परकीय आक्रमकांच्या खुणा पुसा !

योध्येतील भव्य दीपोत्सवाच्या वेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘फैजाबाद’ या जिल्ह्याचे ‘अयोध्या’ असे नामकरण करण्याचे घोषित केले. यापूर्वी नुकतेच त्यांनी ‘अलाहाबाद’चे ‘प्रयाग’ असे नामकरण केले होते. योगींच्या कारकिर्दीत परकीय आक्रमकांच्या नावाने वसलेली शहरे, वास्तू अथवा रस्ते यांची नावे पालटून भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणारी नावे देण्याचा योग येण्यास दीड वर्ष लागले; पण हेही नसे थोडके ! उत्तरप्रदेशमध्ये आणि केंद्रातही स्पष्ट बहुमताने राज्य करणार्‍या योगी आणि मोदी यांना खरे तर स्वदेशी नामांतराविषयीचा एक राष्ट्रहितकारक निर्णय घेण्यास इतकी वर्षे लागायला नकोत. नावाच्या निमित्ताने मुसलमान परकीय आक्रमकांची स्मृती जपणारी अनेक गावे, शहरे, रस्ते भारतात आहेत. औरंगाबाद, निजामाबाद, हैद्राबाद, अहमदाबाद, इस्लामपूर, सिकंदराबाद, लखनौ, फत्तेपूर, वास्को, खुल्ताबाद, अहमदनगर अशी कितीतरी नावे ही ‘स्व’तंत्र (?) भारताला डाग आहेत. ही सर्व नावे ‘बाद’ (निरस्त) करून भारतीयत्वाचे दर्शन घडवणारी तेजस्वी नावे संबंधित ठिकाणांना द्यायला नकोत का ? इस्रायलसारखा छोटासा देश त्यांची हिब्रू भाषा अस्ताला जात असतांना प्राणपणाने प्रयत्न करून ती वाचवतो. ज्यू संस्कृतीचे रक्षण करतो. इस्रायलमध्ये आपल्याला एकही हिटलर नावाचा रस्ता सापडणार नाही; पण भारतात मात्र देशाच्या राजधानीतच ‘अकबर मार्ग’ आहे. एका वृत्तानुसार देशात अकबराच्या नावाने २५१ शहरे, तसेच खेडी आहेत, ६३ औरंगाबाद आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार मुसलमान शासकांच्या नावाने एकट्या उत्तरप्रदेशमध्ये ३९२ गावे आहेत, तर देशभरात ही संख्या ७०४ आहे. ही नावे आणि त्यांचा होणारा वापर हे राष्ट्रीयत्व क्षीण झाल्याचे नाही, तर मग दुसरे कशाचे लक्षण आहे ? आक्रमकांच्या स्मृती पुसायच्या असतात. त्या उरावर अभिमानाने मिरवायच्या नसतात. त्यामुळे आता केवळ नामांतरावर समाधान मानून चालणार नाही, तर पुढचा टप्पा म्हणून परकीय आक्रमकांनी ज्या ज्या वास्तू बळकावल्या त्या त्या परत मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. उत्तरप्रदेशमधील ताजमहालपासूनच याचा प्रारंभ करता येईल.

विकासाच्या आधी संस्कृतीरक्षण हवे !

