकेल !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now