नरकासुरास प्रायश्‍चित्त !

आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (६ नोव्हेंबर २०१८) या दिवशी असलेल्या नरकचतुर्दशीच्या निमित्ताने…

‘आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी या दिवशी श्रीकृष्णाने मदोन्मत्त अशा नरकासुराचा वध करून ‘परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम् ।’, हे आपले जीवितरहस्य सिद्ध केले.

नरकासुर हा प्राग्ज्योतिषपूरचा राजा असून फार दुष्ट होता. देव आणि सज्जन यांना अतिशय पीडा देत असे. त्यांच्या सोळा सहस्र कन्या आणून त्याने अलका नगरीजवळ असलेल्या मणिपर्वतावर ठेवल्या होत्या. ‘परदेश गुलाम म्हणून त्यांना विकावे’, असा नीच उद्देश नरकासुराचा असावा.

दुःखितांचा वाली श्रीकृष्ण यांस ही परिस्थिती समजल्यावर त्याने नरकासुराचा नाश करण्याचे ठरवले. तो लागलीच सत्यभामेसह प्राग्ज्योतिषपुरास आला आणि त्याने कित्येक विरोधक दैत्यांस ठार केले. ‘निसुंद’, ‘हयग्रीव’, ‘विरूपाक्ष’ आदी प्रतापी वीरांचे पारिपत्य केल्यानंतर पांचजन्य शंख वाजवून श्रीकृष्णाने नरकासुरास आव्हान दिले. नरकासुरास फारच क्रोध आला आणि लागलीच रथारूढ होऊन तो कृष्णावर चाल करून आला. त्याचा रथ मोठा असून मौल्यवान आणि विस्तृत होता. रथाला एक सहस्र घोडे जुंपलेले होते. त्याचे आणि श्रीकृष्णाचे तुंबळ युद्ध झाले. त्यांत श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने नरकासुराचे शिर उडविले.

त्यानंतर कृष्णाने त्या सोळा सहस्र बंदिवासिनी स्त्रियांना मुक्त केले ! श्रीकृष्णाची ही कामगिरी अलौकिक अशी होती. ‘स्त्रीदास्य विमोचक’ म्हणून त्याचा मोठाच महिमा आहे. मुक्त झालेल्या सोळा सहस्र स्त्रियांनी आपल्याला मुक्त करणार्‍या श्रीकृष्णाला कृतज्ञतापूर्वक आपला धनीच मानले.

नरकासुराच्या वधामुळे जिकडे तिकडे आनंद झाला. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण घरी येताच त्यास मंगलस्नान घालण्यात आले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आपला संतोष व्यक्त केला. या विजयाचे स्मरण म्हणून आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशीचा दिवस सर्व हिंदू नरकचतुर्दशी म्हणून साजरा करतात.’

संदर्भ : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’ (लेखक : प्रल्हाद नरहर जोशी, पुणे. (प्रथम आवृत्ती : वर्ष १९५०))

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now