राममंदिराच्या बाजूने असणाऱ्यांनी आमच्या मोहिमेत सहभागी व्हावे ! – शिवसेना

मुंबई – अयोध्येत राममंदिर व्हावे, अशी इच्छा बाळगणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, अन्य राजकीय पक्ष आणि काँग्रेसनेही शिवसेनेने हाती घेतलेल्या राममंदिर उभारणीच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी केले. ‘याकडे पक्षीय सूत्र म्हणून न  पहाता ‘राममंदिर व्हावे’, अशी आस असलेल्या सर्वांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा’, असे श्री. राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेसाठी त्यांचे मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यावर वेगवेगळे दायित्व दिले आहे. श्री. राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे. नियोजित मंदिर न्यासाचे महंत आणि अन्य पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना तेथे आमंत्रित केले आहे. ते २५ नोव्हेंबर या दिवशी राममंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तसेच सभाही घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही वेळ पडल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF