दलाली सर्वत्रच !

रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन स्टॉर्मद्वारे देशभर एकदम कारवाई करून ८९१ दलालांना अटक केली आहे. रेल्वेने केलेली ही कारवाई नक्कीच दिलासादायक आहे; परंतु दलालांची संख्या १ सहस्र संख्येकडे वाटचाल करेपर्यंत रेल्वेला याचा थांगपत्ता नव्हता का ? हा प्रश्‍न रहातोच. या प्रश्‍नामुळे अनेक शंका-कुशंकाही जनतेच्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. भारतात तशी दलाली नवीन नाही. किंबहुना भारतातील कुठल्या क्षेत्रात दलाली नाही, हे शोधून काढणे हा संशोधनाचा विषय ठरेल. वाहतूक खाते, व्यापार क्षेत्र, विदेशात नोकरी आदी सर्वच क्षेत्रांत दलाली ही आहेच. या दलालीमुळेच भारतातील अनेक गोष्टींच्या किमतीही वाढीव असतात.

कृषी उत्पादनातील दलाली !

शेतकर्‍याला अल्प किमतीत त्याचे उत्पादन दलालाला विकावे लागते आणि दलाल नंतर मंडईतील भावानुसार शेतकर्‍याकडून घेतलेले उत्पादन विक्रेत्यांना पुरवतो.  यात दलालाला प्रचंड आर्थिक लाभ होतो; पण या बाजारभावाचा शेतकर्‍याला कणभरही लाभ होत नाही. त्यामुळे सध्या हमीभावाची मागणी होत आहे. हा हमीभाव देण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या कराच्या पैशाला कात्री लागणार. हे दलाल बाजारभाव गडगडल्याचे सांगून शेतकर्‍याकडून अल्प किमतीत माल (उत्पादन) लाटतात. बाजारभाव गडगडल्याचे चित्र या दलालांनीच निर्माण केलेले असते. माल बाजारात न आणता हे दलाल त्या मालाची कृत्रिम टंचाई बाजारात निर्माण करतात. यामुळे उत्पादनाचे भाव वाढतात आणि त्यानंतर मग शेतकर्‍याकडून अल्प किमतीत घेतलेला माल ग्राहकांना वाढीव किमतीत विकला जातो. शेतमाल विक्रीतील ही दलाली सध्या सर्वत्रची महागाई वाढण्यास आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांस मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. सरकार मात्र या दलालीवर अंकुश ठेवू शकलेली नाही.

सरकारी खात्यांतील ‘कमिशन’ प्रवृत्ती !

दुसर्‍या प्रकारची दलाली आपण वाहतूक खात्यात पहातो. या खात्यात आणि अन्य ठिकाणी होणारी दलाली ही ‘कमिशन’ प्रकाराची असते. वाहतूक खात्यासारख्या खात्यात तुम्हाला रांगेत घंटोनघंटे उभे राहून जे करावे लागणार ते दलाल तुमच्याकडून काही पैसे घेऊन करतो. हा दलाल म्हणजे तुम्ही या कामासाठी तात्पुरता नेमलेला नोकर असे म्हणायलाही हरकत नाही; परंतु यामुळे जे रांगेत राहू शकतात, ज्यांच्याकडे दलालांना देण्यासाठी पैसे नसतात, त्यांना मात्र खूप मोठी अडचण येते. खात्याच्या ज्या खिडकीवर कागदपत्रे देऊन काम करून घ्यायचे असते, त्या ठिकाणी दलालांचीच गर्दी असते. सर्वच दलालांची तेथील कर्मचार्‍यांशी घसट असते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला ताटकळत रहावे लागते, तर दलालांचे काम आधी होते. शासकीय खात्यांतील कामकाजाची पद्धतही एवढी क्लिष्ट आहे की, सर्वसामान्यांना ती समजणेही कठीण असते. त्यामुळे कधीकधी व्यक्तीला एका कामासाठी २ ते ४ वेळाही खेपा माराव्या लागतात. या कटकटीतून सुटका म्हणजे दलालाचा पर्याय. यामुळेच दलाली फोफावली आहे.

रेल्वे खात्यातील दलालीची व्यापकता !

रेल्वे खात्यातील दलाली ही ऑनलाईन रेल्वे आरक्षणामुळे वाढली कि काय अशी शंका घेण्यास वाव आहे. ऑनलाईन रेल्वे आरक्षणामुळे घरबसल्या प्रवासी हव्या त्या रेल्वेचे आरक्षण करू शकतो; पण कधीकधी आरक्षणाचा दिवस चालू झाल्यावर संबंधित गाड्यांची तिकिटे संपल्याचा संदेश त्याला मिळतो. सणासुदीच्या काळात हा प्रकार अधिक असतो. सर्वसामान्य प्रवासी समजतो की, सणामुळे गर्दी वाढली असणार. त्यामुळे तिकिटे संपली असतील; पण हेच तिकीट त्या गाडीची वेळ जवळ आल्यावर काहींना मिळते, हे कसे काय ? हे तिकीट वाढीव किंमत मोजून मिळवलेले असते. याविषयी तो प्रवासीही आवाज उठवत नाही; कारण त्यालाही देशातील भ्रष्टाचाराची, दलालीची बजबजपुरी नष्ट करण्याची इच्छाशक्ती किंवा वेळ नसतो. दुसरे असे की, काही सेकंदांतच तिकिटे संपल्याचा ग्राहकांना संदेश येतो, ही रेल्वे खात्याला ठाऊक नव्हते असे म्हणता येणार नाही. या खात्यातही कुठेतरी या दलालीचे पाणी मुरत असणारच. या सर्वच अनिष्ट प्रवृत्ती दलाली माजण्यास उत्तरदायी आहेत. पकडलेल्या दलालांसमवेत तिकिटे आरक्षित करणारे अवैध सॉफ्टवेअरही जप्त झाले असून यातून या दलालीची व्यापकता लक्षात येते.

आवश्यक उपाय !

या सर्वत्रच्या दलालीच्या सूत्रावरून आपण लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व सुविधा प्राप्त केल्या; पण त्याचा अपलाभ उठवणार्‍या प्रवृत्ती नष्ट करू शकलो नाही. याचा अर्थ विज्ञान असो किंवा तंत्रज्ञान या गोष्टी मनुष्याच्या प्रवृत्ती नष्ट करू शकत नाहीत. त्यामुळे तंत्रज्ञान आणि विज्ञान यांद्वारे कितीही भौतिक प्रगती केली, तरी अनिष्ट प्रवृत्ती त्यातून मनुष्याला दुःखच देतील. देशात गरिबी, बेरोजगारी यांमुळे काही जण असे अवैध व्यवसाय करतात, असे म्हटले जाते; पण यामुळे काही जणांनी गुन्हेगारी मार्ग अवलंबल्यास त्यांचे समर्थन करता येणार नाही. सात्त्विक किंवा चांगले संस्कार असलेली व्यक्ती असे काळे धंदे कधीच करणार नाही. याला गुन्हेगारी प्रवृत्तीच कारणीभूत आहे. या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी समाजात सात्त्विकता निर्माण होणे आवश्यक आहे. ती विज्ञान आणि तंत्रज्ञान निर्माण करू शकत नाही. मानसशास्त्रही अत्यंत अल्प प्रमाणात यासाठी लाभदायक ठरू शकते. त्यामुळे अध्यात्माची म्हणजेच साधनेची कास धरणे आणि समाजातही त्याचा प्रसार करून जनतेला धर्माचरणास प्रवृत्त करणे, हाच एकमेव आवश्यक उपाय ठरतो !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now