भारतीय सैनिकांच्या वेदना !

संपादकीय

भारतीय सैनिकांचा अतुलनीय पराक्रम आणि त्याग हा वादातीत आहे. यात आणखी एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे आपले भारतीय सैनिक हे या पराक्रमाचा अथवा त्यागाचा कधी गाजावाजा करत नाहीत. ‘राष्ट्रासाठी प्राणार्पण करणे, हे स्वत:चे कर्तव्यच आहे’, या भावनेने ते देशाची सेवा करत असतात; मात्र त्यांच्या या सेवेचे मोल किती जणांना आहे ? अलीकडेच ‘दगडफेक करणार्‍या नागरिकांमुळे सैनिक हुतात्मा होत असतांनाही अशा नागरिकांना ‘आतंकवादी’ ठरवू दिले जात नाही !’, असे वक्तव्य सैन्यप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले. हे वाक्य खूप बोलके आहे. जनरल रावत यांनी त्यांच्या मनात असणारे दुःख आणि संताप यांना अत्यंत संयतपणे मोकळी वाट करून दिली आहे.

तसे पाहिले, तर सैन्यदल हे बोलण्यापेक्षा कृतीमध्ये विश्‍वास ठेवते; मात्र सैनिकांचे हात बांधून ठेवले असतील तर ? पाककडून सातत्याने भारतविरोधी कारवाया होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे प्रतिदिन पाकचे सैनिक आणि आतंकवादी यांच्याकडून भारतीय सैनिकांवर होत असलेले आक्रमण होय. या आक्रमणास चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय सैनिक त्यास परतवून लावतात; मात्र एवढे पुरेसे आहे का ? आतंकवादाचा कायमचा निःपात करायचा असेल, तर पाकच्या सीमेत घुसून त्याला धडा शिकवणे आवश्यक आहे. भारतीय सैनिकांचे हात त्यासाठी शिवशिवत आहेत; मात्र भाजप सरकारला बहुदा ते मान्य नाही. एकदा केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर सरकार समाधानी आहे. हे बहुदा आता भारतीय सैन्यदलालाही खटकत असावे; मात्र शासनकर्त्यांना हे कोण समजावणार ?

सैनिकांचा हकनाक बळी !

काश्मीरमधील अनंतनाग येथील स्थानिक देशद्रोही नागरिकांनी सैनिकांच्या पथकावर केलेल्या दगडफेकीत राजेंद्र सिंह या सैनिकाचा मृत्यू झाला. राजेंद्र सिंह हे केवळ २२ वर्षांचे होते. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून ते सैन्यात भरती झाले. सीमेवर अतुलनीय पराक्रम गाजवण्याचे स्वप्न त्यांनीही पाहिले असेल; मात्र आतंकवादी अथवा पाक सैन्य यांचा सामना करण्याआधी त्यांना काश्मीरमधील दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांना सामोरे जावे लागले. या देशद्रोह्यांना सरकारदरबारी मान आहे. ते म्हणे ‘वंचित’ आहेत. काहींना ते ‘भरकटलेले’ वाटतात. त्यामुळे त्यांना साधे खरचटले, तरी त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ होते. सैनिकांनी आतंकवाद्यांच्या विरोधात एखादी मोहीम हाती घेतल्यावर ही ‘भरकटलेली’ मंडळी त्या स्थळी जातात आणि भारतीय सैनिकांवर दगडफेक करून आतंकवाद्यांना पळून जाण्यासाठी साहाय्य करतात. अशा दगडफेक करणार्‍या आतंकवाद्यांनी राजेंद्र सिंह यांचा बळी घेतला. हा भारतीय सैनिकांच्या अस्मितेवर घाला आहे. जनरल बिपीन रावत यांनी केलेले हे वक्तव्य या पार्श्‍वभूमीवर केले आहे. या आधीही १-२ सैनिकांनी दगडफेक करणार्‍या आतंकवाद्यांनी केलेल्या दगडफेकीत प्राण गमावले आहेत. असे असतांनाही या देशद्रोही धर्मांधांवर कारवाई करण्याचा आदेश नवी देहलीतून निघत नाही. याचा अर्थ ‘देशद्रोही धर्मांध सैनिकांवर दगडे मारणार आणि सैनिकांनी काहीही न करता ते केवळ झेलायचे’, असे भाजप सरकारला वाटते का ? इस्रायली सैनिकांवरही पॅलेस्टिनी नागरिक दगडफेक करत असतात; मात्र अशांवर थेट गोळी घालून त्यांना ठार मारले जाते अथवा अटक करून त्यांना कारागृहात डांबले जाते. इस्रायलविरोधी कृती करणार्‍यांवर काय कारवाई करायची, हे तेथील शासनकर्त्यांनी निश्‍चित केले आहे. त्यामुळे अशा कृती करणार्‍यांवर सैनिक तुटून पडतात. या उलट भारतीय शासनकर्ते ! काही मासांपूर्वी एक देशद्रोही नागरिक भारतीय सैनिकाला धक्काबुक्की करत असल्याची ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली होती. ती पाहून कुठल्याही राष्ट्रप्रेमीच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याविना रहाणार नाही. जगात सैनिकांची एवढी मानहानी केवळ भारतातच होत असेल !

संवेदनशीलतेचा अभाव !

वर्ष २०१५ मध्ये हुतात्मा झालेल्या एका सैनिकाच्या मुलीने ‘नेहमीच सैनिकांच्या कुटुंबियांना अश्रू का ढाळावे लागतात ?’, असा प्रश्‍न गृहमंत्री राजनाथ सिंह यांना विचारला होता. या प्रश्‍नामुळे राजनाथ सिंह निरुत्तर झाले. आजही या प्रश्‍नाचे उत्तर सिंह यांच्याकडे आहे का ? आतंकवादी, दगड फेकणारे देशद्रोही आणि नक्षलवादी यांच्या हातून सैनिक अन् पोलीस यांचा हकनाक बळी जात आहे. असे असतांनाही भाजपचे शासनकर्ते त्यांचा निःपात करण्यास सिद्ध नाहीत. जनता आणि सुरक्षादले यांच्याविषयी असलेल्या संवेदनशून्यतेमुळेच असे होत आहे.

पूर्वीचे राजे हे राज्यकारभार करायचे आणि रणभूमीवर जाऊन पराक्रमही गाजवायचे. त्यामुळे राजा आणि सैन्य यांच्यात सलोख्याचे संबंध असायचे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत अशी अनेक उदाहरणे आहेत, जेथे राजे त्यांच्या सैनिकांची पित्याप्रमाणे काळजी घेत असत. छत्रपती शिवरायांमधील याच गुणांमुळे मावळे त्यांच्यावर जीव ओवाळून टाकण्यासाठी सिद्ध असत. छत्रपतींनाही त्यांच्या प्रत्येक मावळ्याचे, सरदारांचे मोल ठाऊक होते. बाजीराव पेशव्यांचेही त्यांच्या सैनिकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आजकाल मात्र शासनकर्ते देहलीत बसलेले असतात आणि सैनिक काश्मीरमध्ये लढत असतात. त्यामुळे सैनिकांना नेमक्या काय अडचणी असतात, हे त्यांना कसे कळणार ? जिथे जिव्हाळा, आपुलकी, प्रेम असते, त्या नात्यात संवेदनशीलता असते. आजच्या शासनकर्त्यांना सैनिकांविषयी असे काहीच वाटत नसल्यामुळे त्यांच्या प्राणांचे मोल त्यांना कळत नाहीत. सैनिकांचे मूल्य समजणारे शासनकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now