पर्यावरणवाद्यांची ‘अ’वैज्ञानिकता !

सध्या अनेक जण खाद्यपदार्थ बांधण्यासाठी आणि तळलेल्या पदार्थांमधील तेलाचे शोषण होण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करतांना दिसतात. काही तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि संघटना तर चक्क ‘गणेशमूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवा आणि पर्यावरण वाचवा’, असा अवैज्ञानिक सल्ला देऊन आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन घडवतात. असे असले, तरी शाई वापरलेला कागद सूक्ष्म जिवांपासून मानवापर्यंत म्हणजेच सर्वांसाठीच अधिक धोकादायक असल्याचे विज्ञानाने सिद्ध केले आहे.

बहुतांश वेळा उपवासाचे पदार्थ किंवा सणावाराला तळलेले पदार्थ ठेवण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर करण्यात येतो. वर्तमानपत्र छापण्यासाठी जी शाई वापरली जाते, त्यात ‘ग्राफाइट’ नावाचा घटक असतो. तेलकट पदार्थांमध्ये शाई लवकर शोषली जाते. ‘ग्राफाइट’ हा घटक मानवी शरिरास अत्यंत धोकादायक असून त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. शरिरातील इतर विषारी घटक मल-मूत्र विसर्जनातून शरिराबाहेर टाकली जातात; परंतु ‘ग्राफाइट’ शरिरात साचून राहिल्याने त्याचा मूत्रपिंड आणि फुफ्फुसे यांवर गंभीर परिणाम होतो.

कागदामध्ये असलेल्या शाईतील ‘सॉलव्हंट’मध्ये कॅडमियम, मॅग्नेशियम, क्रोमियम  आणि इतर घातक घटकांमुळे जलप्रदूषण होऊन जलचर प्राण्यांची पचनक्रिया अन् संप्रेरकांचे (‘हार्मोन्स’चे) संतुलन यांवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात जलचर प्राणी मरण पावतात. त्यामुळे तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि संघटना यांचा अवैज्ञानिकपणा येथे दिसून येतो. ‘पर्यावरण’ वाचवण्याचा त्यांचा दावा खोटा असून त्यामागचा हेतूही शुद्ध नाही’, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेणे आवश्यक आहे. कागदापासून विविध उत्पादने बनवणार्‍या लघु उद्योगातूनही निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ आणि कागदाचा लगदा, हे पर्यावरणासाठी ‘धोकादायक’च आहेत; कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. कागदी हस्तकलेसाठी वापरलेल्या कागदामध्ये (‘क्राफ्ट पेपर’मध्ये) विविध प्रकारची विषारी रसायने वापरली जातात, उदा. मिथाइल मरकॅप्टन, हा कागद मोहरमच्या वेळी ताबुतासाठी वापरून त्याचे पाण्यात विसर्जन करतात. त्यामुळेही जलप्रदूषण होते; परंतु या वेळी पर्यावरणवाद्यांच्या डोळ्यांवर मात्र पट्टी बांधलेली असते. कागदी लगदा खराब होऊ नये, यासाठी ‘सोडियम पेन्टाक्लोरोफिनेट’ हे ‘प्रेझरवेटिव्ह’ आणि ‘सल्फाइट’ दारू वापरली जाते.

यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन जलचर प्राणी आणि मानवासही हे घातक ठरते. वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे डोळेझाक करणारे पर्यावरणवादी आणि वृत्तवाहिन्या आव आणून ‘केवळ हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होते’, असे खोटे सांगतात. त्यामुळे सर्वत्रच्या हिंदूंनी सतर्क राहून योग्य आणि अयोग्य काय, यासाठी धर्मशिक्षण घेऊन हिंदुहिताचा विचार करावा.

– प्रा. विठ्ठल जाधव, भोर


Multi Language |Offline reading | PDF