अरिहंत

संपादकीय

‘आयएन्एस् अरिहंत’ या अण्वस्त्रक्षम पाणबुडीने भारतीय नौदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय बनावटीच्या या पहिल्या अण्वस्त्रक्षम पाणबुडीने पहिली प्रतिबंधात्मक गस्त यशस्वीरित्या पूर्ण केली. यापूर्वी अग्नी क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भूमीवरून आणि मिराज – २००० लढाऊ विमानांच्या माध्यमातून आकाशातून अण्वस्त्रे डागण्याची भारताची क्षमता होती. उणीव होती, ती केवळ पाण्यातून म्हणजेच समुद्रमार्गे अण्वस्त्रे डागण्याची ! ती आता पूर्ण झाली असून अरिहंतच्या निमित्ताने भारताचे आण्विक त्रिकूट पूर्ण झाले आहे.

भारतीय नौदल हे विश्‍वातील बलाढ्य ५ नौदलांपैकी १ मानले जाते. वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानसमवेतच्या युद्धामध्ये भारतीय नौदलाने मोलाची कामगिरी निभावली होती. कराची बंदरावर बॉम्बआक्रमण करून ते उद्ध्वस्त करण्यात नौसैनिकांचा सिंहाचा वाटा होता. भारताच्या तिन्ही सीमा समुद्राने वेढलेल्या असल्याने संरक्षण क्षेत्रात नौदलाचे विशेष स्थान आहे. हे नौदल जेव्हा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष क्षमता असलेल्या युद्धसामुग्रीने सज्ज होते, तेव्हा त्याचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे; पण तेवढ्यावरच समाधान मानणे, हा आत्मघात ठरू शकेल.

तांत्रिक सक्षमता हवी !

आज अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत अजूनही अन्य देशांवर अवलंबून आहे. भारतामध्ये मनुष्यबळ, साधनसामुग्री यांची विपुल उपलब्धता असूनही केवळ तंत्रज्ञानाच्या अभावी भारताला काही तडजोडी सहन कराव्या लागत आहेत. गेल्या काही शतकांमध्ये भारतीय बुद्धीमत्तेला मागासलेपणाचे आणि न्यूनगंडाचे आवरण चढवण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात स्वीकारल्या गेलेल्या गुलामीच्या शिक्षणपद्धतीमुळे हे आवरण अधिकच घट्ट होत राहिले. त्यातूनच आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत अन्य जगाच्या तुलनेत काहीसा मागे राहिला आहे. त्याचा सर्वाधिक फटका बसला, तो संरक्षण विभागाला. आज रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स हे देश संरक्षणविषयक तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर आहेत. युद्धसज्जतेसाठी भारताला या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. अण्वस्त्र निर्मितीच्या वेळीही भारताला अण्वस्त्रसज्ज देशांच्या दादागिरीचा सामना करावा लागला होता. असे असले, तरी यशस्वी अणूचाचण्या घेऊन, तसेच कोणत्याही यंत्रणेद्वारे माग काढता येऊ न शकणारी स्वदेशी बनावटीची अरिहंत यशस्वीरित्या सिद्ध करून भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. तंत्रज्ञान हे वेगाने विकसित होत असते. संरक्षणक्षेत्राने या वेगाशी जुळवून घेणेही अपरिहार्य असते. एकीकडे काही आधुनिक युद्धसामुग्री निर्माण होत आहे, तर दुसरीकडे अनेक सैनिकांना मूलभूत गोष्टीही मिळत नसल्याचे चित्र आहे. सैन्यदलामध्ये सहस्रोंच्या संख्येने पदे रिक्त आहेत. सैनिकांना मिळणार्‍या अन्नाची गुणवत्ता, त्यांना मिळणारे थंडीतील कपडे, बंदुका, बुलेटप्रूफ जॅकेट्स यांच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह आहे. हा विरोधाभास न्यून करून सैन्याचे आधुनिकीकरण करण्याला प्राधान्य द्यायला हवे. देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी तांत्रिक सक्षमता साध्य करून संरक्षण क्षेत्रातही स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने पावले टाकणे आवश्यक आहे. देशाची यंत्रणा विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून ठेवणे, हे युद्धकाळात मोठी किंमत चुकवायला लावू शकते.

गेल्या काही दशकांमध्ये युद्धाची माध्यमे पालटली आहेत. भू, जल, आकाश यांच्या जोडीला नानाविध माध्यमांतून छुपे युद्ध छेडले जात आहे; किंबहुना आताही हे छुपे युद्ध चालूच आहे. व्यापारयुद्धाद्वारे देशाच्या चलनाचे अवमूल्यन करणे, महत्त्वाच्या संगणकीय प्रणाली ‘हॅक’ करणे, हा छुप्या युद्धाचाच प्रकार आहे. देशाची संस्कृतीशी असलेली नाळ तोडणे, उदारमतवादाच्या नावाखाली देशवासियांमधील दिग्विजयाची विजिगीषू वृत्ती नाहीशी करणे, राष्ट्रभक्तीची भावना क्षीण करणे, अशी शत्रूला पूरक कामे देशांतर्गत शक्तीही पार पाडत असतात. अशा परिस्थितीत सतर्क राहून देश आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी लढा देणे, हे राजाचे कर्तव्यच आहे.

राष्ट्रप्रेमी राज्यकर्त्यांची आवश्यकता !

विश्‍वाचा इतिहास हा युद्धमय आहे. एक-दीड शतकापूर्वी अहिंसेचा अतिरेकी मारा झाल्याने भारतियांमधील शौर्यजागरणाची वृत्ती कमजोर झाली. भारतीय संस्कृतीमध्ये युद्ध कधीही निषिद्ध मानले नाही. रामायण, महाभारत या हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांमध्ये तर रामराज्य आणि धर्मराज्य यांची स्थापना युद्धानंतरच प्रस्थापित झाल्याचे वर्णन अन् इतिहास आहे. दुर्जनांचा विनाश आणि सज्जनांचे रक्षण यांसाठी साक्षात भगवंत अवतीर्ण होतात, असे भगवान श्रीकृष्णाने वचन दिले आहे. साम्राज्यविस्ताराच्या स्वार्थी भावनेपोटी छळकपट करून नाही, तर एका उदात्त भावनेतून आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून युद्ध खेळण्याची भारतियांची परंपरा आहे. भारताला चारही बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी वेढलेले असतांना सक्षम सैन्याएवढेच राष्ट्रप्रेमी, दूरदर्शी, तत्पर नेतृत्व देशाला मिळणे आवश्यक आहे. ‘अरिहंत’ शब्दाचा अर्थ आहे, शत्रूचा कर्दनकाळ ! पाणबुडीच्या जोडीला ‘अरिहंत’ वृत्ती असलेले, प्रखर राष्ट्रप्रेमी राज्यकर्ते भारतवासियांना मिळावेत, अशी कामना करायला काय हरकत आहे ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now