यमद्वितीयेचे रहस्य आणि आध्यात्मिक महत्त्व !

दिवाळी : धर्मशास्त्र, आध्यात्मिक संशोधन आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती !

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (९ नोव्हेंबर २०१८) या दिवशी असलेल्या यमद्वितीयेच्या निमित्ताने…

‘कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया’ हा दिवस यमद्वितीया या नावाने भारतवर्षात प्रसिद्ध आहे.

पुराणात अशी कथा आहे की, या दिवशी मृत्युदेव यम याने आपली बहीण यमी किंवा यमुना हिच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन तेथे मोठ्या आनंदाने भोजन केले. शाकाहारांनी या कौटुंबिक विधीस धर्माची जोड देऊन हा दिवस ‘भाऊबीज’ म्हणून पाळणे, हे बंधुभगिनींचे श्रेष्ठ कर्तव्य आहे, असे ठरवले. वेदांमध्ये यम आणि यमी या प्रसिद्ध जोडीचा उल्लेख काव्यमय भाषेत रूपकाच्या आश्रयाने केला आहे. ‘‘यम मृत्यू पावला, त्या वेळी यमीच्या डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबेनात. कोणत्याही देवाकडून तिचे सांत्वन होईना. शेवटी देवांनी रात्र निर्माण केली. रात्र झाल्यावर यमी भावाच्या मरणाचे दुःख थोडेसे विसरली. या रात्रीनंतर ‘आज’ आणि ‘काल’ असा भेद चालू झाला. त्यापूर्वी नेहमी आजच असे !’’

भारतात सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास घरी बोलावून त्याला मंगलस्नान इत्यादी घालते. सुग्रास भोजन करून जेवावयास वाढते आणि आपला संतोष प्रगट करते. भाऊही संध्याकाळी तिला ओवाळणी घालीत असतो. भाऊ गरीब असो अथवा श्रीमंत असो ! त्यास घरी बोलावून ‘त्याला गोड करून खायला घालावे’, ‘त्याच्या संगतीत आनंद मानावा’, हा बहिणीचा हेतु असतो; आणि बहीण गरीब असो अथवा श्रीमंत असो ! ‘तिची विचारपूस करावी’, ‘तिच्या घरी जावे’, ‘तिची सुखदु:खे समजून घ्यावीत’, असे भावास वाटत असते. असा हा भाऊबीजेचा दिवस आहे. बंधुभगिनींच्या उदात्त प्रेमाची साक्ष याच दिवशी सर्वत्र पटत असते.

एरव्ही व्यवहारात थोडाफार मतभेद झाल्यामुळे रागलोभाचे प्रसंग येतही असतील, पण या दिवशी मात्र त्या सर्व किल्मिषांचा लोप होऊन एका आनंदाचेच साम्राज्य बंधु-भगिनींच्या प्रेमात असते. ज्यांना सख्खी बहीण नसते, ते चुलत, आते, मामेबहिणीकडून ओवाळून घेऊन भाऊबीज साजरी करतात.

संदर्भ : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’

(लेखक : प्रल्हाद नरहर जोशी, पुणे. (प्रथम आवृत्ती : वर्ष १९५०))  ‘यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यातील सत्त्व गुण वृद्धींगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो. यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारी धारिणी अन् पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते.

या दिवशी यमाचे रूप सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ अन् बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्त्विक भेट प्रथम भूलोकात (पृथ्वीवर) होते अन् त्यानंतर ते माता-पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या सूर्याच्या सत्त्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते.

अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.

आध्यात्मिक महत्त्व : कार्तिक मासात १२ आदित्यांपैकी पूषा हा आदित्य कार्यरत असतो. याचे तत्त्व आणि चैतन्य ग्रहण करता यावे, यासाठी आदित्याचे सगुण रूप असणार्‍या सूर्याचे पूजन करणे योग्य आहे. यम हा सूर्यपुत्र असल्याने सूर्याचा प्रतिनिधी आणि धर्माचे प्रतीक म्हणून या दिवशी यमधर्माचे पूजन केले जाते. यमदेव प्रसन्न झाल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट दूर होते.

या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’

आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी यमाचे तारक रूप कार्यरत झाल्यामुळे त्याच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या लयकारी तमप्रधान लहरींचे प्रक्षेपण उणावते. त्यामुळे नरकात पिचत पडलेल्या पापी जिवांना या दिवशी अत्यल्प प्रमाणात नरकयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे यमद्वितीया हा नरकातील पापी जिवांसाठी आनंदाचा दिवस असतो.

हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.

या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.’

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now