तिमिराकडून तेजाकडे !

संपादकीय

दीपावलीला आरंभ होत आहे. हा सण आनंदाचा, सौख्याचा आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा ! दीपावलीत पणत्या लावून घर आणि आजूबाजूचा परिसर प्रकाशमान केला जातो. ‘जसा पणत्यांच्या ज्योतीमुळे आजूबाजूचा परिसर लख्ख प्रकाशित होतो, त्याप्रमाणे आपले आयुष्यही प्रकाशमान व्हावे’, अशी मनोमन आपण कामना करतो. या वेळीही दिवाळी साजरी करतांना फराळाचा आस्वाद घेतला जाईल, नवनवीन वस्तूंची खरेदी केली जाईल, कंदील आणि पणत्या लावल्या जातील; मात्र असे करतांना हिंदूंनी आजूबाजूलाही डोकावणे आवश्यक आहे. हुतात्मा सैनिकांच्या घरी या वेळी दिवाळी साजरी केली जाणार का ? दंगलींमध्ये धर्मांधांनी हत्या केलेल्या हिंदु तरुणांचे कुटुंबीय या वेळी दिवाळी साजरी करणार का ? एवढेच काय पाक, बांगलादेश, श्रीलंका येथील पीडित हिंदू या वेळी सुखा-समाधानाने दिवाळी साजरी करणार का ? हे प्रश्‍न आज भारतातील हिंदूंनी स्वतःला विचारायचे आहेत. ‘या प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारक असणार नाहीत’, हेही हिंदूंनी जाणावे. याचे कारण म्हणजे आज हिंदूबहुल भारतात हिंदूंची झालेली दयनीय स्थिती ! आज प्रत्येक हिंदूने दिवाळी साजरी करतांना ‘अत्याचारग्रस्त हिंदूंवर जी वेळ आली आहे, ती येणार्‍या काळात आपल्यावरही येऊ शकते’, याचे भान ठेवावे.

दीपावलीशी निगडित कटू आठवणी !

दीपावलीच्या काळात हिंदूंवर आघात होणे, हे आता नवीन राहिलेले नाही. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना झालेली अटक हिंदू कसे विसरतील ? कोणताही सबळ पुरावा नसतांना त्यांना थेट अटक होण्याचा प्रकार हा हिंदु अस्मितेवर घातलेला घाला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ‘शिकंजे में शंकराचार्य’ यांसारखे मथळे वापरून हिंदूंच्या धर्मगुरूंची जी अपकीर्ती केली होती, ती कधीही भरून न येणारी आहे. ख्रिसमस किंवा ईद या सणांच्या काळात एखादा पाद्री किंवा मौलवी यांना अटक झाल्याचे आपण पाहिले आहे का ? मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या दंगलीत धर्मांधांनी हैदोस घातल्यानंतर पोलिसांनी सणासुदीच्या काळात त्यांना अटक नको; म्हणून ईदनंतर त्यांना अटक केली. धर्मांधांप्रती केवढी ही सहिष्णुता ! हीच सहिष्णुता कधी हिंदूंच्या संदर्भात दाखवली जात नाही. हिंदूबहुल भारतात हिंदूंच्याच धार्मिक भावनांचा कसा अनादर केला जातो, याचे हे बोलके उदाहरण आहे. ही सर्व उदाहरणे पहाता ‘सणांच्या काळात हिंदूंना मन:स्ताप देण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले षड्यंत्र आहे’, असे म्हणायला वाव आहे.

हिंदूंचे सणही दहशतीखाली साजरे करावे लागतात. वर्ष २००५ मध्ये ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला राजधानी नवी देहलीमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ६२ जण ठार झाले होते. आजही दिवाळी किंवा गणेशोत्सव या कालावधीत घातपात घडवून आणण्यासाठी आतंकवादी टपलेले असतात. या सर्व घटनांचा आढावा घेता हिंदूंसमोरील आव्हाने मोठी आहेत, हे दिसून येते. येणार्‍या काळात स्वतःच्या परंपरा, संस्कृती यांचे जतन करणे, त्यांचे पालन करण्यासाठी निकोप वातावरण निर्माण करणे, हे मोठे दायित्व हिंदूंसमोर असणार आहे.

आत्मज्योत तेवत रहो !

ही आव्हाने पेलण्यासाठी हिंदूंना स्वतःतील आत्मज्योत प्रज्वलित करावी लागेल. दिवाळीच्या काळात घरासमोर असंख्य दीप प्रज्वलित करतांना हिंदूंनी याचे भान ठेवावे. हिंदूंच्या प्रत्येक सणांना आध्यात्मिक बैठक आहे. हे सण साजरे करतांना प्रत्येक जिवाचा आत्मोद्धार व्हावा, हाच उदात्त उद्देश धर्माने विहित केला आहे. दीप प्रज्वलित करण्याच्या छोट्याशा कृतीतून त्या जिवाने अंतर्मुख होणे, धर्माला अभिप्रेत आहे. प्रकाशमानता हा आयुष्यातील समृद्धता आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ते साध्य करण्यासाठीच तर मनुष्य झटत असतो. असे असले, तरी आज हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते व्यवहारिक समृद्धीला प्राधान्य देतांना दिसतात. ‘आर्थिक स्थिरता आणि समृद्धी म्हणजे सर्वकाही’, अशी हिंदूंची चुकीची धारणा झालेली दिसते; मात्र ‘अर्थ’ हा काही आपल्याला चिरंतन आनंद देऊ शकत नाही. त्यामुळे हिंदूंसाठी दिवाळी सण म्हणे बाह्य रोषणाई, नवीन कपड्यांची किंवा वस्तूंची खरेदी, फराळ एवढ्यापुरताच मर्यादित आहे. याही पुढे जाऊन ‘धर्माला अभिप्रेत असलेली दिवाळी कशी आहे’, हा विचार हिंदूंच्या मनात येत नाही. सणासुदीला हिंदू बाह्य गोष्टींतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र चिरंतन आनंद हा साधनेनेच आपल्याला प्राप्त होतो. आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण दूर झाल्यावर हा आनंद मिळतो. आत्मज्योत प्रज्वलित करणे म्हणजेच एका अर्थाने अज्ञानाचे, मायेचे आवरण दूर करणे होय. या दिवाळीत हिंदूंनी स्वतःची आत्मज्योत प्रज्वलित करण्याचा पण करावा. आज हिंदूंची एवढी दयनीय अवस्था का झाली आहे ? याचे उत्तर म्हणजे ते बलहीन झाले आहेत. त्यांच्या कुठल्याच कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान नसल्यामुळे त्यांना सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागत आहे. साधना करून हिंदूंनी आत्मज्योत प्रज्वलित केल्यास हिंदूंच्या बर्‍याच समस्यांचे निवारण होईल. अशा ‘तेजोमय’ हिंदूंमध्ये स्वतःच्या जीवनातील समस्यांचे निवारण करण्याची क्षमता असेलच; पण त्याही पुढे जाऊन त्यांच्यात धर्मावरील आघात रोखण्याचीही क्षमताही असेल. या वर्षीची दिवाळी साजरी करतांना हिंदूंनी या सर्व सूत्रांचे भान ठेवल्यास त्यांचा प्रवास खर्‍या अर्थाने तिमिराकडून तेजाकडे चालू होईल, हे निश्‍चित !


Multi Language |Offline reading | PDF