नरकचतुर्दशीला केला जाणारा यमतर्पण विधी, तो करण्याची पद्धत आणि तो ओल्या वस्त्रानिशी करण्यामागील शास्त्र

१. यमतर्पण विधी

‘तर्पण’ म्हणजे ‘तृप्त करणे’. यमतर्पण या विधीमध्ये नरकचतुर्दशीला यमाच्या पुढील १४ नावांनी तर्पण करतात. या विधीत यमाची स्तुती करण्यासाठी त्याचे प्रत्येक नाव ३ वेळा उच्चारून प्रत्येक वेळा पळीने हातावरून ताम्हणात पाणी सोडतात.

२. यमाची १४ नावे आणि त्यांचा अर्थ

अ. यम : जिवांना या जन्मात त्यांच्या कर्माचे फळ मिळणे किंवा न मिळणे याचे नियमन करणारा

आ. धर्मराज : धर्माचे रक्षण करणारा राजा

इ. मृत्यू : मरण देणारा

ई. अंतक : आयुष्याचा अंत करणारा

उ. वैवस्वत : ‘विवस्वान्’ म्हणजे ‘सूर्य’. ‘वैवस्वत’ म्हणजे ‘सूर्याचा पुत्र’

ऊ. काल : प्राणीमात्रांना प्रेरणा देणारा

ए. सर्वभूतक्षयकर : सर्व प्राणीमात्रांचा क्षय करणारा, म्हणजे सर्व प्राणीमात्रांचे प्राण हरण करणारा

ऐ. औदुंबर : ‘उ’ म्हणजे ‘शिव’. ‘उंबर’ म्हणजे ‘उत्कृष्ट’. ‘उदुंबर’ म्हणजे ‘शिवाचा उत्कृष्ट उपासक’, म्हणजे ‘सूर्य’. ‘औदुंबर’ म्हणजे ‘सूर्याचा पुत्र’.

ओ. दध्न : ‘दधते’ म्हणजे ‘देतो’. जिवांना त्यांच्या पाप-पुण्यांचे फळ देणारा

औ. नील : गडद वर्णाचा (व्यवहारात निळ्या रंगासाठी ‘नील’ हा शब्द प्रचलित असला, तरी ‘नील’ या शब्दाचा खरा अर्थ ‘गडद’ असा आहे.)

अं. परमेष्ठी : परम म्हणजे उच्च. ‘इष्ठी’ हे पद ‘स्था-तिष्ठ’, म्हणजे ‘उभे रहाणे’ या धातूपासून बनले आहे. (‘धातू’ म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप). ‘परमेष्ठी’ म्हणजे उच्च स्थानी रहाणारा

क. वृकोदर : वृक म्हणजे लांडगा. ‘उदर’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘पोट’ असा असला, तरी येथे हा शब्द ‘भूक’ या अर्थाने वापरला आहे. ‘वृकोदर’ म्हणजे लांडग्याप्रमाणे (जिवांच्या प्राणांची) भूक असलेला

ख. चित्र : चित्र म्हणजे लिहिणे. जिवांच्या पाप-पुण्यांचा हिशोब लिहून ठेवणारा

ग. चित्रगुप्त : जिवांच्या पाप-पुण्यांचा हिशोब गुप्त ठेवणारा

३. यमतर्पणाचा उद्देश आणि महत्त्व

‘अपमृत्यू येऊ नये’, यासाठी हा विधी केला जातो. दिवाळीच्या काळात यमलहरी यमलोकातून भूलोकात अधिक प्रमाणात येत असतात. त्यामुळे या काळात यमतर्पण केल्याचा लाभ अधिक असतो. सर्वप्रथम यमतर्पणाचा संकल्प करावा. संकल्पामुळे आपल्या प्राणमय आणि मनोमय या कोषांची शुद्धी होते.

४. पिता जीवित असलेल्यांनी यमतर्पण करण्याची पद्धत

अभ्यंगस्नान करतांना पहिले दोन तांबे पाणी अंगावर घेतल्यावर ज्यांचे पिता जीवित आहेत, त्यांनी हातात अक्षता घेऊन यमादी देवतांची नावे घेत देवतीर्थाने, म्हणजे बोटांच्या अग्रभागाने ताम्हणात पाणी सोडावे.

५. पिता जीवित नसलेल्या व्यक्तींनी करावयाच्या यमतर्पणाची पद्धत

ज्यांचे पिता जीवित नाहीत, अशांनी प्रथम अपसव्य करावे, म्हणजे जानवे उजव्या खांद्यावर घ्यावे. त्यानंतर पाण्यात थोडे काळे तीळ घालावेत. त्यानंतर यमादी देवतांचे नामोच्चारण करून त्या पाण्याने यमतर्पण करावे. पाणी पितृतीर्थाने, म्हणजे अंगठ्याच्या बाजूने सोडावे.

६. यमतर्पणाचा विधी ओल्या वस्त्रानिशी करण्यामागील शास्त्र

६ अ. सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी सांगितलेले शास्त्र : ‘यमतर्पण हे स्नान करतांना ओल्या वस्त्रानिशी करावे. पूर्वीच्या काळी लोक नदीवर स्नानासाठी जात असत आणि तेथेच ओलेत्याने तर्पणविधी करत असत. आता काळानुसार ते सर्वांना शक्य नसल्याने स्नानगृहात स्नान केले जाते. त्यामुळे हा विधी तेथे करावा. त्यानंतर स्नान पूर्ण करावे. ज्यांना काही कारणाने स्नानगृहातच यमतर्पण करणे शक्य नसेल, त्यांनी स्नानगृहाच्या बाहेर येऊन यमतर्पण केले तरी चालते; परंतु त्यानंतर पुन्हा स्नान करायला हवे. तर्पणाचे पाणी स्नानगृहाच्या पाण्यासमवेत वाहू नये, यासाठी तर्पणविधीसाठी ताम्हणाचा उपयोग करावा. नंतर हे पाणी झाडांना घालावे.’

(२९.१०.२०१८)  

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी यमतर्पण या विधीविषयी सांगितलेले शास्त्र

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

‘मनुष्यदेह हा पृथ्वी आणि आप या तत्त्वांनी बनलेला आहे. ओल्या वस्त्रानिशी तर्पण केल्याने आपतत्त्वाचा शरिराशी थेट स्पर्श होतो. आपतत्त्वामुळे यमलहरींचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणे सुलभ होते. त्यामुळे तर्पण करणार्‍याला यमलहरींचा अधिक लाभ होतो. हे सूत्र प्राथमिक स्तरावरील साधकासाठी, म्हणजे कर्मकांडानुसार पूजनादी साधना करणार्‍यासाठी आहे. साधनेच्या पुढच्या टप्प्यात आध्यात्मिक प्रगती झाल्याने मनुष्यदेह देवतेकडून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व ग्रहण करू शकतो. त्यामुळे त्याला ओल्या वस्त्रानिशी तर्पण करण्याची आवश्यकता नसते.’

(२९.१०.२०१८) 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now