कु. शर्वरी कानस्कर हिने सादर केलेल्या नृत्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

नृत्य करतांना कु. शर्वरी कानस्कर

‘८.११.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी आश्रमात कु. शर्वरी कानस्कर हिने शास्त्रीय नृत्य सादर केले. या नृत्याचे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतात हे पहाण्यात आले. याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म-परीक्षण पुढे देत आहे.

श्री. राम होनप

१. घुमर नृत्यप्रकार

अ. कु. शर्वरीच्या नृत्यातील हातांच्या मुद्रांद्वारे वातावरणात सोनेरी रंगाच्या दैवी कणांचे प्रक्षेपण होत होते.

आ. कु. शर्वरी स्वःभोवती वेगाने गिरकी घेत असतांना तिच्याभोवती पिवळ्या आणि लाल रंगांचे दाट ईश्‍वरी कवच निर्माण होत होते.

इ. नृत्य चालू असतांना पाताळातील एक मोठी वाईट शक्ती सूक्ष्मातून वरती आलेली दिसली. ती मोठी असल्याने शर्वरीच्या नृत्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता.

ई. साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्ती शर्वरीच्या भोवती नृत्य करून तिच्यावर सूक्ष्मातून त्रासदायक शक्तीद्वारे आक्रमणे करत होत्या.

उ. मैफिलीत अनारकली पोशाखात स्त्रिया नृत्य करतात आणि ते पहाण्यासाठी भूमीवर पुरुष बसलेले असतात, त्याप्रमाणे पाचव्या पाताळात वाईट शक्तींची नृत्याची एक मैफील चालू असल्याचे दृश्य मला दिसले.

पाताळात वाईट शक्ती मैफिलीतील पेहरावात दिसण्यामागील कारण : मृत्यूनंतर पाताळात गेलेल्या लिंगदेहांना अनिष्ट रूप प्राप्त झालेले असते. त्यांना जेव्हा नृत्यातील सुख उपभोगण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हा त्या गतजन्मांतील संस्कारांनुसार तात्पुरते मायावी रूप धारण करून मैफिलीचे वातावरण निर्माण करतात. हा कार्यक्रम संपला की, वाईट शक्ती पुन्हा आपल्या मूळ रूपात, म्हणजे अक्राळ-विक्राळ रूपात येतात.

ऊ. नृत्य करतांना शर्वरीच्या भोवती सूक्ष्मातील एका मोठ्या मायावी नागाने वेटोळा घातला होता आणि तो वर्तुळाप्रमाणे शर्वरीच्या भोवती फिरत होता; परंतु शर्वरीच्या देहातून बाहेर पडणार्‍या दैवी कणांनी नागाचे सूक्ष्म शरीर भंग पावत होते.

ए. थोड्या वेळाने शर्वरीच्या भोवती फिरणारा नाग मला दिसणे बंद झाले. त्यानंतर शर्वरीच्या पाठीमागे मला सूक्ष्मातून एक मोठा त्रासदायक नाग दिसला. हा नाग स्थिर होता.

वर्तुळाप्रमाणे फिरणारा मायावी नाग आणि त्रासदायक स्थिर नाग यांतील भेद : वर्तुळाप्रमाणे फिरणारा मायावी नाग हा प्रामुख्याने वातावरणात त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण करण्यात पटाईत असतो, तर त्रासदायक स्थिर नाग हा वातावरणात विषयुक्त त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण करतो. त्रासदायक नाग फिरणार्‍या नागाच्या तुलनेत अधिक शक्तीशाली असतो.

ऐ. शर्वरी नृत्य करतांना स्वतःभोवती गिरकी घ्यायची, त्या वेळी तिला अधिक आनंद मिळत होता आणि या आनंदाचे प्रक्षेपण वातावरणात होऊन वाईट शक्तींचा जोर न्यून होत होता.

ओ. शर्वरीने हातात दिवा पकडल्याप्रमाणे मुद्रा केली, तेव्हा तिच्या दोन्ही हातात सूक्ष्मातून प्रत्येकी एक ज्योत दिसत होती.

नृत्य करतांना दोन्ही हातांत सूक्ष्मातून प्रत्येकी एक ज्योत दिसण्याचे आध्यात्मिक महत्त्व : नृत्य करतांना दोन्ही हातात सूक्ष्मातून प्रत्येकी एक ज्योत दिसणे, हे नृत्य करणार्‍याची साधना योग्यप्रकारे चालू असून ती फलद्रूप होत असल्याचे लक्षण आहे.

२. पाश्‍चात्त्य गीतावर शास्त्रीय नृत्य

अ. पाश्‍चात्त्य आणि मनाला चंचल करणार्‍या गीताचा शर्वरीच्या मनावर कोणताही विपरीत परिणाम होत नव्हता; कारण नृत्य करतांना शर्वरी देवाच्या स्मरणात होती. ती देवासाठी नृत्य करत असल्याने पाश्‍चात्त्य गीताचा तिच्यावर आणि वातावरणावर नकारात्मक परिणाम होत नव्हता.

आ. शर्वरी नृत्य करत असतांना आध्यात्मिक त्रास असलेली एक साधिका नृत्य करू लागली. साधिकेला त्रास देणारी वाईट शक्ती ही मायावी असल्याने तिच्या नृत्यातून पांढर्‍या रंगाच्या मायावी लहरी वातावरणात प्रक्षेपित होत होत्या. त्यामुळे त्या साधिकेचे नृत्य मोहक वाटत होते; पण ते पाहून माझ्या मनाला चांगले वाटत नव्हते.

इ. एका रांगेत शेकडो भुते या पाश्‍चात्त्य गीतावर आनंदाने सूक्ष्मातून नाचतांना दिसत होती.

ई. पाश्‍चात्त्य गीत हे मादक स्वरूपाचे होते. हे गीत चालू असतांना पाताळातील वाईट शक्तींनी सर्प-सर्पिणीचे रूप धारण केले.

वाईट शक्तींनी सर्प-सर्पिणीचे रूप धारण करण्यामागील कारण : वाईट शक्तींच्या अशा क्रियेतून वातावरणात अतिशय सूक्ष्म वाईट स्पंदने निर्माण होतात आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरील जिवांवर होतो.

उ. शर्वरीवर वाईट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे वाढल्याने नृत्य करतांना तिचे मन अधून-मधून अस्वस्थ होत होते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८. ११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF