भारत संरक्षणक्षेत्रात मोठी कामगिरी करत आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • पंतप्रधानांनी उत्तराखंड येथे सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी !

  • केदारनाथ मंदिरात दर्शन घेऊन केली पूजा !

असे असले, तरी पाककडून आतंकवादी आक्रमणे वाढतच आहेत. चीनसारखा देशही सीमेवर वारंवार कुरापती काढत आहे. त्यामुळे देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. अशा स्थितीत संरक्षणक्षेत्रात मोठी कामगिरी करण्यासाठी शासनकर्त्यांनी सैनिकांना पूर्ण मोकळीक देण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !

उत्तराखंड – दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर्षिल सीमेवर भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांच्यासह दिवाळी साजरी केली, तसेच सैनिकांना मिठाई भरवली. त्यानंतर त्यांनी केदारनाथ मंदिराला भेट देऊन तेथे पूजा केली. सैनिकांशी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, ‘‘भारत संरक्षणक्षेत्रात मोठी कामगिरी करत आहे. बर्फाच्छादित प्रदेशात तुम्ही सीमांचे रक्षण करत आहात. यामुळे भारतियांना दिलासा मिळतो. तुमच्यामुळेच जनता सुरक्षित जीवन जगू शकते.’’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान मोदी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी हिंदीमध्ये ट्वीट करून भारतियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानाच्या संदर्भात सशस्त्रदलाच्या सैनिकांचे कौतुक होत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.  या वेळी त्यांनी सैनिकांसाठी लागू केलेल्या ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेचाही उल्लेख केला. यापूर्वीही दिवाळीच्या दिवशी पंतप्रधानांनी सीमेवरील सैनिकांना भेट दिली आहे.

त्यानंतर पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिराला भेट दिली. तेथे त्यांनी केदारनाथाला अभिषेक घालून विशेष पूजा केली. त्यानंतर त्यांनी आदि शंकराचार्यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. वर्ष २०१३ मध्ये आलेल्या महाप्रलयानंतर तेथे चालू असलेल्या विकासकामांची त्यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही होते.


Multi Language |Offline reading | PDF