श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडून संसद विसर्जित

पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होणार !

कोलंबो – श्रीलंकेत गेल्या दोन आठवड्यांपासून चालू असलेल्या पंतप्रधानपदाच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी श्रीलंकेची संसद विसर्जित (बरखास्त) केली. राष्ट्रपतींनी एका वटहुकूमावर स्वाक्षरी करून संसद विसर्जित केली. त्यामुळे आता श्रीलंकेत मध्यावधी निवडणुका अटळ आहेत. श्रीलंकेत मध्यावधी निवडणुका होऊन नवीन सरकार अस्तित्वात येण्याला अवघी २ वर्षेच झाली होती. राष्ट्रपती सिरीसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करून राजपक्षे यांना पंतप्रधान केले होते. त्यामुळे श्रीलंकेत घटनात्मक पेच निर्माण झाला होता. २२५ सदस्य संख्या असलेल्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमतासाठी ११३ सदस्यसंख्येची आवश्यकता असते. राजपक्षे यांच्याकडे हा बहुमताचा आकडा नसल्याने राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याचा मार्ग स्वीकारावा लागला.


Multi Language |Offline reading | PDF