(म्हणे) ‘शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केलाच नाही !’

भारतीय रक्षक आघाडीचे अधिवक्ता धारवाडकर यांचा जावईशोध

निवळ जातीद्वेषापोटी विकृत इतिहासाची मांडणी करणारे अधिवक्ता धारवाडकर यांच्यासारखी बांडगुळे हिंदु समाजाला कलंक ठरत आहेत. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यासही हे जातीयवादी मागेपुढे पहाणार नाहीत. त्यामुळे हिंदूंनी वेळीच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करून इतिहासाचे विकृतीकरण रोखायला हवे !

सातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) – कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला; मात्र अफझलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला नाही, अशी मुक्ताफळे भारतीय रक्षक आघाडीचे अधिवक्ता धारवाडकर यांनी येथे उधळली. भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी याविषयी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकार्‍यांंना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रशासकीय शिवप्रतापदिन साजरा करण्यात येऊ नये, यासाठी शासन प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकार्‍यांंना नोटीसही देण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. शिवप्रतापदिन हा बेकायदेशीर असून तो बंद करण्यात यावा. शासन या कार्यक्रमावर जो पैसा खर्च करते, ते चुकीचे असून ते थांबवावे. समाजापुढे आणि संपूर्ण जगापुढे शिवरायांचा खरा इतिहास यावा, यासाठी प्रशासनाला ही नोटीस देत आहोत. (जातीयवादी संघटनांनी कितीही कंठशोष केला, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांध अफझलखानाचा वध करून हिंदूंना अभय दिले, हाच सत्य इतिहास हिंदूंच्या स्मरणात रहाणार, हे लक्षात घ्यावे ! – संपादक)

२. एका विशिष्ट जातीला लक्ष्य करून अफझलखान वध ही घटना रंगवली जाते. हिंदु-मुसलमान दंगल घडवण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर करण्यात येतो. हा बंद झाला पाहिजे. (अफझलखानी वृत्तीचा पुळका असलेलेच धादांत खोटा इतिहास सांगून जातीयवाद पसरवत आहेत. अशांवरच पहिल्यांदा कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

३. छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा वध केला आहे; मात्र अफझलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला नाही. मग वध कोणी केला, कसा केला, ही माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे प्रतापगडावरील कार्यक्रम हा ‘कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वध दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणीही अधिवक्ता धारवाडकर यांनी केली आहे. (तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे अधिवक्ता धारवाडकर ! अधिवक्ता धारवाडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य नाकारण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. त्यामुळे शिवप्रेमी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून शासनकर्त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF