पोलीस ठाण्यात हत्या झालेल्या अनिकेत कोथळेला न्याय केव्हा ?

हत्येला एक वर्ष पूर्ण !

संकलक – श्री. अजय केळकर, सांगली

अनिकेत कोथळे

पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांचे सहकारी यांनी सांगली येथील अनिकेत कोथळे अन् अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, तसेच बळजोरीने पैसे उकळल्याच्या कथित आरोपाखाली अटक केली. यात पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर क्रौर्याची परिसीमा गाठत युवराज कामटेने अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सर्वच संशयित अटकेत आहेत. अद्याप या प्रकरणाचा खटला केवळ प्राथमिक अवस्थेत आहे. या प्रकरणाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले असून सांगली शहर पोलीस ठाण्यात हत्या झालेल्या अनिकेत कोथळेला न्याय केव्हा ? असा प्रश्‍न सांगलीकरांमधून उपस्थित होत आहे.

अनिकेतला अटक ते कामटे यांना अटक !

अनिकेत आणि अमोल भंडारे यांना चोरी केल्याच्या गुन्ह्याखाली सांगली शहर पोलिसांनी ५ नोव्हेंबर २०१७ या दिवशी अटक केली. ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता पोलिसांनी केलेल्या ‘थर्ड डिग्री’ मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. रात्री ११ वाजता अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो बाहेर काढण्यात आला. थोड्या वेळाने कृष्णा घाटावर विल्हेवाट लावण्याचा निर्णय झाला; मात्र तोपर्यंत उजाडू लागल्याने सांगलीपासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोलीमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरले. ७ नोव्हेंबरला आंबोलीला मृतदेह जाळण्यात आला. दुसरीकडे ७ नोव्हेंबरच्या सकाळी अनिकेत आणि अमोल भंडारे याने पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा बनाव पोलिसांनी रचला.

जनतेचा उद्रेक आणि पोलीस अधीक्षकांचे स्थानांतर !

अनिकेत पोलीस मारहाणीत मृत्यूमुखी पडल्याचे त्याच्या नातेवाइकांना समजले होते. त्यामुळे त्यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले. यात पुढील दोन दिवस विविध राजकीय पक्ष, तसेच सामाजिक संघटनांनीही आंदोलन केले. आरोपींच्या कठोर शिक्षेसाठी एक दिवस सांगली बंदही ठेवण्यात आले. या संपूर्ण दबावामुळेच ८ नोव्हेंबरला या प्रकरणाचे अन्वेषण राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपण्यात आले. या प्रकरणी युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला यांना बडतर्फ करण्यात आले आहे, तसेच या प्रकरणात एकूण १२ पोलिसांना निलंबित केले आहे. उसळलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी गृह खात्याने नोव्हेंबर २०१७ मध्येच तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांचे स्थानांतर केले. एवढी मोठी घटना घडून वरिष्ठांवर केवळ स्थानांतरणासारखी किरकोळ कारवाई केल्याने सांगलीकर असंतुष्ट आहेत.

१० मासांपूर्वी आरोपपत्र प्रविष्ट !

या प्रकरणी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी २०१८ या दिवशी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट केले. यात पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात जणांची आरोपपत्रात नावे आहेत. ७०० पृष्ठांच्या या आरोपपत्रात ५५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हा खटला चालू नये; म्हणून युवराज कामटे विविध आवेदन पत्र प्रविष्ट करून खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोथळे कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी !

अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची सुपारी एका गुन्हेगाराला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. कळंबा येथील कारागृहात हा कट शिजला आहे, अशी माहिती समोर येत आहे. या संदर्भात अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने पत्रकारांशी बोलतांना सांगितले,  ‘‘घटनेनंतर केवळ सहा मासच कोथळे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आले. सध्या हे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली; मात्र अद्याप ते पुरवण्यात आलेले नाही. त्यामुळे शस्त्र परवान्यासाठी प्रस्ताव दिला आहे.’’

पोलीस दल त्यांची कार्यपद्धत सुधारणार का ?

अनिकेत कोथळे प्रकरणामुळे सांगली पोलिसांचा क्रूर आणि अनानुष तोंडवळा लोकांसमोर आला. ‘हत्या’ उघड होऊ नये; म्हणून पोलिसांनी मृतदेह जाळून टाकण्याचे घृणास्पद कृत्य केल्याने संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. किमान या प्रकरणानंतर तरी पोलीस त्यांची कार्यपद्धत सुधारतील अशी भाबडी अपेक्षा जनतेची होती; मात्र यानंतरही अनिकेतसारखी अनेक प्रकरणे घडली आणि केवळ तत्कालीक कार्यवाही झाली, इतकेच !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now