साक्षीभाव, स्थिरता आणि नम्रता असलेले देवद येथील सनातनच्या आश्रमातील बलभीम येळेगावकर आजोबा ८२ व्या संतपदी विराजमान !

गुरुमाऊलींनी दिली सर्वांना दीपावलीची आनंददायी भावभेट !

३ साधिकांनीही गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. बलभीम येळेगावकर यांची भावमुद्रा
सन्मान सोहळ्यानंतर डावीकडून श्रीमती अनुराधा मुळ्ये, पू. बलभीम येळेगावकर आजोबा, सौ. संध्या जामदार आणि मागे उभ्या असलेल्या सौ. जया साळोखे

पनवेल – देवद येथील  सनातनच्या आश्रमामध्ये ५ नोव्हेंबरला झालेल्या एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर (वय ८४ वर्षे) हे संतपदी विराजमान झाले असल्याचे सनातनच्या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी घोषित केले. ते सनातनचे ८२ वे संत झाले आहेत. या आनंदवार्तेसह याच सोहळ्यात आश्रमात सेवा करणार्‍या साधिका श्रीमती अनुराधा मुळ्ये, सौ. जया साळोखे आणि सौ. संध्या जामदार या ३ साधिकांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असल्याचे घोषित करण्यात आले.

पू. बलभीम येळेगावकर यांचा सन्मान आणि ३ साधिकांचा सत्कार सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांनी केला. या वेळी पू. बलभीम येळेगावकर यांनी आणि ३ साधिकांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी आणि त्यांच्यासमवेत सेवा करणार्‍या साधकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला परात्पर गुरु पांडे महाराज, पू. गुरुनाथ दाभोलकरकाका, पू. देशपांडेआजोबा, पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. उमेश शेणै, पू. सत्यवती दळवीआजी, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

अशी झाली घोषणा…..!

या भावसत्संगाचे सूत्रसंचालन सौ. अनघा जोशी यांनी अत्यंत भावपूर्णरित्या केले. सूत्रसंचालन करतांना त्यांनी प्रारंभ श्रीकृष्णाचा भावपूर्ण श्‍लोक म्हणून केला. दिवाळीच्या या पावन पर्वावर अनमोल भावसत्संग मिळाल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून भावप्रयोग घेतला. त्यानंतर ‘क्षणभर उघड नयन देवा …’ हे भावगीत गायल्याने सर्व वातावरण चैतन्यदायी झाले. यामुळे उपस्थित साधक भावस्थितीत गेले.

सर्वांनाच आजच्या कार्यक्रमामध्ये कोणत्या वार्ता ऐकायला मिळणार याची उत्कंठा लागली होती. त्यानंतर पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी प्रथम श्रीमती अनुराधा मुळ्ये यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. त्यानंतर ‘उत्पादनांशी संबंधित सेवा करतांना फलनिष्पत्ती कशी वाढली’ याविषयी पू. रमेश गडकरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्पादनाशी संबंधित सेवा करणार्‍या साधिका सौ. जया नितीन साळोखे आणि सौ. संध्या जामदार यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्याचे पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी घोषित केल्यानंतर सर्वांना पुष्कळ आनंद झाला. यानंतर ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पहात होते, तो क्षण म्हणजे श्री. बलभीम येळेगावकरआजोबा यांच्या संतपदाची घोषणा ! ते ८२ वे संत झाल्याचे घोषित करण्यात आले.

क्षणचित्रे

१. गुरुमाऊलींनी दिवाळीला अनमोल भेट दिली, याविषयी सर्वांचे नातेवाईक आणि साधक यांना कृतज्ञता वाटत होती.

२. घोषणा झाल्यानंतर पू. येळेगावकरआजोबा यांच्या तोंडवळ्यावर साक्षीभाव होता. तसेच तीनही साधिकांचा भाव जागृत झाला.

३. सौ. जया साळोखे यांना आदल्या रात्री ‘आपला उद्या सत्कार होणार आहे’, अशी पूर्वसूचना मिळाली होती, असे त्यांनी मनोगतामध्ये सांगितले.

४. पू. येळेगावकरआजोबा यांची नात सौ. स्वराली आें\कार पाध्ये यांनी ‘आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पहात होतो’, असे मनोगतामध्ये सांगितले.

५. दिवाळीच्या निमित्ताने गुरुदेव या अनमोल भावभेटीद्वारे किती आनंद देत आहेत, असे वाटून देवद आश्रमातील सर्व साधकांना कृतज्ञतेने भरून येत होते.

लागली सर्वत्र चैतन्यदायी दीपावलीची चाहूल ।

देवद आश्रमातील साधिकांनी

टाकले आध्यात्मिक प्रगतीचे पाऊल ॥

आध्यात्मिक प्रगतीच्या सुवार्तेने

हर्षोल्हासित झाले साधकजन ।

दीपोत्सवात आनंदोत्सव

अनुभवे देवद आश्रम ॥


Multi Language |Offline reading | PDF