कु. अंजली कानस्कर हिने सादर केलेल्या ‘तराना’ नृत्यप्रयोगाचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांवर झालेला परिणाम आणि कु. अंजलीची वैशिष्ट्ये

कु. अंजली कानस्कर

‘८.११.२०१८ या दिवशी दुर्ग (छत्तीसगड) येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. अंजली कानस्कर (वय १९ वर्षे) हिच्या नृत्याचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर होणार्‍या परिणामांचा  अभ्यास एका नृत्यप्रयोगाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील संशोधकांनी केला. अंजलीने कथ्थकमधील ‘तराना’ नृत्यप्रकार सादर केला. प्रयोगाच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि अंजलीच्या नृत्यामुळे झालेले परिणाम पुढे देत आहे.

१. अंजलीच्या नृत्यामुळे झालेले परिणाम

नृत्य करतांना कु. अंजली कानस्कर

१ अ. अंजलीने नृत्याला आरंभ केल्यावर सात्त्विक स्पंदनांचे प्रक्षेपण होणे आणि साधकाला सर्वत्र आनंदाचे कारंजे उडत असल्याचे दृश्य दिसणे : अंजलीने नृत्याला आरंभ केल्यावर तिच्या हालचालींमधून आणि ती करत असलेल्या नृत्यातील मुद्रांमधून सात्त्विक स्पंदनांचे प्रक्षेपण होऊ लागले. तिने नृत्यास आरंभ केल्यावर ‘सर्वत्र आनंदाची कारंजी उडत आहेत’, असे दृश्य दिसले आणि मन हलके झाले. आनंदाच्या स्पंदनांमुळे तेथील वातावरण प्रफुल्लित झालेे.

१ आ. अंजलीच्या नृत्यातून तिला आणि उपस्थित साधकांना आनंद अनुभवता येणे अन् कु. शर्वरी हिच्या नृत्याच्या वेळी  वाईट शक्तींनी अवाक् होऊन अंजलीचे नृत्य पहाणे : ‘अंजली नृत्य करत असतांना त्या नृत्यातून तिला स्वतःला आनंद होत होता’, हे तिच्या तोंडवळ्यावरील भावातून लक्षात येत होते. तेथे उपस्थित असलेले साधक तिच्या नृत्यातील आनंद अनुभवत होते. कु. शर्वरी कानस्कर हिच्या नृत्याच्या वेळी साधकांना त्रास देणार्‍या आणि विविध कृती करणार्‍या वाईट शक्ती अंजलीचे नृत्य अवाक् होऊन पहात होत्या.

१ इ. अंजलीच्या नृत्यप्रयोगाच्या वेळी वाईट शक्तीला चैतन्याशी लढता येणे अशक्य झाल्याने तिने साधकाचा रक्तदाब वाढवणे : अंजलीच्या नृत्यप्रयोगापूर्वी माझा रक्तदाब १२०/९० होता. नृत्यप्रयोग संपल्यानंतर तो वाढून १४०/१०० झाला होता. नृत्यप्रयोगाचा कालावधी १ घंटा एवढाच होता आणि मी शांत बसून नृत्य पहात होतो, तरी एवढा पालट झाला होता. ‘मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला अंजली नृत्य करत असतांना तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याशी लढणे अशक्य झाल्याने तिने शारीरिक आक्रमण करून रक्तदाब वाढवला’, असे जाणवले.

२. अंजलीविषयी जाणवलेली सूत्रे

२ अ. अंजलीत वाईट शक्तींशी लढण्याचे धैर्य निर्माण होऊन ती परिणामकारक नृत्य सादर करू शकणे : अंजली दुसर्‍यांदा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसमोर नृत्यप्रयोग करत होती. तिचा आत्मविश्‍वास वाढला होता. तिच्यात वाईट शक्तींशी लढण्याचे धैर्य निर्माण होऊन भीती नाहीशी झाल्याचे जाणवले. त्यामुळे ती अधिक परिणामकारक नृत्य सादर करू शकली.

२ आ. नृत्य करतांना अंजलीची कुंडलिनी जागृत होणे आणि उपस्थित साधकांचीही कुंडलिनी जागृत करण्याची तिच्यात क्षमता असल्याचे लक्षात येणे : अंजली नृत्य करत असतांना तिची कुंडलिनी जागृत झाली होती. त्यामुळे होणारा आनंद तिच्या तोंडवळ्यावर दिसत होता. उपस्थित असणार्‍या साधकांचीही कुंडलिनी जागृत करण्याची क्षमता तिच्यात असल्याचे जाणवले. तिच्यातील ईश्‍वरप्राप्तीच्या तळमळीमुळे तिच्या नृत्यातून प्रयोगस्थळी उपस्थित साधकांना सात्त्विकता आणि शक्ती यांचा लाभ होत होता.

२ इ. अंजली नृत्यातून समष्टीला ध्यानाचा अनुभव देऊ शकत असल्याचे जाणवणे : ‘अंजली ईश्‍वरप्राप्ती हे ध्येय समोर ठेवून नृत्य करत आहे. नृत्यातून ईश्‍वराशी अनुसंधान राखून ती समष्टीला ध्यानाचा अनुभव देऊ शकते’, असे लक्षात आले. ‘तिची साधना वाढल्यावर नृत्याच्या माध्यमातून साधकांना ईश्‍वरचरणी नेण्याची क्षमता तिच्यात निर्माण होईल’, असे वाटले.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF