गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि ‘व्हॉट्सअॅ्प’द्वारे केलेला नियोजनबद्ध प्रसार अन् त्यामुळे कार्यक्रमाला लाभलेली जिज्ञासूंची लक्षणीय उपस्थिती !

डोंबिवली येथील साधक श्री. आणि सौ. नारकर यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्त केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रसाराविषयीची सूत्रे येथे देत आहोत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती लाभली. काही जिज्ञासू सेवा करायलाही उद्युक्त झाले.

१. वाचक, धर्माभिमानी आणि परिचित यांना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला येण्याचे महत्त्व सांगणे

‘गुरुपौर्णिमेला १ मास शेष असतांना आम्ही (मी आणि पत्नी) डोंबिवली आणि आसपासचा परिसर येथील १३० वाचक, धर्माभिमानी आणि परिचित व्यक्ती यांच्या नावांची सूची केली. आम्ही त्यांच्या वेळेनुसार त्यांना प्रत्यक्ष भेटून अर्पण घेतले. ‘कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ होतो ?’ आदी सूत्रे सांगून त्यांना उपस्थित रहाण्याची विनंती केली. आम्ही सांगितलेली सूत्रे लोकांना भावल्यामुळे त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक अर्पण दिलेे, तसेच ‘आम्ही कार्यक्रमाला येऊ’, असे मनापासून सांगितले.

२. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट सिद्ध करून त्या गटाला दैनिक सनातन प्रभातमधील ‘गुरुपौर्णिमेला १५ दिवस शेष’ ही चौकट पाठवणे आणि नंतर प्रत्येकाला भ्रमणभाष करून चौकट वाचल्याची निश्‍चिती करणे

या १३० जणांपैकी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार्‍या ९० संभाव्य व्यक्ती आणि राज्यातील ५ जिल्ह्यांतील ओळखीच्या १५ व्यक्ती यांची नावे आम्ही निश्‍चित केली. या एकूण १०५ (९० + १५) जणांचा ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा गट सिद्ध केला. या गटात कार्यक्रमापूर्वी १५ दिवस आधीपासून दैनिक सनातन प्रभातमधील ‘गुरुपौर्णिमेला १५ दिवस शेष’ ही चौकट पाठवली. नंतर ५ दिवसांनी सर्वांना संपर्क करून ‘वरील चौकट वाचली का ?’, असे विचारले असता ६७ जणांनी चौकट वाचल्याचे सांगितले. शेष ३८ जणांनी ‘आम्ही आता वाचतो’, असे सांगितले.

३. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी पुन्हा संपर्क करणे

नंतर डोंबिवली आणि अन्य ५ ठिकाणच्या निमंत्रण पत्रिका ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर पाठवून २ दिवसांनी सर्वांचा आढावा घेतला. गुरुपौर्णिमेच्या २ दिवस आधी सर्वांना संपर्क करून कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ सर्वांना समजल्याची निश्‍चिती केली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संपर्क करून पुन्हा सर्वांना कार्यक्रमाची आठवण करून दिली.

४. लाभलेला प्रतिसाद !

डोंबिवली येथे संपर्क केलेल्या १३० व्यक्तींपैकी ६५ व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अन्य ५ जिल्ह्यांतील १५ व्यक्तींपैकी ९ व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

अ. डोंबिवली येथील कार्यक्रमाला माझ्या संपर्कातील एक बौद्ध धर्मीय व्यक्ती उपस्थित होती.

आ. माझ्या संपर्कातील ११ वाचकांची सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याशी भेट झाली.

इ. आढावा बैठकीला उपस्थित राहिलेल्या वाचकांपैकी काही जणांनी सेवा करण्याची सिद्धता दर्शवली.’

– श्री. श्रीकृष्ण नारकर, डोंबिवली, ठाणे. (७.९.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now