आध्यात्मिक लाभ आणि चैतन्य देणारी मंगलमय दीपावली !

धनत्रयोदशी

आश्‍विन कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात. जमा झालेल्याचा आणि खर्च झालेल्याचा आढावा ठेवून लक्ष्मीची पूजा करतात.

भावार्थ : ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची पूजा करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायु, अग्नि आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.

नरक चतुर्दशी

१. सण साजरा करण्याची पद्धत : आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहुर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

२. यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

३. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

४. प्रदोषकाळी दीपदान करतात. प्रदोषव्रत घेतले असल्यास प्रदोषपूजा आणि शिवपूजा केली जाते.

बलीप्रतिपदा

बलीप्रतिपदेला पंचरंगी रांगोळीने बली आणि पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. अभ्यंगस्नान करून स्त्रिया पतीला ओवाळतात. ब्राह्मणभोजन घालून पक्वान्नांचे भोजन करून नवी वस्त्रावरणे लेवून दिवस आनंदात घालवला जातो, तसेच गोवर्धनपूजाही केली जाते.

‘अश्‍वमेध यज्ञ केलेला बळीराजा मोक्षार्थी आहे’, हे जाणून विष्णु वामनरूप धारण करून यज्ञात ‘याचक’ म्हणून आला. इंद्रपदाच्या अधिकार भोगासाठी दीन झालेला वडील भाऊ इंद्राला जगताचा एक तुकडा द्यावा; म्हणून बटु वामनाने फसवून; पण आंतरिकदृष्ट्या बळी चक्रवर्तीचे कोटकल्याण करून दोन पावलांनी पृथ्वी आणि स्वर्गलोक व्यापून तिसर्‍या पावलाने बळीला पाताळात लोटले. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

धन्वंतरि जयंती

धनत्रयोदशीचा दिवस आयुर्वेदाच्या दृष्टीने धन्वंतरि जयंतीचा आहे. वैद्य या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

धन्वंतरी जन्म : ‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो.’ – वैद्य राम लाडे (लोकजागर, नोव्हेंबर २०१०)

लक्ष्मीपूजन

या दिवशी प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध आणि ब्राह्मणभोजन अन् प्रदोषकाळी लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे. एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच ताम्हनात कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून सिद्ध केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

या दिवशी दिव्यांचा झगमगाट शोभून दिसतो. त्यामुळेच ही अमावास्या पवित्र झाली आहे. ही अमावास्याही कल्याणकारी आहे. या दिवसांत शेतकर्‍यांचे पीक घरात आलेले असते. श्रमाचे साफल्य प्रभुकृपेने मिळालेले असते; म्हणून शेतीतील धान्य ही खरी लक्ष्मी आहे. धान्य हे प्रत्यक्ष जीवनोपयोगी आहे. म्हणूनच ‘अन्न हे ब्रह्म’ म्हटले आहे. आपण दीपावलीला मातीची पणती वापरतो, तिची पूजा करतो, गायीची पूजा, भगवंताद्वारे येणारे शुद्ध स्वरूपांतील धन म्हणजेच धान्यलक्ष्मी तिची रास टाकून पूजा करतो.’ – (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल

भाऊबीज

१. हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.

२. या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या देवीप्रतीच्या भावानुसार ते बंधूला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात, त्यामुळे हा दिवस म्हणजे एका अर्थी हिशोब संपवण्यासाठी असतो.

३. या दिवशी स्त्री जिवात असलेले देवीतत्त्व जागृत होते आणि त्याचा भावाला लाभ होतो. भाऊ पूर्णवेळ साधना करणारा असेल, तर त्याला आध्यात्मिक लाभ होतो आणि तो साधना करणारा नसेल, तर त्याला व्यावहारिक लाभ होतो. भाऊ व्यवहार सांभाळून साधना करत असेल, तर त्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ ५०-५० टक्के होतो.

४. भावात असलेले शिवतत्त्व जागृत होऊन त्यामुळे बहिणीचे १/१००० टक्के प्रारब्धभोग संपतात.

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल

वसुबारस

श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील ‘वासवदत्ता’ नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला ‘वासवदत्तेचे’ स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला ‘वसुबारस’ असे म्हणतात. ‘बारस’ म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे.


Multi Language |Offline reading | PDF