काही मासांपूर्वी देहली येथील अकबर रस्त्याच्या नामफलकावर ‘महाराणा प्रताप पथ’ नावाच्या फ्लेक्सचा फलक लावल्याचा विषय चर्चेत होता. त्या वेळी केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी या प्रकाराला अंगावर पाल पडल्याप्रमाणे झिडकारले होते. ‘याविषयीच्या कोणत्याही प्रस्तावामध्ये सरकार सहभागी नाही. सरकारचे लक्ष विकासावर असून रस्त्यांची नावे पालटण्यावर नाही’, असे विधान त्यांनी केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप सरकारच्या राज्यात काश्मीरमधील फोर्ट फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनात हरि प्रबात टेकडीचे ‘कोह-ए-मारण’, असे नामांतर करण्यात आले होते. त्याआधी तेथील शंकराचार्य टेकडीचे ‘तख्त-ए-सुलेमान’, असे नामकरण करण्यात आले होते. यावरून संस्कृतीरक्षणाशी सत्ताधारी भाजपला काही देणेघेणे नाही, असे समजायचे का ? जनतेला केवळ विकास नाही, तर विकासाच्याही आधी संस्कृतीरक्षण हवे आहे, हे सत्ताधार्‍यांच्या लक्षात कधी येणार ? ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, असा अध्यात्मातील सिद्धांत आहे. म्हणून तर हिंदूंमध्ये श्रीराम, श्रीकृष्ण अशी नावे ठेवली जातात. कंस, रावण, शकुनी, शूर्पणखा अशी नावे आढळून येत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही राज्याभिषेक होताच राजभाषाकोष निर्माण करून फारसी शब्दांची हकालपट्टी करत संस्कृतप्रचुर शब्द प्रचलित केले होते. कोणी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला, तरी नावे, भाषा आणि संस्कृती अन् पर्यायाने राष्ट्र यांचा संबंध असतोच असतो. तो जाणून सनातन प्रभातनेही परकीय आक्रमकांची नावे पालटण्याचे सूत्र कायमच हाताळले आहे. सनातन प्रभात दैनिकातील वृत्तांमध्येही स्वकीय नावांचा वापर करून राष्ट्ररक्षणाच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे.

स्वाभिमानाचा अभाव

‘ज्यांनी आमच्या पूर्वजांचा अनन्वित छळ केला, लूट केली, महिलांचे शीलहनन केले, अशांची नावे स्वतंत्र भारतात नकोत’, असा एक साधासरळ विचार आहे; मात्र बुद्धीवादी आणि पुरोगामी यांच्या टोळीला हा साधा तर्क सहन होत नाही. नावे पालटून हिंदु अथवा भारतीय नावे देणे म्हणजे भगवेकरण, मागासलेपणाकडे वाटचाल, असे खुळचट युक्तीवाद चालू होतात. या युक्तीवादाला भीक घालण्याची आवश्यकता नाही; कारण हे युक्तीवाद म्हणजे भारतियांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न असतो. स्वदेश, धर्म, संस्कृती, भाषा, राष्ट्रपुरुष यांच्या गौरवशाली इतिहासाविषयी मनात ज्वलंत अभिमान असेल, तेव्हा परकीय आक्रमकांच्या नावाचे किडे डोक्यात वळवळणारही नाहीत. भारतमातेचे वीर सुपुत्र, देवी-देवता यांच्यावरून सात्त्विक नावे देण्यात येतील; पण घोडे नेमके इथेच अडते. स्वातंत्र्योत्तर काळात स्वाधीन झालेल्या जनतेला ‘स्व’तंत्राने ना शिक्षण देण्यात आले, ना राष्ट्रहितकारक राजकीय धोरणे आखण्यात आली, ना स्वभाषा लागू करण्यात आल्या. देशाच्या भौगोलिक सीमा जन्माने भारतीय; पण मनाने साम्यवादी आणि इंग्रजाळलेल्या व्यक्तींच्या हाती गेल्याने ही स्थिती ओढवली. नाहीतर १२०० वर्षांच्या राज्यकाळात मोघल आणि इंग्रज यांनी जी जी नावे पालटली, ती ती नावे स्वातंत्र्य गमिळताच पालटून भारतीय नावे दिली गेली असती; मात्र तसे झाले नाही आणि साम्यवादी इतिहासकारांनी पुढे चुकीचा इतिहास शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माथी मारल्याने नंतरही त्या दिशेने बुलंद आवाज उठला नाही. असे असले, तरी आता प्रयाग, अयोध्या यांच्या निमित्ताने चालू झालेली स्वकीय नामांतराची चळवळ स्वागतार्ह आहे. ती शतप्रतिशत पूर्ण व्हावी, ही अपेक्षा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now